Powered By Blogger

Friday, July 6, 2012

लोभसवाणा तिकोना ( वितंडगड ) : २३ जून २०१२


मॉन्सून ची सुरुवात कधी होत याची वाट जेवढे शेतकरी पाहतात तेवढीच आतुरतेने त्याची वाट पाहणारी भटक्या लोकांची दुसरी जमात म्हणजे सह्याद्रीला आपल्या कवेत घेऊन तिच्या सोबत गुजगोष्टी करणारे आमच्या सारखे भटके. जून सुरु होऊन फक्त २०-२२ दिवस झाले असतानाही आणि मॉन्सून अजूनही मनसोक्त बरसलेला नसूनही बाहेरचे काळे ढग मात्र आधीच खुणावू लागले होते. अशातच साताऱ्याच्या जवळ चंदन वंदन चा प्लान चालला होता. पण या वेळी ऑफिस मधे बोलता बोलताच विषय निघाला आणि मग सगळ्यांनी मिळून मावळ प्रांतातल्या तिकोनाला जायचं ठरलं. आणि माझा चंदन वंदन पुन्हा लांबला. पण त्याने फारसा फरक पडणार नव्हता कारण भटकणे एवढा एकच मुद्दा माझ्यासाठी महत्वाचा होता.
आता ऑफिस मधले जाणार  म्हटल्यावर आधी खरंच कोण कोण येणार आणि लिस्ट मधे नुसतच नाव देऊन ऐनवेळी डच्चू कोण देणार याची यादी करणं महत्वाचं होतं आणि ते काम राहुल ने अगदी चोख पार पाडलं. नाही हो करत राहुल & राहुल, संदीप, मंगेश, विनोद, आनंद, टेलविन, अजय, अभय, संतोष, लतीफ, रोहित आणि मी असे १३ जण जमले. न आलेले ४ जण हे दुसऱ्या प्रकारातले होते हे ओघाने आलेच.
अशाप्रकारे तारीख ठरली २३ जून.  सकाळी ६.३० वाजता चांदणी चौकात जमण्याचे ठरले. माझं आग्रह हा बाईक वरून जाण्याचा असूनही शेवटी एक estilo (आनंदची) आणि  Sumo (राहुल ची) मधे  प्रत्येकी पाच लोकं आणि माझी आणि विनोद ची बाईक अशी वाटणी झाली. माझ्याबरोबर मंगेश आला. पुण्यापासून तसा बराच जवळ ( ६० किमी ) असल्यानं गाडीचा काहीच त्रास होणार नव्हता. साधारण सगळे जमून निघेपर्यंत ७.३० वाजून गेले होते. आणि अर्थातच सगळ्यांना आधी काहीतरी नाश्ता करायचा असल्यानं आम्ही पिरंगुट मधलं माझं हक्काचं ठिकाण म्हणजे “हॉटेल श्रीपाद “ येथे थांबलो. मनसोक्त आणि भरपेट नाश्ता झाल्यानं अर्थात आता सगळे पुन्हा ताजेतवाने झाले होते. त्यामुळे लवकरात लवकर तिथून निघालो ते थेट नाणेगाव.


 आमचा दुसरा महत्वाचा प्रश्न होता तो जेवणाचा. आमच्या साधना विलेज मधल्या प्रदीप मुळे तो ही प्रश्न सुटला. दुपारचं जेवण त्याची आई बनवून देणार होती. भाकरी, पिठलं, लोणचं, खरडा, कांदा, भात आमटी अस फक्कड बेत असलेला डबा काकूंनी करून दिला.  तो आम्ही नाणेगाव ला घेतला. 

