Powered By Blogger

Monday, June 6, 2016

पाऊस इथला ,पाऊस तिथला

मायदेश सोडून दुसरी कडे जाण्याची हि काही पहिली वेळ नाहीच. तसं पाहायला गेलं तर इटली हा चौथा देश ,पण तरीही दरवेळी नव्या देशातला एक नवीन अनुभव घराची ती ओढ आणि नाळ अजून घट्ट करत असतो.

यावेळी इटली मधल्या पावसाने मायदेशातल्या पावसाच्या आठवणी जाग्या केल्या, एकाच वेळी दोन्ही कडे बरसत असूनही इथे परक्या देशात बसून खिडकीतून बघताना तोच पाऊस आपला वाटला नाही आणि आठवला तो चिंब पाऊस जो माझ्या मायदेशातल्या अंगणात , दारात, गावात शहरात ,बरसणारा. लहरी असूनही प्रत्येकाला किती लोभस आणि हवाहवासा असतो तो, तेव्हा जाणवलं कि मुळात तो आपल्या साठी जीवनाचा भाग आहे नुसतीच निसर्गाची किमया नाही.

तो नुसताच बरसत नाही तर धरणी ला गंधाळून चोहीकडे एक ताजेपणा भरून जातो. दूर डोंगरावरून धबधब्यांना जन्म देतो तर कुठे नदीत मिसळून एकरूप होऊन जातो. कुठे शिवारातल्या कोरड्या मातीच्या ढेकळांना सुखावून नवं बीजांकुर रुजवतो.
त्याला सीमा नसते मनसोक्त कुठेही बरसावं अन वाटलं तर रुसून बसावं. कधी हलक्या सरींनी गारव्याला बोलवावं तर कधी बेभान वाऱ्यावर थेंबानी आरूढ होऊन तिक्ष्ण बाणांसारख तुटून पडावं.

त्याला अर्थात शब्दात बांधणं कठीण,
शेवटी पाऊस हा पाऊसच असतो पण त्याला थोड्या वेगळ्या अंगाने पाहिलं तर त्यानेही प्रत्येक देशाची संस्कृती , तिथला पेहराव किंवा अगदी मानसिकता आत्मसात केली आहे कि काय असं वाटत राहतं.

पाऊस इथला अर्थात इटली चा आणि पाऊस तिथला अर्थात मायदेशातला...

पाऊस इथला,
वेधशाळेची वेळ पाळणारा
नियमात बसून बरसणारा,
पण तरीही,
व्हायोलिन च्या स्वरांसारखं
मनाच्या तारा छेडणारा...!

पाऊस तिथला,
भटक्या उनाड ढगांचा
वाटेल तिथे रेंगाळणारा,
गंधाळ ओल्या मातीचा,
हलक्या मधुर सुरांचा...!   ||1||

पाऊस इथला,
एकटा दुर्लक्षित,
सतत नाती शोधणारा
बरसून गेल्यावर सुद्धा
पाऊलखुणा मिटवणारा..!

पाऊस तिथला,
प्रार्थनेत, स्वप्नात
सतत डोकावणारा..
नद्या डोह शेत तलाव
साऱ्यात जीव ओतणारा..! ||2||

पाऊस इथला,
हुशार व पुढारलेला
हिशोबी आणि व्यवहारी..
वीज वादळ साऱ्याला
अंतर ठेवी दारी...!

पाऊस तिथला,
अडाणी अन निस्वार्थी
काहीच नसे स्वतःसाठी,
पाखरं, झाडं ,डोंगरांशी
बांधे रेशीमगाठी..!  ||3||

पाऊस इथला,
मुका आणि अलिप्त
एकटाच बरसणारा,
चिंब भिजवायला ,
आसुसलेला...!
 
पाऊस तिथला
चिखल माती पाण्याचा ,
कंदिलाच्या वातीचा,
चुली पुढल्या रात्रीच्या ,
सुखावणारया घासाचा..!


आनंद
5 जून 2016


1 comment: