बाहेर मस्त पाऊस पडतोय .
हवेत गारवा पसरलाय. आणि अशा मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात मी अशाच एका आयुष्य
समृध्द करणाऱ्या अनुभवाबद्दल लिहायला बसलोय. काल साधना स्कूल मधून जेव्हा रात्री
परतलो तेव्हापासून खरंतर कधी एकदा लिहितो असं झालं होतं. एखादी गोष्ट फक्त अनुभवून
माझं कधीच भागत नाही पण ती जेव्हा मी शब्दात बंदिस्त करून माझ्या स्मृतींमध्ये
ठेवतो तेव्हा मनाला हायसं वाटतं. “साधना” मधला “Teach a Child” चा पहिला टप्पा हा मागच्या वर्षी जून मधे सुरु झाला आणि
साधारण डिसेंबर च्या मध्यात संपला. या नंतर काय असा विचार सुरु असतानाच रंजनाताईनी
नववीतून दहावीत जाणाऱ्या मुलांसाठीच्या “vacation classes “ बद्दल संकल्पना आम्हाला
सांगितली. आणि शोध सुरु झाला तो उपक्रमासाठी लागणाऱ्या शिक्षकांचा. उपक्रमाचं तोंड
भरून कौतुक करणाऱ्या अनेक लोकांपैकी कुणीही त्यात स्वतः सहभागी होण्याबद्दल बोलत
नव्हते, किंवा आपण त्यात कुठल्या प्रकारे छोटासा का होईना वाटा उचलू शकतो या बद्दल
विचारही करत नव्हते. पण शेवटी पुण्यात
शिकणारा दत्ता, नुकतीच बारावी दिलेली आरती, साधनाचा उत्साही कार्यकर्ता अमोल, “Teach for India” चा निखिल त्याची सहकारी उमा, MBA ला प्रवेश घेतलेला पण कॉलेज सुरु होण्यापूर्वीचा वेळ
सार्थकी लावण्यासाठी धावून आलेला राहुल , मी आणि माझ्या बरोबरचा सहकारी रमेश, अशी
आमची टीम बनली आणि १ मे पासून या उपक्रमाचा आणि अर्थातच “सुट्टीतल्या शाळेचा”
श्रीगणेशा झाला. अर्थात रोज साधनाला जाऊन शिकवणं मला आणि माझ्या सहकार्यांना शक्य
नसल्यानं आम्ही आठवड्याच्या शेवटी दर शनिवारी विज्ञानाच्या प्रयोगांची जबाबदारी घेतली.
त्याच बरोबर एक छोटीशी प्रयोगशाळा तयार करण्याचे आम्ही ठरवले. रमेश ने गणिताच्याही
काही सोप्या पद्धती शिकवण्याची तयारी दाखवली.
१ मे ला मुलांची ओळख,
शिकवणाऱ्या शिक्षकांची ( म्हणजे सगळ्या दादांची आणि ताईची ) ओळख, उपक्रमाचा हेतू
या सगळ्या गोष्टीपासून सुरुवात झाली. रंजनाताई बरोबर आलेल्या एका सरांनी मुलांना
आणि सगळ्या शिक्षकांना काही टिप्स दिल्या. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून पुढच्या
आठवड्यात काय काय शिकवायचं याची तयारी केली. मुळात रंजनाताईनी आम्हाला हे क्लासेस
कशा प्रकारे घेतले जावेत ही एक संकल्पना सांगितली जी साधना इंग्लिश स्कूल मधे
वापरली जाते. मुळात आपली शिक्षण पद्धती जिथे संपते तिथे “ती” सुरु होत असल्यामुळे
सुरुवातीलाच आम्हा सगळ्यांना खूप उत्साह आला होता.
“मुलांना पुस्तकी ज्ञान न
देता त्यांना त्यांच्या अवती भवतीच्या जगातून शिकायला लावणे” हे वाचायला छान वाटतं
पण याचं अनुकरण साधना मधे कसं होतं हे आम्हाला ताई नी समजावून सांगितलं. साधना
स्कूलच्या प्रायमरी च्या वर्गात एकही कृत्रिम खेळणं नाहीये हे सांगतानाच ताई
म्हणाल्या कि मुलं खरंतर कशाशीही खेळू शकतात, मग ते टायर असू दे, पुठ्ठ्याचे तुकडे
असू देत, लाकडी पट्ट्या असू देत, अगदी मैदानात पडलेले छोटे दगड गोटे असू देत.