साधारण मागच्या वर्षी एप्रिल पासून माझी पुणे ते साधना विलेज अशी शनिवारची वारी चालू होती. साधारण ३५-३६ आठवडे चाललेली ही वारी मागच्याच आठवड्यात दहावीचे क्लास संपून शाळा सुरु झाल्यामुळे आणि आमच्या शनिवारच्या क्लास ला सुद्धा सुट्टी लागल्यामुळे आता थोडे दिवस बंद होणार होती.  पण या शनिवारीही तिकोना च्या निमित्ताने आपसूक पणे ही वारी घडली आणि मी पुन्हा त्याच रस्त्याने प्रवास करत होतो. काही काही गोष्टी का घडतात हे आपल्याला कधीच कळत नाही ,बऱ्याचदा आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही आणि कधी कधी लक्षात आलं तरी आपल्याला त्याचा माग लागत नाही. त्यातलीच ही सुद्धा एक गोष्ट. असो. अशा तऱ्हेने माझ्या आणि माझी गाडीला अगदी पाठ झालेल्या वाटेवरून आम्ही नाणेगाव ला पोहोचलो. तिथे दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन आम्ही तीकोन्याकडे कुच केले. आजूबाजूला पसलेल्या डोंगरांवर ढगांची गर्दी झाली होती. पण डोक्यावर मात्र अजूनही उन्हाची छत्री  होती.
गिरीवन ची कमान मागे सोडत आम्ही काशिग ला पोहोचलो. काशिग वरूनच तिकोना आपल्याला खुणावू लागतो. त्याचे ते खरोखरच्या तीन कोनातले त्रिकोणी रूप त्याच्या बद्दलच्या कुतूहलाला जागे करते. वर निमुळता होत गेलेला त्याचा आकार आपल्याला सुंदर तर दिसतोच पण त्याचबरोबर आजूबाजूच्या प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी तिकोना हे उत्तम ठिकाण का होतं हे ही सिध्द करत राहत.


इतर किल्ल्या सारखा खूप मोठा इतिहास तिकोण्याला लाभलेला नसला तरी जेवढी माहिती उपलब्ध आहे ती सुद्धा त्याच्या स्वराज्यातल्या असलेल्या महत्वाच्या दृष्टीने खूप मोठी आहे.
तिकोण्याला वितंडगड असेही संबोधतात. त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३,६०० फूट उंच आहे. पायथ्याशी असलेलं तिकोना पेठ हे गाव सुद्धा खूप छोटं आणि आटोपशीर आहे.  तीकोनाच्या आसपास तुंग, विसापूर आणि लोहगड असे तीन किल्ले आहेत.
थोडक्यात माहिती द्यायची झाल्यास ती खालील प्रमाणे :
उंची : ३६०० फूट
पायथ्याचे गाव : तिकोना पेठ.
वर जाण्यास लागणारा वेळ : दीड तास
खाण्याचे पदार्थ : स्वतःचे जवळ ठेवावेत, वरती काहीही मिळत नाही.
राहण्याची सोय : गुहेमध्ये साधारण १०-१५ लोकं राहू शकतात.
तिकोनाचा इतिहास बघितला तर असं आढळतं कि मलिक अहमद निजामशाह याने १५८५ मधे तिकोना जिंकला. १६५७ मधे शिवाजी महाराजांनी जेव्हा संपूर्ण कोकण जिंकले तेव्हा त्यांनी तिकोना, कर्नाळा, लोहगड, महुली, सोनगड आणि विसापूर सुद्धा काबीज केले. १६६० मधे नेताजी पालकर तिकोण्याची देखरेख आणि सुरक्षा पाहत होते. १६६५ मधे जयसिंग याने दिलेरखानाच्या साथीने जवळची गावे काबीज केली पण तिकोना अभेद्य राहिला. १२ जून १६६५ च्या पुरंदर च्या तहानुसार तिकोना हा मुघल योद्धा कुबद्खन याच्या स्वाधीन करण्यात आला. पण त्यानंतर पुन्हा हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला असं इतिहास सांगतो. दक्खन च्या पठाराच्या डोंगरांमध्ये असलेल्या कार्ले, बेडसे, भाजे, भंडारा आणि शेलारवाडी इथल्या पुरातन कालीन गुहांचे रक्षण करणारे किल्ले म्हणून तुंग, तिकोना, लोहगड आणि विसापूर यांची ओळख आहे. 

