घरात ४ महिन्याचा निषाद ,त्याच्यात अडकेला माझा जीव आणि मला कामासाठी
बाहेरच्या देशातल्या कंपनी मध्ये कामासाठी आलेलं बोलावणं या कात्रीत मी सापडलो आणि
मनाची नुसती घालमेल सुरु झाली. तब्बल ४५ दिवस कसा राहणार होतो मी या कल्पनेनेच
डोळ्यात पाणी तरळत होतं. सुरुवातीच्या या महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी काही नवीन
शिकणाऱ्या आणि आम्हालाही नवीन काहीतरी शिकवणाऱ्या त्या छोट्या जीवाला पाहताना श्रावणातल्या
सरी सारखं आनंदाने खळाळणारं माझं मन दूर जावं लागणार या जाणीवेने एकदम वादळाच्या
तडाख्याने हिरमुसलेल्या रानासारखं कावरं बावरं झालं. जाण्याची तारीख जशी कळली तसं
प्रत्येक क्षण त्या चिमुकल्या जीवाबरोबर घालवावा असाच वाटत होतं पण कामाच्या लोड
मुळे तेही शक्य होत नव्हतं. एकंदर काय मी आणि माझं मन शिडाच्या होडी सारखं हेलकावे
खात होतो.
या सगळ्यात सगळ्यात मोठी खंबीर साथ होती ती माझ्या बायकोची म्हणजेच
स्वातीची आणि माझ्या आई ची. घर घरातल्या बायकांमुळे उभं राहता आणि बाहेरच्या अथांग
आकाशाशी नातं जोडायला आपल्याला बाहेर पडता येतं हे त्रिवार सत्य आहे. हाच जोडणारा
दुवा मला दोघींच्या रूपाने मिळाला होता. सुरुवातीला मला जावं लागणार हि बातमी
समजल्यावर कदाचित (...नव्हे पक्कच..! )
त्यांनाही वाईट वाटलंच असणार, त्यांच्याही मनाची घालमेल झालीच असणार पण त्याची
थोडीही जाणीव न होऊ देता त्या दोघी फक्त मला सांभाळू पाहत होत्या. स्वतःला प्रचंड
भाग्यवान समजण्यासाठी एवढं कारण सुद्धा पुरेसा व्हावं आणि स्वतःचाच हेवा वाटावा इतकी
हि गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. हे असं सगळं आजूबाजूला घडत होतं आणि मी माझ्या
मनाची तयारी करू पाहत होतो.
जाण्याआधी अजून एक असाच अनुभव आला तो चक्क न्हाव्याकडे. एका रविवारी असाच
कटिंगला गेलो आणि केस कापणाऱ्या पोराशी बोलत असताना कळला कि तो फार खुश आहे कारण
तो बरोबर एका महिन्याने घरी जाणार आहे. माझी उत्सुकता वाढली म्हणून घरची चौकशी
केली तेव्हा तो म्हणाला साहेब घरी बायको आहे आणि एक वर्षाचा मुलगा. वर्षातून २
वेळा घरी जातो. वडील घरी जाऊ देत नाहीत कारण इथे धंदा बुडतो. अजून एक महिन्याने
मुलाला भेटेन म्हणून खूप आनंद झाला आहे. मी फक्त ऐकत होतो. पुढे तो बोलत राहिला पण
मी अलीकडेच अडकून पडलो आणि मला पुढचं
काहीच ऐकू आला नाही. तो आणि मी एकाच समुद्राच्या लाटांवर स्वार होतो , फरक एवढाच
होता त्याची लाट त्याला किनाऱ्याला घेऊन जाणार होती आणि माझी मात्र किनाऱ्यावरून
परतून दूर चालली होती. घरी जायला मिळणार म्हणून त्याला खूप आनंद झाला होता आणि मला
दूर जावं लागणार म्हणून दु:ख. आयुष्यात प्रत्येक वळणावर नवा अनुभव उभा असतो याचा
पुन्हा एकदा प्रत्यय आला, तो मी माझ्या शिदोरी मध्ये टाकला.
काही लोकांच्या ठाई कदाचित माझ्या
दु:खाला काही किंमत नव्हतीही किवा पुरुष
आहे म्हटल्यावर घरासाठी कष्ट घ्यावेच लागतात किंवा कष्टाशिवाय फळ मिळत नाही नाही ,
वगैरे उपदेशात्मक वाक्येही कुणी ऐकवली पण मला त्याने फरक पडला नाहीच आणि पडणारही
नव्हताच. पुरुष असूनहि आपल्या मनातल्या भावना मोकळे पणाने घरातल्या लोकां समोर
व्यक्त करता येत होत्या याचं जास्त समाधान होतं. मुळात भावना व्यक्त करायलाही
स्त्री आणि पुरुष असं भेदभाव म्हणजे करणं म्हणजे मला हवेतला ऑक्सिजन घेताना
स्त्रीलिंगी ऑक्सिजन आणि पुल्लिंगी ऑक्सिजन असा भेदभाव केल्या सारखं वाटतं.
अश्रू
खरतरं सामर्थ्याचं प्रतिक असू शकतात कारण ते बाहेर पडण्यासाठी आत हिम्मत असलेलं मन
असावं लागतं. अर्थात मी इथे लिहून उद्या
पासून तो समज पुसून टाकला जाणार आहे असं मुळीच नाहीये त्यामुळे हा विषय इथेच
सोडलेला बरा , असो...!
जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा खरतरं काही समजेनासं झालं होतं पण शेवटी मनाचा
निर्धार केला मन घट्ट केलं. बाहेर पडण्याआधी झोपी गेलेल्या माझ्या चिमुकल्या
निषादला डोळे भरून पाहून घेतलं. झोपेतून उठल्यावर रोज समोर येणारा चष्मा घातलेला
बाबा समोर येणार नाही आणि कडेवर घेऊन फिरवणार पण नाही याची किंचितही जाणीव
नसलेल्या त्या निरागस जीवाला पाहून मन गलबलून गेलं. तशाच अवस्थेत घर सोडलं आणि
निषाद चा हा बाबा दूर देशी निघून आला.
आई बापाला मुलं म्हणजे सर्वस्व असतात हे जरी सत्य असलं इवलाश्या कोवळ्या जीवाने लावलेली ओढ , संपूर्ण घराला दिलेला नवा
आकार, नात्यांमध्ये भरलेलं नवा रंग या सगळ्याच मला खूप अप्रूप वाटतं आणि हे सारं
कुठल्यातरी अनामिक शक्तीने भारलेलं आहे असं वाटत राहत. हे असे लहान कोवळे जीव मला
सकाळच्या कोवळ्या किरणांसारखे भासतात. निरागस आणि पारदर्शी. पहाटेची किरणं खूप
हळुवार येतात पण सारी श्रुष्टी त्याने जागी होते ,पक्षी किलबिलाट करतात, पाती
वाऱ्याने डुलतात, पाणी कोवळ्या उन्हाने चकाकतं आणि हे सारं आपसूक घडतं.
लवकरच हे विरहाचे दिवस संपतील आणि आयुष्याच्या अजून एका
वळणावर सुखाची लकेर उमटेल हा विश्वास आहेच फक्त गरज आहे काळाचे काही अजून थोडे
क्षण उलटण्याची.
"निषाद" चा बाबा
३१ मार्च २०१५
No comments:
Post a Comment