मुलांच्या प्रयोगशीलतेला याने वावच मिळत असतो. पण याच गोष्टी आपण त्यांना करू देत
नाही आणि बऱ्याचदा कुठल्या गोष्टी करू नये याचा पाढा वाचत बसतो. परिणामी नक्की काय
करायचं हेच न कळल्यामुळे विचारशक्ती खुंटते आणि पुस्तकी ज्ञान हे फक्त पुस्तकातच
उरत. खरंतर मुलं आजूबाजूच्या जगातून आपोआप शिकत असतात पण आपण त्यांना बऱ्याचदा
अनेक गोष्टी करण्यापासून परावृत्त करत असतो.
दहावीच्या या क्लासेस मधेही
मुलांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळावा आणि आधी मुलांनी एखादी गोष्टी स्वतः पहावी आणि
मग ती पडताळून पाहण्यासाठी पुस्तकाचा आधार घ्यावा अशीच पद्धत अवलंबली गेली. पुस्तकातल्या
मोठ्या धड्याना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये वाटून प्रत्येक प्रकरणाची संकल्पना
चित्रे काढण्यात आली. आणि ती ही मुलांनी स्वतःच काढली.
विज्ञानाचे धडे शिकताना
सुद्धा त्यातली प्रत्येक गोष्ट आपल्या रोजच्या जीवनात कशी जोडलेली आहे मग ते
पदार्थ विज्ञान असो, धातू असो, विदूत उपकरणे असो, मानवी शरीर असो किंवा आजूबाजूची
हवा असो. हे असं “का“ हा प्रश्न मुलांच्या मनात जेव्हा येतो तेव्हा ती खरोखर
उत्सुक असतात पण बऱ्याचदा शिक्षकच “हे असंच असतं “ असं उत्तरं देऊन मुलांना गप्प
करतात. प्रत्यक्षात त्याचं योग्य उत्तरं जर त्यांना मिळालं तर एक नवी गोष्ट मुलं आपोआप
शिकतील ही साधी गोष्ट या शिक्षकांना का कळू नये. अर्थात त्यासाठी शिक्षकांना त्या
गोष्टीचं उत्तर आधी माहित असायला हवं.. !
प्रयोगाबरोबरच मुलांना
कॉम्पुटर वर विज्ञानाच्या काही रासायनिक अभिक्रिया त्यांची समीकरणे, विद्दूत धारा
आणि त्याच्या संदर्भातील संज्ञा या आम्ही दाखवल्या त्यामुळे धडा वाचण्याआधी
मुलांनी प्रत्येक गोष्टी पाहिली असल्यामुळे वाचून समजने सोपे गेले. प्रत्येक धड्याची संकल्पना चित्रे भिंतींवर
लावल्यामुळे रोज ती मुलांच्या नजरे खालून जात होती. दत्ताने मुलांकडून या सगळ्या गोष्टी नकळत करून
घेतल्याने मुलांनाही शेवटी विज्ञान आवडू लागलं.
