Powered By Blogger

Saturday, March 29, 2014

लघुकथा : वेगळा


आजही राम ला शाळेत यायला उशीर झाला होता. आणि नेहमी प्रमाणे सुमित त्याची वाट पाहून वर्गात निघून गेला होता. राम नुकताच मागच्या महिन्यात शाळेत येऊ लागला होता. दिसायला सावळा असला तरी सरळ नाक, बोलके डोळे, निरागस चेहरा असलेला राम कुशाग्र बुद्धी मुळे राम सगळ्या मास्तरांचा आवडता झाला होता. तो मुळात या गावातच तो नवीन होता. पण एवढ्या थोड्या दिवसातच राम आणि सुमित ची चांगलीच मैत्री जमली होती. दोघे एकाच वर्गात आणि एकाच बाकावर बसत होते. आठवीचा तो वर्ग तसा फार मोठाही नव्हता जेमतेम ३० मुलं होती वर्गात. आणि गावही छोटं असल्यानं प्रत्येकालाच एकमेकांबद्दल माहिती होती.
राम हुशार होता पण फारसा बोलका नव्हता. सुमित शाळा सुरु होण्या पूर्वी मैदानावरच्या वडाखाली रामची वाट पाहत बसायचा. पण जसं आज झालं तसच बऱ्याचदा व्हायचं आणि रामला शाळेत यायला उशीर व्हायचा. धावत पळत राम वर्गात आला. मास्तरांनी चष्म्याचा वरून त्याच्याकडे नुसता कटाक्ष टाकला आणि बसायला सांगितलं. आज शनिवार त्यामुळे शाळा लवकर सुटली. सुमित आणि राम शाळे बाहेर पडले. सुमितने रामला सकाळी झालेल्या उशिरा बद्दल विचारलं. अरे काही नाही रे उठायला जरा उशीर झाला असं सांगून विषय टाळला. राम त्याच्या आई आणि आजी बरोबर राहत असे. त्याला वडील नव्हते. मैदानावर थोडावेळ खेळून दोघेही आपापल्या घरी गेले.
  


इकडे सुमित नेहमी प्रमाणे राम च्या गुणांचा पाढा आई समोर गात होता. आईलाही उत्सुकता लागून राहिली कि नक्की हा राम आहे तरी कोण कि ज्याच्याशी माझ्या सुमितची इतक्या कमी वेळात इतकी घट्ट मैत्री झाली होती. आई सुमित ला म्हणाली “अरे सुमित तुझ्या त्या रामला आपल्या घरी तरी बोलाव एकदा. बघू तरी कोण आहे हा तुझा नवीन मित्र”. हो आई मी किती वेळा म्हणतो रामला घरी चल म्हणून पण तो नेहमी काहीतरी कारण देतो बघ. पण या वेळी मी त्याला आणतोच बघ घरी. असं म्हणून सुमित रामच्या घराकडे निघाला. त्यालाही रामचं घर तसं माहित नव्हतं पण गावाच्या वेशीपाशी कुठेतरी तो राहतो असं तो म्हणाल्याचं सुमित ला माहित होतं. सुमित चालत चालत वेशीकडे निघाला.
वेशीवर पोहोचताच एक त्याला झोपडीवजा घर दिसतं. बाहेर एक म्हातारी बाई बसलेली दिसते. सुमित पुढे येऊन विचारतो राम इथेच राहतो का ?  “व्हय, तू कोण आहेस र पोरा ?  मी राम चा मित्र आहे. सुमित उत्तर देतो. “असं व्हय बस बस इथं, मी रामची आजी हाय. राम जरा पलीकडच्या गावात गेलाय येईल एवढ्यात, तू बस.” 

