सुकन्या आज घरीच होती. तिने
ऑफिस ला आज सुट्टी टाकली होती. खूप दिवस झाले तिला बर वाटत नव्हतं तरीही तो तसेच
दिवस ढकलत होती. शेवटी आज निग्रहाने तिने सुट्टी घेतली. सकाळची कामे उरकली आणि आता
काय करावं हा प्रश्न तिला पडला. औषध घेऊन पडून राहावं असं वाटलंही पण इच्छा मात्र
झाली नाही. आई २ महिन्यापूर्वी गेल्या नंतर कदाचित पहिल्यांदाच ती घरी सुट्टी
काढून बसली होती. शोक करत घरी बसायची सुद्धा तिला उसंत मिळाली नव्हती. जवळ पासाचे
४-५ नातेवाईक तेवढे राहिले होते एक आठवडा, नंतर तेही गेले. मावशी परत येते म्हणाली
होती पण ती हि त्या नंतर फिरकली नाही. तसं एकट राहणं तिला काही नवीन नव्हतं पण
तरीही का कुणास ठेवूक आज तिला अस्वस्थ वाटत होतं. तेवढ्यात खिडकीत लावलेल्या
झाडांकडे तीच लक्ष गेलं, २ दिवस पाणी न घातल्याने ती सुकून चालली होती. ती लगबगीने
उठली आणि पाणी घालू लागली. आईने खूप हौशीने लावलेली झाडं अशी कोमेजेलेली पाहून
तिला भरून आला. आई असती तर आपल्याला चार शब्द नक्कीच सुनावले असते हे तिला जाणवलं.
पाणी घालतानाच तीच मन कुठे
दूर गेलं, भाऊ परदेशी स्थायिक झाला आणि आई
आणि आपण दोघेच एकमेकींना उरलो, प्रत्येक गोष्ट वाटून , बोलून विचार करून करायची
जणू दोघींना सवयच लागली. भाऊ गेल्यावर आई आपल्या समोर ढसाढसा रडलेली तिला आठवलं
,सुकन्ये तुझं लग्न कोण करून देणार गं असा भाबडा प्रश्न तिला पडला होता. आई, मी
फक्त तुला सांभाळणार आहे, मला लग्न करायचं नाही हे आपण तिला बोलल्यावर क्षणभर ती
सुखावली आणि दुसऱ्याच क्षणी हे तिला मान्य नाही म्हणून आपल्यावर तुटून पडली होती.
पण काळाने तिनेही माझा विरोध आहे म्हटल्यावर पुन्हा तो विषय काढला नव्हता.
मी नेहमी तिला म्हणायची आई
, गोठलेला मन आणि बर्फ दोन्ही सारखेच नाही का गं ? एक घाव दोघांना तोडू शकतो आणि
मायेची उब दोघांना वितळवू शकते. दोन्ही मार्गांनी मन मोकळं होतंच पहिल्या मार्गाने
ते आपल्या माणसाच्या खूप दूर जातं तर दुसर्याने ते जवळ येतं, निकाल तोच असला तरी
परिणाम दोन असू शकतात.
माझ्या एवढ्या बोलण्यावर ती
नुसती हसली होती. सुकन्ये तू फार विचार करतेस बघ. अग माया का अशी सांगून, मारून
मुटकून करता येते, ती उपजतच लागते बघ. रक्ताचं माणूस दूर जातं आणि परका जवळ येतं
तेव्हा कुठली शक्ती हे करते याचा विचार केलास तर तुला उमजेल काही काही नातीच अशी
असतात तिथे हे असं कसं हा प्रश्न येत नाही, गोष्टी घडायच्या तेव्हा घडतातच.
आई शाळेत शिक्षिका होती
तेव्हा ती मुलांची एवढी लाडकी का होती हे मला ती बोलायला लागली कि कळायचं . ती
बोलताना ठरवून कधीच बोलत नसे पण जे काही बोलत असे ते ठेव हृदयाला भिडे. शिक्षिका
असताना शेकडो मुलांना ती मदत करायची पण त्याचा साधा उल्लेख केलेलाही तिला अजिबात
आवडायचा नाही. जीवन खूप अनिश्चीत असत असं तीच ठाम मत होतं.