 
तिकोनापेठ इथे पोहोचून आम्ही तिकोण्याच्या दिशेने चालू लागलो. आम्ही आमच्या गाड्या बऱ्याच दूर गावात मंदिरापाशीच लावल्या. मला माहित असलेल्या दोन वाटा नक्की कुठून सुरु होतात हे फारसं आठवत नव्हतं पण किल्ल्याच्या दिशेने आम्ही चालत राहिलो. शेवटी एका मोकळ्या जागेवरून अंदाज घेतला. समोर तिकोना डाव्या बाजूला सरळ जाणारी पण दूरची वाट आणि उजव्या हाताला किंचित गोंधळवनारी पण बरीच जवळ वाटणारी अवघड वाट ( सोंडेची वाट ). थोडं पुढे जाऊन वाटेचा अंदाज घायचा ठरवलं. मी आणि विनोद आम्ही दोघे निघालो. दाट असलेल्या झाडाझुडपातून शेवटी आम्ही दोघे एका उंच टेकडीवर पोहोचलो. समोर पवना धरणाचा जलाशय, आकाशात जमलेले काळे ढग, धुक्यात हरवलेला “तुंग”, आणि अंगावर काटा उभा करणारा गार वारा. खरोखर वेड लावणारं हे दृश्य पण ते अनुभवल्या शिवाय  त्याची खरी किंमत कळणं केवळ अशक्य.
त्या टेकडीवरून सगळ्यांना हाका मारल्या आणि वर यायला सांगितलं. तो पर्यंत मी हळूहळू पुढे जाऊन पुढची वाट पाहू लागलो. आत्ता फक्त पावसाची एक सर आली पाहिजे असं मनात म्हणत असतानाच हातावर पावसाचे थेंब कोसळले. निसर्ग अदभूत का आहे याचं हे उत्तम उदाहरण. जसं मी नेहमी म्हणतो कि निसर्ग संवाद साधत असतो आपण फक्त नीट लक्ष देऊन ऐकायचं असतं. माझ्या हाकेला साद देणाऱ्या त्या निसर्गाचे आभार मानत मी पुढे निघालो.
एक माणूस चालेल अशी अरुंद पायवाट, डाव्या बाजूला तीव्र उताराची दरी, उजव्या बाजूला वरून खाली आलेला खडकांचा उतार. आणि आधाराला वाळलेल्या गवतांच्या काड्या आणि वरून येणारी वेडीपिशी झालेली पावसाची सर. ट्रेक मधला हा माझा “सार्थकी” क्षण. त्या सरीने मनातल्या सगळ्या शिणवट्याला दूर पिटाळून लावले. मन तृप्त झाले. समोरची वाट मला खुणावू लागली आणि मी झपझप पुढे जाऊ लागलो.  थोडी खाली थोडी वर असं करत वाट शेवटच्या टप्प्यावर आली.  मागून येणाऱ्या सगळ्यांना सांभाळून येण्यास सांगून मी त्या खडकांवरून वर चढू लागलो. वर किल्ल्याची अभेद्य तटबंदी खाली पाहून गालात हसत असल्याचा भास मला झाला. १० मिनिटातच प्रवेशद्वार समोर आलं तिथेच एका कठड्यावर टेकलो. पुन्हा एकदा गार वारा अंगावर आला. हळूहळू सगळे वर येऊ लागले. थोड्या अजून पायऱ्या चढून आम्ही गुहेपाशी आलो.  
इथून आत शिरल्यावर डावीकडे वळाल्यावर ,तिथे समोरच लेण्या आहेत्,या लेण्यातच तळजाई देवीचे मंदिर आहे, या लेण्याशेजारीच पाण्याचं कातळ्कोरीव टाके असून समोरच एक तळे आहे. हा सर्व परिसर पाहून पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याचा उभा चढ सुरु होतो, बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे ४० पायर्‍यांची चढाई करावी लागते.  सातवाहन काळातील गुहा या सुद्धा खरोखर सुंदर दिसतात. जरावेळ तिथे विसावून बाले किल्ल्या कडे निघालो. तीकोण्याचा बाले किल्ल्याचे प्रवेश द्वार ही खरोखर एक सुंदर कलाकृती आहे आणि तिकोण्याचे आकर्षण सुद्धा आहे. उंच आणि अतिशय उभट आकाराच्या पायऱ्या या अंगातून घाम काढतात. वर पोहोचताच समोर महादेव त्रीम्बाकेश्वाराचे मंदिर आहे. मंदिराबाहेर उघड्यावरच नंदी आहे. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सध्या चालू असल्याचे तिथल्या रखवाल दाराने सांगितले.  बालेकिल्ल्यावर वरही तितकाच जोरात वाहत होता. तिकोण्यावरून चारही दिशांना दिसणारं दृश्य हे कागदावर रेखाटलेल्या चित्रासारखं दिसत होतं. पवना धरणावर मधेच एखाद्या ठिकाणी पडणारी पावसाची सर ही ढगातून सोडलेल्या नळाप्रमाणे भासत होती. भाताच्या रोपांची हिरवे गालिचे अजूनही पावसाची प्रतीक्षा करत असल्याचं दिसत होतं. वर असलेली पाण्याची टाकी पाण्याअभावी रिकामीच होती. 


