Powered By Blogger

Monday, September 30, 2013

पत्रास कारण कि ......


पत्र लिहायला बसलोय खरा, पण बऱ्याचदा होतं तसं या वेळीही काय लिहावं हे काही ठरवलं नाही. हा विचार मनात आला आणि मग जाणवलं कि कित्येक वर्षात कुणाला पत्रच लिहिलं नाहीये आणि कुणाचं पत्र वाचलं सुद्धा नाहीये. मग म्हटलं स्वतःच्या मनालाच पत्र लिहायचा प्रयत्न करून पाहावा. काय हरकत आहे नाही का ? 

खरतर पत्र म्हणजे नक्की काय असत ? मनातले संवादात न मावणारे शब्द कागदावर उतरवण्याचे साधन म्हणजे पत्र. असं मला वाटतं. मुळात हल्ली माणसाचं स्वतःशी बोलणच बंद झालंय. काहीकाही गोष्टी आपण कुणाशीच बोलत नाही. अगदी स्वतःशी सुद्धा. मग म्हटलं अशाच शब्दांना वाट करून द्यावी. आणि मोकळं व्हावं. थोडासा आतल्या मनाशी हितगुज करावी , त्रयस्थ पणे त्याच्या कडे बघून पाहावं , कदाचित त्यातूनही काहीतरी गवसेलच कि. आणि नाहीच गवसलं तरी समाधान मात्र नक्कीच मिळेल.

 
माझ्या प्रिय मनास ,

तू अनेक कित्येक वर्ष भल्याबुरया परिस्थितीत साथ दिलीस. खूप त्रासही करून घेतलास. कधी मुक्त होऊ दिलंस ,तर कधी बंधनात बांधून ठेवलंस, पण कधीही एका शब्दाने तक्रार केली नाहीस कि असहकार पुकारला नाहीस. त्यासाठी आधी तुझे खूप खूप आभार. खरतर नुसते आभार मानून काही फारसा फरक पडणार नाही पण हे आभार खरच मनापासून आहेत.  J अरे हे काय, पण मी तर मनाशीच बोलतो आहे ना ?  मग असं म्हणतो कि माझ्या अगदी अंत:करणापासून आहेत. तुझी साथ नसती तर कदाचित आत्ता पर्यंतचा प्रवासही शक्य झाला नसता. प्रत्येक वळणावरची दरी फक्त तुझ्या मुळे पार झाली.  तू कुठे राहतोस हे मला माहित नाही. पण तुझं अदृश्य अस्तित्व पावलोपावली जाणवत राहता हे मात्र नक्की. कधी कधी समोर न दिसणाऱ्या गोष्टीच जास्त परिणाम करतात ना मला हा त्यातलाच प्रकार वाटतो. 
चपळ, चंचल, भावूक, कणखर, नाजूक, जिद्दी, हट्टी, प्रेमळ, रागीट अशी एक न दोन कितीत्तरी विशेषणं तुझ्या बाबतीत वापरली जातात. आणि तुझ्या या विशेषणांनी तेवढ्या पुरता का होईना मलाही ओळखलं जातं. ती खरतर माझीच ओळख होऊन जाते. पण मला आश्चर्य वाटतं ते तुझं , इतक्या भावनांचं संमेलन भरलेलं असताना तू स्वतःची ओळख माझ्यावर लादत नाहीस. ती स्वीकारणं तू खुशाल माझ्यावर सोडून देतोस. स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीचं भांडवल करणाऱ्या या जमान्यात तुझं हे निस्वार्थी वागणं मला खरच भावून जातं. तुला वेगळा करून मी माझा विचारच करू शकत नाही हे कदाचित त्याच मुळे. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी तू मात्र गूढच होताच ,आहेस आणि पुढेही राहशील. सगळ्याच गोष्टी माणसाला कळल्या तर त्या मला वाटतं कदाचित जगण्याचा अर्थच निघून जाईल. त्यामुळे तू आहेस तसाच रहा. 
अगदी गूढ ,  अथांग.......!



 बाकी तू एक गोष्ट मात्र सुधारली पाहिजेस हं , आणि ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं. मला माहित आहे कि रोज तुझ्या मागे हजार गोष्टी लागलेल्या असतात पण याचा अर्थ असा नाही कि तू पूर्ण पणे त्यातच वाहून जावस. कधी कधी हात वर करून एखाद्या गोष्टीला खुशाल नाही म्हणत जा. इतकी दमछाक का म्हणून करून घ्यायची ?  आम्ही माणसे सुद्धा स्वतःला झेपेल तेवढीच कामे करतो. कधी कधी मर्यादा ओलांडून काम करतोही पण ते तेवढ्या पुरता. तू मात्र अविश्रांत राबत राहतोस. त्यासाठी काहीतरी कर बाबा. मी तुझ्यावर खूप जास्त दबाव टाकला कि खुशाल झिडकारून लावत जा. अगदी मधून मधून सुट्टी घेऊन दूर कुठे फिरुन सुद्धा येत जा. हवापालट तुलाही हवाच कि. मला माहितीय अनोळखी रस्त्यावर भटकायला तुला फार आवडतं. कधी कधी खूप दूर भटकत गेलं ना कि एखादं नवीन शिखर दिसतं तर कधी एखादी नवी पायवाट सापडते. तू खुशाल अशा पायवाटा धुंडाळत फिरत जा. कारण तुझ्या त्या हरवण्यात मला बरंच काही गवसत असत.
 
