नको नभा तो तुझा पसारा
नको पर्वता तुझा नजारा
अफाट तुझिया दुनियेमध्ये,
एकही घरटे नसे पामरा....!
नको सागरा तुझा किनारा
नको दिशांचा तोच इशारा
धुंडाळूनी या जगास साऱ्या,
एकटाच तो फिरतो वारा....!
इथेच थांबून वळतो आता
इथेच थांबून जगतो आता
हरवून गेले तेच शोधतो
विसरून गेले ते आठवतो..!
हिशोब सारा इतका सोपा
अवघड उगाच करुनी बसलो,
उगा धावून काय मिळवले
चैन जीवाचा गमवुनी बसलो..!
सावलीत या सुखावतो अन,
ओंजळीत या घेतो माती...
विहीर अजून ती तशीच ओली,
कवेत घेतो काळे मोती...
कुठे झऱ्याची मंजुळ गाणी
कुठे वाहते नितळ पाणी,
कुठे डोलते एकच पाते
जगास साऱ्या ते न्याहळते..!
प्रकाश खेळे लपंडाव अन
कधी सरी या डाव साधती,
ओथंबून हि पाने हिरवी
त्या तालावर स्वैर नाचती...
मुक्त पहाटे दिसे पाखरू,
बंधन त्याला नसे उडाया,
सांजवेळ हि येता दाटून,
घरट्यातच मग मिळते माया,
निसर्ग सांगे कसे वहावे
कसे लुटावे त्याचे देणे,
द्यावे घ्यावे आनंदाने,
अन नांदावे सोबतीने...!
साधे सोपे सरळ जगावे
नकोच खोटा तो देखावा,
श्वासाचे ते गणित नसावे,
जगण्याला या अर्थ द्यावा....!
आनंद
30 सप्टेंबर 2016
No comments:
Post a Comment