गणित हा विषय शिकवताना
सुद्धा त्याची भीती घालवणे हा मूळ हेतू
ठेवून प्रयत्न केले गेले. आणि त्या साठी मुळात ती भीती का आहे हे कळणं गरजेचं
होतं. आरती आणि राहुल ने प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन ज्यांचा आठवी आणि नववी
चा पाया कच्चा आहे त्यांना विशेष लक्ष पुरवलं. रमेशने सुद्धा छोट्या छोट्या
प्रयोगातून गणित सोपं कसं करता येईल या गोष्टी सांगितल्या. गणिता बरोबरच भूमिती
मुळात कशी शिकवली पाहिजे हे गोष्ट महत्वाची आहे. फळ्यावर नुसते आकार काढून त्यातले
कोन, लांबी, रुंदी एवढ्यावर भूमिती थांबत नसून त्यातल्या प्रत्येक गोष्टीला एक
अर्थ (meaning ) कसा आहे आणि ते भूमितीच्या नियमात कसं बसवायचं हे शिकवलं गेलं. रमेश ने
लाकडाच्या चौकोनी तुकड्यावर ६४ “चुका” उभ्या लावून त्यात भूमितीमधला कोणताही आकार
कसा करता येतो आणि प्रत्येक कोन कसा मोजता येतो हे जेव्हा दाखवलं तेव्हा मुलांची
भूमितीची भीती दूर पळाली. हे सगळं करतानाच “मला आता भूमितीची भीती वाट्त नाही” ,
“मला भूमिती आवडू लागली आहे “ अशा मुलांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकून खूप छान
वाटत होतं.
निखिलने मुलांकडून इंग्रजी
खूप साध्य सरळ पद्धतीने करून घेतलं. इंग्रजीचं पुस्तक हातात न घेता त्याने मुलांना
इंग्रजी कसं शिकायचं हे दाखवून दिलं. मुळात इंग्रजी शिकायचं नाही तर बोलायचं, मनात
वाक्य तयार करायची, आजूबाजूला दिसणाऱ्या इंग्रजी शब्दांचे अर्थ शोधायचे या सवयी
त्यांना लावल्या. इंग्रजीच्या व्याकरणाची बाऊ न करता जसं आपण मराठीत ते वापरतो
त्याचप्रकारे ते इंग्रजीत कसं वापरायचं हे सांगितलं. इंग्रजीसाठी मुलांनी
बनवलेल्या “adjective, noun, verb , preposition “ च्या तक्त्याने मुलांनाही आत्मविश्वास आला.
विज्ञान, बीजगणित, भूमिती
आणि इंग्रजी हे मुलांना भीती घालणारे सगळे विषय इतक्या सहजतेने शिकवले गेले कि हेच
ते अवघड विषय या बद्दल मुलांनाच शंका वाटावी. आणि या सगळ्यात मुख्य गोष्ट होती ती
म्हणजे मुलांचं शिकवणाऱ्या दादा आणि ताईशी असलेलं मैत्रीचं नातं. या सुट्टीतल्या
शाळेच्या शेवटच्या आठवड्या आधी सगळे जण लोहगड ला पिकनिक ला जाऊन आले, मी चेन्नई ला
गेल्या मुळे माझी संधी हुकली. पण नंतर शाळेत गेल्यावर तू का आला नाहीस हा प्रश्न
विचारून मला सगळ्यांनी भंडावून सोडलं.
उपक्रमाचं वेगळे पण हे अनेक
गोष्टीमुळे ठसत गेलं , वर्गात बसून अभ्यासाचा कंटाळा आला तर बाहेर झोपाळ्यावर बसून
, तर कधी कट्ट्यावर बसून केलेली उजळणी, वेगवेगळ्या खेळामधून शेवट पर्यंत कायम
राहिलेला “Interest”, जमिनीवरच खडूने आलेख काढून त्यावर केलेली भूमितीचा
अभ्यास, लोह चुंबकाच्या मदतीने मैदानाच्या मातीतून शोधून आणलेले लोहाचे कण, बाटली
मधे पाणी भरून तिला छोटं पाईप लावून केलेला विभावांतराचा ( voltage ) , रोधाचा ( resistance ) ,
विद्दुतधारेचा( current ) प्रयोग. एक न दोन अशा
इतक्या प्रसंगांनी भरलेली शाळा खरोखर एक छोटासाच मैलाचा दगड होती यात शंकाच नाही.
एका कणखर शिक्षण पद्धतीसाठी
आणि उज्वल भारतासाठी च्या ध्येयासाठी अशा हजारो मैलाच्या दगडांची गरज आहे तेव्हा
कुठे लाखो मैल दूर असलेला स्वप्नातल्या भारतात आपण पोहोचू. शिक्षण पद्धती, शिक्षक
हे खरंतर देशाचं भविष्य घडविण्यासाठी कारणीभूत असतात. पण जिथे शेवटचा पर्याय
म्हणून शिक्षकीपेशाकडे पाहिलं जातं तिथे आपण दर्जेदार शिक्षकांची अपेक्षा कशी
करायची हाच प्रश्न पडतो. मला शिकवायला आवडतं म्हणून मी शिक्षक झालो असं म्हणणारे
शिक्षकच भविष्यातली पिढी घडवू शकतात. मुलांचं भावविश्व जाणून त्यांना योग्य संधी
देणारी शिक्षण पद्धती निर्माण करणे हे दुसऱ्या तिसऱ्याच काम नसून ते ही आजच्या
तरुण पिढीची जबाबदारी आहे.
दहावीच्या या क्लासेस ने
आम्हाला सगळ्यांनाच आपल्यावर असलेल्या जबाबदारीची नव्याने जाणीव करून दिली होती
यात कुठलीच शंका नाही.
काल १६ जून रोजी दहावीची ही
सुट्टीतली शाळा संपली. साधनाच्या शाळेत , सर्व मुले, काही पालक, रंजनाताई , सगळे
शिक्षक ( दादा आणि ताई ) यांच्या उपस्थितीत एका छोट्या समारंभाने या उपक्रमाची
सांगता झाली. दत्ताने सुरुवातीला सर्वांची
ओळख करून दिली, त्यानंतर आरती, अमोल, राहुल, निखिल, आणि मी आम्ही सर्वानी आमचे या
उप्रकमा मधले अनुभव, आठवणी सांगितल्या. त्यानंतर काही मुलांनी आणि मुलींनी येऊन
त्यांना या सुट्टीतल्या शाळेतल्या वर्गात कसं वाटलं हे व्यक्त केलं. हे चालू
असतानाच कोमल आणि शिल्पाचे चे पाणावलेले डोळे कुणाच्याही नजरेतून सुटले नाहीत.
त्यानंतर निखिल आणि राहुल ने तयार केलेला एक छोटासाच ४ मिनिटांचा व्हिडीओ
दाखवण्यात आला. तो संपून मग जेवणाची तयारी चालू असतानाच कोमल, शिल्पा,
यांच्याबरोबरच बाकीच्या मुलींना सुद्धा अश्रू अनावर झाले. रंजनाताई आणि आम्हा
सगळ्यांना त्यांना आवरताना भरून येत होतं. जेवणाला बसताच प्रत्येक जण एकमेकांना
घास भरवू लागला. शिक्षक आणि मुलं यांचं नातं असंही असू शकते ही खरोखर उल्लेखनीय
बाब होती. ऋणानुबंध यालाच म्हणत असावेत.
संध्याकाळी साधनावरून परत
येताना पावसाची रिमझिम होत होती. सूर्य कधीच डोंगराच्या आड झोपी गेला होता. मनात
आलं.
“जगण्याचे अनेक मार्ग अनेक
तऱ्हेने आपल्या पुढे येत असतात, पण त्यातल्या कुठल्या मार्गाने जायचं हे बऱ्याचदा
आपण ठरवत नाही, नशीब नेईल तिकडे असं बोलून बरेच जण मोकळे होतात. पण आपण निवडलेल्या
मार्गावर जेव्हा आयुष्याचं सार्थक करणारे असे प्रसंग समोर येतात तेव्हा खरंतर
स्वतःच्याच सुखाचा हेवा वाटतो. आयुष्यातल्या निरर्थक गोष्टीत गुंतून पडलेल्या
अनेकांना पाहिलं कि याची जाणीव अजून तीव्र होते. कुठल्याही पैशात विकत घेता येणार
नाहीत असे “हे” क्षण फक्त आमचे आहेत आणि राहतील. श्रीमंती म्हणतात ती अजून कशाला.
उरातल्या या क्षणांना ना चोरीची भीती ना कधी संपण्याची भीती. चिरकाल टिकणारं हे धन
अजून वाढवत रहायचं एवढं एकच ध्येय मनात ठेवून घरची वाट धरली.”
१७ जून २०१२
No comments:
Post a Comment