Powered By Blogger

Wednesday, April 9, 2014

मनातून - भाग ४ : एकटेपणा





एकटेपणा नेहमी खायलाच उठतो असं नसतं. तुम्ही स्वतःशी संवाद साधायला त्याचा उपयोग करून घेऊ शकता. एरवी गर्दीत स्वतःचा हरवलेला आवाज कान देऊन ऐकला तरी ऐकू येत नाही. पण एकटेपणात मात्र तो स्पष्ट ऐकू येतो. त्या आवाजात कधी आपल्याच माणसांच्या आपल्यापर्यंत न पोहोचलेल्या आर्जवी हाका असतात, तर कधी आपल्याला त्यांच्या बद्दल वाटणारं प्रेम कुजबुजत असत , कधी स्वतःकडे त्रयस्थपणे बघणारी आपलीच नजर आपल्याला दोन शब्द सुनावते, तर कधी आजूबाजूच्या शांततेतून एखादी कौतुकाची थाप आपलाच आत्मविश्वास वाढवून जाते.  पण त्यासाठी माणसाला एकटेपणा एन्जॉय करता आला पाहिजे, ऐकायला सोपं असलं तरी ते तितक सहज नसतं. माणस स्वतःशी बोलायला घाबरतात ते उगीच नाही.  
मनाच्या तळाशी पोहोचलं कि खोली तर वाढत जाते पण प्रकाशही कमी होत जातो समुद्राच्या तळाशी होतं ना अगदी तसच. धूसर झालेल्या त्या चित्राचा अर्थ लावणं हीच खरी कसोटी असते. तिथे मग एखादं सुंदर स्वप्नवत वाटावं असं जग दिसतं तरी कधी अंधारात चाचपडताना भूतकाळाशी नातं असलेली शेवाळी सामोरी येतात. तिथंही स्वप्नांना आणि भूतकाळाला वर्तमान वास्तवांपासून दूर ठेवता यायला हवं, तेवढं जमलं कि अर्धी लढाई तिथेच संपते. मग उरतं ते स्वतःबद्दल कुठल्याही भ्रामक कल्पना नसलेलं नितळ मन.  ज्यात स्वतःच प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागतं आणि आयुष्यामधले सगळे प्रश्न गळून पडतात. एकटेपणाचा स्वतः जाणून घेण्यासाठी असा उपयोग किती जण करून घेतात ?
म्हणून मला वाटतं एकटेपणापासून पळण्यापेक्षा त्याला सामोर जाण अवघड असलं तरी तितकंच जास्त महत्वाचं आहे. 

गर्दीत जाऊन पुन्हा नव्या जोमानं आयुष्याशी दोन हात करण्यासाठी या एकटेपणाचा वापर करून घेता आला तर माणसाचं आयुष्य खरच पालटू शकतं. कळपापासून कधीच दूर न राहिलेल्या हरणाच्या पाडसा पेक्षा एकट राहून जग पाहून आलेलं एखादं पाडस बाहरेच्या जगातल्या अनुभवाच्या बळावर स्वतःचा जीव वाचवू शकत, जेव्हा इतर पाडसं मात्र जीव वाचवायला दुसऱ्याची मदतीची वाट पाहत बसतात. एकट राहून स्वतःच्या क्षमतेबद्दल मिळवलेला आत्मविश्वास गर्दीत येऊन स्वतःचं वेगळेपण टिकवायला मदत करतो. एकटेपणातून मिळालेली या पेक्षा मोठी देणगी कोणती ? 

९ एप्रिल २०१४
आनंद



1 comment:

  1. khup divasanniii asa kahi wachala..... mala awadala.... lihit ja...

    ReplyDelete