ती म्हणायची अनिश्चीतता खरं
तर जीवघेणी असते तरीही आयुष्यात क्षणाक्षणाला ती आपल्याला सामोरी येते आणि
आपल्याला तिला पार करावाच लागतं, कारण त्याच्याच पलीकडे आपल्याला हवं असणारं
तात्पुरत्या निश्चीततेचा जग असत. अनिश्चित आणि निश्चित या दोन गोष्टींमध्ये जे असत
तेवढंच खरतरं आयुष्य कारण तेवढ्याच काळात माणूस आयुष्याला अर्थ देणाऱ्या इतर
गोष्टी करायला मोकळा असतो.
आई असं काहीतरी बोलायची आणि
आपल्याला मात्र चांगलाच हुरूप चढायचा आणि एक दोन आठवड्यातच उतरायचा हे आठवून
सुकन्येला हसू आला. पण आई जे काही बोलायची ते किती खरं आणि वजनदार असायचं हे आठवून
तिला भरून आलं.
खिडकीतून बाहेर रस्त्याकडे
पाहत असतानाच तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हाताऱ्या आज्जी कडे
गेलं. तिला उगाचच उत्सुकता वाटली. काही वेळ सुकन्या तिथेच उभी राहिली. हातात एक पिशवी,
डोळ्यावर झाड चष्मा . नऊ वारी साडी, सुरकुतलेला चेहरा आणि सैरभैर नजर अशा अवस्थेत
ती म्हातारी बाई रस्त्याच्या कडेला बसली होती. हा नेहमीचाच रस्ता असल्यानं इथे
कोणी भिकारी बसत नाहीत हे सुकन्येला माहित होतं पण मग हि कुणाची वाट पाहत असावी
असं वाटलं आणि ती आत निघून गेली.
बऱ्याच वेळाने तिने पुन्हा
बाहेर पाहिलं तर ती म्हातारी बाई तिथेच. आता मात्र सुकन्येला अनावर झालं, ती हातात
कुलूप घेऊन बाहेर आली, दर ओढून कुलूप लावलं आणि खाली आली.
आजी तुम्ही कोणाची वाट पाहत
आहात का ? तिने आजीना विचारलं. आजीने
नुसताच पाहून मानेने नकार दिला. मग इथे काय करताय भर दुपारी ? मी दोन तासान पासून
पाहते आहे तुम्ही इथेच आहात, तुम्ही हरवला आहात का ? आजींच्या डोळ्यात टचकन पाणी
आला, नाही ग पोरी, मला इथे सोडून दिलाय माझ्या पोरानं त्यांना मी नकोशी झाले होते.
काय ?? सुकन्या चपापली..!
जग खूप पुढ गेलाय असं आपण म्हणतो आणि अजूनही असं काहीतरी पाहायला मिळत याचं तिला
नवल वाटलं. क्षणभर तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना.
ती म्हणाली तुम्ही जरा
माझ्या बरोबर चला मी इथेच समोर राहते. आधी आजीने नकार दिला पण सुकन्या त्यांना
घेऊनच आली. त्यांना एका खुर्चीत बसवून सुकन्या पाणी आणायला गेली. आजींची नजर
शून्यात होती. कदाचित त्यांना पोटच्या पोराने असं वागावं यावर विश्वास बसत नव्हता.
सुकन्या पाणी आणि थोडं
खायला घेऊन आली. पण आजी फक्त पाणी प्याल्या. आजी आता मला सविस्तर सांगता का नक्की
काय झालं ते ?
आज्जी बोलु लागल्या , पोरी काय
सांगू ? मला २ मुलं एक मुलगा आणि एक मुलगी, पती १५ वर्षापूर्वीच गेले. मी शाळेत
नोकरी करून मुलांची लग्न करून दिल. मी मुलाकड राहात होते. पण सुनेचा आग्रह थोडं
मुलीकडेही राहावं. म्हणून थोडेदिवस तिकडे गेले पण एकेदिवशी मुलीने स्पष्ट सांगितलं
आई आमच्या घरात आधीच जागा कमी तू आपली पुन्हा दादा कडे जा राहायला. म्हणून पुन्हा
परत आले. तेवढ्या कारणावरून सुनेने भांडण केलं, मुलगाही वाटेल तसा बोलला. मी गप्प
बसून सगळं ऐकून घेतलं. थोड्या दर १५ दिवसांनी मला अशी भांडणं ऐकावी लागायची. पण
गेल्या महिन्यापासून सून आणि मुलगा बरंच चांगलं वागू लागले होते मला वाटलं त्यांना
समज आली असावी. पण आज सकाळी मुलगा म्हणे आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तू हि चल.
७-८ दिवस जायचं आहे म्हणून कपडे पण बरोबर घ्यायला
लावले. थोड्यावेळाने एके ठिकाणी गाडी थाबवून मला उतरवलं आणि म्हणाला आम्ही आलोच ५
मिनिटात तू थांब इथेच आणि मला सोडून गेले. मी संध्याकाळ होई पर्यंत तिथेच थांबले
पण कोणीच आला नाही. शेवटी काल रात्री जवळच्या बागेत झाडाखाली झोपले आणि आज सकाळी
पुन्हा रस्त्यावर येऊन थांबले. मला काही कळत नव्हतं कुठे जावं. आयुष्य निरर्थक
वाटू लागलं. आजींचे डोळे पाण्याने डबडबले होते. सुकन्येने त्यांना सावरलं.
ती म्हणाली आजी तुम्ही काही
काळजी करू नका तुम्ही माझ्या इथे राहा. मी पाहते काय करायचं ते.
सुकन्या आत आली. तिच्या
डोळ्यातून पाणी आलं. चेहऱ्यावर पाणी मारून तिने आरशात पाहिलं. खरतर आपल्या माणसाचं
वय वाढलं कि माणूस अजून आपलं वाटायला हवं कारण सोबतीचे दिवस कमी होत आहेत याची
जाणीव झालेली असते आणि हातातून निसटलेल्या
क्षणांची कदर कळते. आई गेली तेव्हा आपण उन्मळून पडतो होतो ते त्याच मुळे पण इथे
तिला आजींच्या बाबतीत वेगळाच चित्र दिसत होतं. दोन टोकाचे अनुभव आणि आपण दोन्हीचे
साक्षीदार असं काहीसं तिचं झालं. तिने डोळे पुसले, थोडं पाणी प्यायला. आणि एक
निश्चय केला. आजीना मी सांभाळीन. कोण कुठल्या माहित नसल्या तरीही. आपल्या कडे
गमावण्या सारखा काहीच नाहीये जे काही आहे ते आई ने दिलेले संस्कार. आज आई असती तर
तिने नक्कीच आजींची मदत केली असती. याच विचारात ती बाहेर आली. तिने आजीनना स्वतःची
सगळी हकीगत सांगितली. आणि तिने घेतलेला निर्णय हि सांगितला.
ती म्हणाली , आजी तुमच्या
घरच्यांचा शोध घेणं हे काम पोलीस करतीलही पण घरचे तुम्हाला किती स्वीकारतील आणि
तुम्ही तिथे आनंदी राहू शकाल का हे महत्वाचं आहे आणि या परिस्थितीत मला असं वाटतं
कि तुम्ही परत जाऊ नये. ज्यांना तुम्ही नकोशा आहात तिथे पुन्हा जाणा उपयोगाचं
नाही. तुम्ही मला ओळखत नाही आणि मी हि तुम्हाला फारशी ओळखत नाही पण म्हणून सध्या
काही फरक पडत नाही. तुम्ही माझ्या इथे राहू शकता. मी एकटीच राहते. माझी आई २ महिन्या पूर्वीच गेली. आम्ही दोघी
इथे राहायचो. माणसाला माणसाची ओळख पुरेशी आहे.
तुमच्या रूपाने कदाचित मला पुन्हा एकदा आई भेटेल.
झाडाला येणारं एखादंच फुल
असं असत कि ज्याला जन्म देणाऱ्या झाडालाच वाहून घेण्याचं भाग्य मिळत फक्त त्याच
फुलाला आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद मिळत असावा. माझ्या आई ला वाहून घेण्याचं
भाग्य मला मिळालं होतं पण आता तुमच्या रूपाने अजून एक संधी मला नशिबाने दिली आहे.
आजी फक्त ऐकत होत्या. धूसर
झालेल्या डोळ्यातून त्यांना सुकन्या दिसतही नव्हती पण त्यांच्या थरथरत्या हाताला
सुकन्येनं केलेला स्पर्श जाणवत होता. आधार फक्त आपल्या माणसच देऊ शकतात हे
सुकन्येनं खोटं ठरवलं होतं. खिडकीतल्या
मगाशी पाणी घातलेल्या झाडाला थोडीशी तरतरी आली होती सुकन्या तिकडे पाहून सुखावली.
आनंद
३१ ऑगस्ट २०१४
खूपच छान लिहिलंय.....
ReplyDelete