थोड्याच वेळात सुमितला दुरून राम येताना दिसतो. त्याला पाहून राम थोडासा अस्वस्थ होतो. रामची आईपण मागून येते. आजी आईला सुमित बद्दल सांगते. आई दोघांना बसायला सांगून आई जाते.
राम विचारतो “ तू कसा काय आलास इकडे अचानक ?”. अरे माझ्या आईने तुला बोलावलं होतं घरी म्हणून तुला बोलवायला आलो होतो. पण तू कुठे गेला होतास ? काय बोलावं न कळल्यानं राम उठून आत जातो. आजी दुरून सगळं पाहत असते. सुमित उठून आजी पाशी येतो. आज्जी तुम्ही तरी सांगा राम कुठे गेला होता ?
बाळा, राम ला वडील नाहीत. घर चालवायला घरात कर्ता माणूस नाही. त्यात आमी खालच्या जातीचे आहोत पोरा. राम आणि त्याची आई पलीकडच्या वाडीत बांधकामावर मोलमजुरी करायला जातात. राम खूप गुणी पोर आहे. लहान वयात सगळं गिळून कष्ट करतो बघ. त्याला खूप शिकून मोठं व्हायचंय बघ. म्हणून आम्ही या गावात आलो कारण इथं शाळा आहे. रात्री जकात नाक्यावरच्या दिव्याखाली अभ्यासाला जातो बघ माझा राम. वेळ मिळेल तेव्हा पडेल ते काम करतो पण एका शब्दानं कुरबुर करत नाही. माझा राम खरच सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे.
सुमित ला हे सगळं अनपेक्षित असत. इतके दिवस यातलं आपल्याला काहीच माहित नव्हतं याचं त्याला दुखःही होतं.  सुमित तिथून निघतो. रामच्या उशिरा येण्यामागची कारणे सुमितला कळू लागतात. रस्त्याने येताना त्याच्या डोक्यात खूप विचार येऊ लागतात.
रविवार संपतो आणि पुन्हा शाळा सुरु होते. इकडे सुमित ला रामची कहाणी कळल्याने त्याला राम बद्दल अजून आदर निर्माण होतो. आपण किती सुखात आहोत आणि राम ला किती कष्ट करावे लागतायत याचं सुमितला मनोमन वाईट वाटतं. 

तिकडे सुमितची आई त्या राम बद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल माहिती काढते. ते कोण आहेत आणि कुठे राहतात हे कळल्यावर मात्र तिला चिंता वाटू लागते. संध्याकाळी सुमित शाळेतून घरी येतो. आज आई त्याच्यासाठी आवडीचं जेवण बनवते. जेवायला बसल्यावर आई रामचा विषय काढते. ती म्ह्णते “हे बघ सुमित, अरे तो राम काही फार चांगल्या घरातला नाही आणि तो काही आपल्या बरोबरीचा पण नाही. त्यामुळे तू काही त्याच्याशी फार मैत्री करू नकोस.”

आई पण चांगलं माणूस म्हणजे काय गं ?
अरे चांगलं माणूस म्हणजे जो सर्वांची काळजी करतो, कष्ट करतो ज्याच्या आयुष्यात ध्येय असतात तो चांगला माणूस.

क्षणभर सुमित शांत बसतो आणि म्हणतो , “होय आई तू म्हणतेस ते बरोबरच आहे बघ. तसा राम वेगळाच आहे. माझ्यापेक्षा खूप वेगळा. मी इथे आपल्या घरात बसून अभ्यास करू शकतो पण त्याला मात्र रस्त्यावरच्या दिव्याखाली करावा लागतो. तो आई बरोबर मोलमजुरी करून कष्ट करतो पण मी मात्र नुसताच हुंदडतो. माझी काळजी सारं घर करतं पण त्याला घराची काळजी करावी लागते. त्याच्या आयुष्यात काहीतरी बनण्याचं ध्येय आहे. खरच तो वेगळा आहे ना आई ? भवतेक मीच त्याच्या लायकीचा नाही. एवढं बोलून सुमित उठतो.
आईच्या मनात काहूर माजत , त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिचे डोळे न कळत पाणावतात. समोरचं दृश्य धूसर होत गेलं तरी तिच्या मनात मात्र लख्ख उजेड पडतो. 
                                                            आनंद
                                                                  ३० मार्च २०१४     
     

No comments:

Post a Comment