Powered By Blogger

Saturday, January 31, 2015

लघुकथा : आज्जीची फुलं



हिवाळ्यातली सकाळ. साधारण साडेनऊ दहाची वेळ. धावणारे रस्ते , पळणारी माणस, ओसंडून वाहणारे बस थांबे , शाळेला निघालेली मुलं, कामावर चालेलेले चाकरमाने , बाजूला भाजीवाल्यांच्या हातगाड्या तिथेच भाव करणाऱ्या गृहिणी, चौकात झालेलं ट्रेफिक जाम , ओरडणारे हॉर्न , कुठे बागेत जमलेला आजोबांचा कट्टा तर कुठे छोट्या मुलांचा चाललेला गलका. कुठल्याही शहरात लागू पडेल असं हे चित्र. याच चित्रात जणूकाही कुठेच नसणाऱरी मोठी आज्जी. हो मोठी आज्जीच. हेच तीचं नाव. कुणी ठेवलं हे खरतर कुणालाच माहित नाही . सडपातळ शरीर यष्टी, सावळा रंग, शुभ्र पांढरे केस, खणखणीत आवाज, वयानुसार कमकुवत झालेली नजर, हाताला अडकवलेली छोटी पिशवी. मोठी आजी एकटीच राहायची, याच वर्षी ती या छोट्या शहरात राहायला आली होती. याआधी एका मानलेल्या मुलीने त्यांना सांभाळल होतं पण आता तीच लग्न झाल्यावर त्या स्वतःहूनच बाहेर पडल्या. आज्जीला आता कुणीही नव्हतं, हा आता दुरच कुणीतरी नातेवाईक असावं पण तेवढ्या पुरतंच. तर आज मोठी आज्जी बाहेर पडली होती कारण  फार पूर्वी ती काम करत होती तिथल्या सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना भेटायला जायला. त्या डॉक्टर बाई याच शहरात आता स्वतःचा दवाखाना चालवतात असं आजीनं त्यांच्या मानलेल्या मुलीकडून कळलं होतं.


रस्त्याच्या कडेनी हळूहळू चालत आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टी कडे लक्ष न देत ती चालत होती. खूप वर्षांनी डॉक्टर बाई भेटणार म्हणून तशी ती आनंदात होती आणि कारण पण तसच होतं आज डॉक्टर बाईंचा वाढदिवस होता. आजी नेहमी त्यांना वाढदिवसाला गुलाबाची फुलं भेट द्यायची . आजही कोपऱ्यावर एक एक लहान मुलगी फुले विकत बसली होती , आजीने तिच्याकडून दोन गुलाबाची फुलं विकत घेतली. डॉक्टर बाईना गुलाबाचं फुल फार आवडायचं . जुन्या आठवणीत हरवलेल्या आजी दवाखान्या समोर आल्या. गेट उघडून आल गेल्या.  दवाखान्यात फार गर्दी नव्हती. तिथल्या काऊटर वर बसलेल्या रिसेप्शनिस्ट ला त्यांनी आपली ओळख सांगितली. आणि डॉक्टर बाईना भेटायचा निरोप पाठवायची विनंती केली.  रिसेप्शनिस्ट उठून आत गेली आणि तिने निरोप दिला. मोठ्या आजीना तिने बसायला सांगितलं. डॉक्टर बाई बाहेर आल्या, मोठ्या आजीला पाहून त्या थोड्या चपापल्या. पण आजीना फार आनंद झाला होता. त्या लगबगीने उठून पुढे झाल्या आणि बाईना शुभेच्छा दिल्या आणि गुलाबाची दोन फुलं हातात दिली. बाईंनी ती घेतली आणि त्यांचे आभार मानले, त्यांची विचारपूस केली आणि त्यांना बसायला सांगून आत गेल्या.  आजीला तहान लागली होती म्हणून ती पलीकडे कोपररयातल्या नळावर पाणी प्यायला गेल्या. तिथेच बाईंच्या खोलीची खिडकी होती. बाई आत जाऊन आपल्या नवऱ्याला सांगत होत्या कि मोठी आजी म्हणून काम करणाऱ्या एक बाई बाहेर आल्या आहेत. मला वाटतं आता आपण त्यांना काहीतरी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असावी. उगाच का एवढ्या वर्षा नंतर त्या आज अचानक आल्या. त्यावर तो म्हणाला काही नको उगाच तू त्यांना आता देशील आणि सारखी सवय लागेल. दोन गुलाबाची फुलं उगाच खूप महागात पडतील आपल्याला. त्या पेक्षा त्यांना काहीतरी खायला दे आणि जाऊ देत.
पाणी पिताना आजींच्या कानावर हे शब्द आले. त्यांची तहान मेली. त्या पुन्हा बाकावर जाऊन बसल्या. डॉक्टर बाई बाहेर आल्या त्यांनी आजीना खायला आणलं होतं. आजी नको म्हणाल्या. त्या उठल्या आणि मगाशी दिलेली फुलं परत मागितली. डॉक्टर बाईना काही कळेना. त्या आत जाऊन फुलं घेऊन आल्या. आजीनी फुलं परत घेतली. आजी बोलू लागली,  “तुम्हाला जी फुलं महाग पडतील असं वाटत आहे ती फुलं न देणंच चांगलं म्हणून ती परत घेते आहे. मी आले ते केवळ जुन्या आठवणींना स्मरून पण मला वाटतं काळ खूप पुढे गेलाय, प्रत्येक गोष्टीत स्वार्थच असला पाहिजे आणि आपणही प्रत्येक गोष्टीत स्वार्थच बघितला पाहिजे अशा प्रकारे जगायची सवय लागलेल्या जगात माझ्या फुलांची किंमत शून्य आहे.“
एवढं बोलून आजी बाहेर पडली. तो पर्यंत टळटळीत दुपार झाली होती. हवेत आता सकाळचा गारवा उरला नव्हता. चटका बसावा असं उन होतं. आजी पुन्हा आल्या रस्त्याने परत चालू लागली. मगाशी फुलं विकत घेतलेल्या मुलीपाशी येऊन त्यांनी ती फुलं परत केली. छोटी मुलगी म्हणाली आजी आम्ही एकदा दिलेली फुलं परत घेत नाही. आजीचा उदास चेहरा पाहून छोटी मुलगी पुढे झाली आणि फुलाचे पैसे परत देऊ लागली. आजीने तिच्या कडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली “असू देत तुला माझ्या कडून भेट आहेत असं समज.” एवढं बोलून आजी निघाली , आजूबाजूचं चित्र पुन्हा तेच होतं पण आजी मात्र त्यात दिसत नव्हती.



आनंद
३१ जानेवारी  २०१५

  

No comments:

Post a Comment