आयुष्यातल्या आव्हानांना सामोरा जाताना तुझी अशीच साथ राहील यात शंकाच नाही पण तुला हव्या असणाऱ्या गोष्टीही तू माझ्या मार्फत पूर्ण करून घेत जा. शेवटी म्हणतात ना “Two is company “. आपल्याला अजून एकमेकान सोबत आयुष्य काढायचा आहे. त्यामुळे एकमेकांना जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. बाकी आता फार लिहित बसत नाही.
मधून मधून मी पत्र लिहित जाईन. तुला जमेल तसं उत्तर पाठवत जा. घाई नाही. 
बाकी इकडे सगळं क्षेमकुशल आहे. काळजी घे. निरागसता जप आणि नितळ रहा. चल बोलू नंतर.

                                                                     तुझाच आनंद 




Saturday, August 24, 2013

मनातून - भाग १






मनसोक्त रडावं वाटलं, खूप भरभरून बोलावं वाटलं, निस्तब्ध शांतता अनुभवावी वाटली, जोरात आरोळी ठोकावी वाटली , खूप मोठं काहीतरी करावं वाटलं तर माणसाने समुद्राकडे जावं. जगाच्या पाठीवर त्याच्या इतकं मोठं कुणी नाही. आणि मोठं असूनही जमिनीशी असलेलं नातं जपणारं सुद्धा दुसरं कोणी नाही. विस्तीर्ण क्षितीज समोर पसरलेलं असून सुद्धा फक्त भरती ओहोटीला हाताशी धरून खळाळणारा समुद्र पहिला कि मला नेहमी प्रश्न पडतो कि मोठे पण नक्की कशात असतं आणि ते टिकून ठेवणं खरंच इतकं अवघड असतं का ? खळाळनाऱ्या लाटांनी जिवंतपणाची साक्ष देणारा समुद्र मला कित्येक पटीनी महान वाटतो.  
मग उमगतं कि समुद्राला मोठेपण मिळत ते समर्पणातून. मनातला अहंकार, स्वार्थ बाजूला सारून आयुष्याला साद घालत राहिलं कि ते आपोआप मिळत. प्रत्येकवेळी आलेल्या क्षणाला सामोरा जाताना त्याचा अर्थ आपणच लावावा लागतो. तिथे दुसरा पर्याय नसतो.  तरीही प्रत्येक गोष्टीचा अर्थ आपणच दर वेळी लावायचा सुद्धा कंटाळा येतोच की , तेव्हा मग समोरच्या व्यक्तीने आपणहून हात दिला तर उगाचच त्या मोठेपणातून मुक्त झाल्यासारखं वाटतं.
अशा मुक्तेतेच्या क्षणांची ओढ जेवढी जास्त तेवढे तुम्ही आनंदी होता आणि पण जो पर्यंत जीवाभावाचं माणूस तुमची तगमग ओळखत नाही तो पर्यंत मात्र मोठेपणाचं ओझं तुम्हालाच वहावं लागतं. हे ओझं जितकं जास्त तितके तुम्ही एकाकी. म्हणून आयुष्यात आपलं माणूस लागतं. जिथं व्यक्त होता येईल असं. तिथे त्रयस्थ पणे पाहणाऱ्या माणसा सारखं परकेपण नसतं. तर स्वतःहून दिलेली साद असते. आपल्या माणसाला जेवढी लवकर ही साद ऐकू जाईल तितकं चांगलं. नाहीतर ऐकू येत असून बहिरेपण आलेली माणसे कधीच दुसऱ्याच ओझं वाहू शकत नाहीत.
माणूस कधी कधी अबोला धरतो तेव्हा प्रत्येकवेळी जगबुडी होईल इतकी मोठी कारणं नसतातही खरतरं तेव्हा माणसाला हवी असते आपल्या माणसाने ओझं कमी करण्यासाठी दिलेली साथ. इतरांना कळत नसलं तरी मला कळतंय हा दिलासा देणारं माणूस. ती साथ मिळाली नाही की तो खट्टू होतो. चीडचीड करतो. आजूबाजूच्या लोकांना मात्र तो उगाच केलेला त्रागा वाटत राहतो. त्यातून तो अजून एकाकी होतो. अशातच मग गर्दीतून कोणी येऊन त्याला हात देतं. इतरांपेक्षा तो गर्दीतला हात त्याला जवळचा वाटू लागतो. मोकळं व्हायला, मुक्त व्हायला तो मदत करतो. आणि इतरांच्या पेक्षा ते माणूस आपल्याठाई खूप मोठं होतं. माणसाचा जन्म हा एक चमत्कार आहे तो काही उगीच नाही, साडेपाच सहा फुटाच्या देहाला चालवणार अदृश्य मन अजून कुणालाच उमगलं नाही कारण त्याचा ठाव लागणं केवळ अशक्य आहे.

आपल्या पोटात इतकं काही साठवून वरून मात्र सतत हसणारा समुद्र आणि माणसाचा देह या दोन्ही गोष्टी खरंतर सारख्याच आहेत. समुद्र स्थितप्रज्ञ राहून सगळं काही सहन करत राहतो मात्र माणसाला ते दरवेळी जमतच असं नाही.





                                                            आनंद
२४ ऑगस्ट २०१३