बालेकिल्ल्यावर बरंच वेळ टेहळणी करून समाधान काही होत नव्हतं. खाली उतरूच नये असं मन म्हणत असतानाच जेवणाची आठवण झाली आणि आम्ही सगळे खाली उतरू लागलो. येताना मात्र आम्ही सोप्या पण लांबच्या वाटेने उतरू लागलो. राहुल, विनोद असे दोघं तिघे जण आलेल्याच वाटेने उतरून गेले.
साधारण तासाभरात आम्ही खाली पोहोचलो. वाटेत जांभळाची, आंब्याची बरीच झाडे होती. जांभळाच्या एका झाडापाशी आम्ही बरीच जांभळे पाडली. एका झाडावर चढण्याचा माझा प्रयत्न निष्फळ गेला आणि आम्हाला जांभळाची चव चाखायला मिळण्या ऐवजी अनेक काट्यांना माझ्या उजव्या हातात घुसून रक्ताची चव चाखायला मिळाली. त्यानंतर लाकूड, दगड, बाटली, अशा अनेक वस्तू फेकून आम्ही  बरीच जांभळे खाली पाडली. पण शेवटी अजय दुसऱ्या एका झाडाच्या फांदीवर चढला आणि फांदी हलवून जांभळे खाली पाडली.
जांभळे खात आम्ही पुन्हा तिकोना पेठ येथे पोहोचलो. आधी पोहोचलेले सगळे आमचीच वाट पाहत होते कारण डबे गाडी मधे होते आणि किल्ली आमच्याकडे. भरभर डबे बाहेर काढून सगळ्यांनी पिठलं भाकरी वर ताव मारला. मनसोक्त जेवण केलं. तोच पुन्हा पावसाची जोरात सर आली आणि सगळी हवा चिंब ओली झाली. पाऊस थांबताच आम्ही परतीचा मार्ग धरला. 


 
ओल्या झालेल्या वाटेवरून परतताना, पुन्हा मागे वळून तिकोन्याकडे पहिले. आधी केलेल्या प्रत्येक ट्रेक मधे जाणवत आलेली हुरहूर तेव्हाही जाणवली. कानात बाले किल्ल्या वरच्या घोंघावणाऱ्या वाऱ्याची साद ऐकू आली. आलिंगन देणारी निमुळती पायवाट धुसर दिसली, महादेवाच्या मंदिरातला घंटानाद कानात घुमला, अवखळ सरीने केलेला पाठशिवणीचा खेळ आठवला, निधड्या छातीचा मराठ्यांचा अभिमानाने छाती काढून उभा असलेला तिकोना पाहून मात्र आपसूक पणे उर भरून आलं आणि महाराजांना मनोमन मुजरा केला आणि परतलो.
 ...आनंद                                                                                        ६ जुलै २०१२  
 
        

No comments:

Post a Comment