Powered By Blogger

Thursday, October 31, 2013

मनातून भाग २



आज वसुबारस. दिवाळी आज सुरु झाली. प्रकाशाचा उत्सव दिवाळी. अगदी लहान पणापासून दिवाळी सगळ्यांनाच आवडते. मलाही लहान पण पासून दिवाळीचं खूप अप्रूप वाटे. पेपर संपवून कधी एकदा सुट्टी लागते असं व्हायचं. किल्ले करणे, फटाके उडवणे, फराळावर डल्ला मारणे आणि आई आणि आजी बरोबर चकल्या कडबोळे करणे , नुसती धमाल. लहानपणीची दिवाळी जशी वेगळी होती तशीच वय वाढता वाढता दिवाळी जास्तच कळू लागली. फटाक्यांच अप्रूप जाऊन मग मला दिवाळी आवडू लागली ती दिवाळीतल्या प्रकाश पसरवणाऱ्या पणत्यामुळे . पहाटेचा काळाकुट्ट अंधार असो  किंवा मग तिन्ही सांजेचा मंद संधी प्रकाश असो पणत्या लावल्या की सगळंच उजळून जायचं. 
 



वाऱ्याच्या झोतावर डुलणारी पणतीची ज्योत कधी रागावून डोळे मोठे करून बघायची, तर कधी तुरुतुरु पळणाऱ्या लहान मुली सारखी खुदकन हसायची , कधी स्वतःच्याच धुंदीत डोलायची ,तर कधी विझता विझता पुन्हा उंच उभी राहायची, कधी गोलगोल गिरक्या घ्यायची, तर कधी शांत स्तब्ध भासायची. मला मात्र कौतुक वाटायचं ते तिच्या या वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ट्यांच. प्रकाशाचा उत्सव म्हणजे काय हे खरतरं तिनंच मला शिकवलं. कधी खिडकीत,  उंबऱ्याच्या कडेला, तुळशी वृंदावनाजवळ, कधी रांगोळी जवळ , कुठेही ठेवली की ती तिथली होऊन जायची. कधीकधी मला वाटायचं वर बांधलेला आकाश कंदील पणतीला हिणवतोय पण पणती मात्र खूप नितळ पणे तेवत राहायची. तिला न स्वतः बद्दल गर्व होता न इतरांबद्दल असूया. दिलेला काम मात्र ती नेटाने करायची. एखाद्या घरासमोर तर हातात हात घालून पणत्यांची मोठी रांग जणू काही समूह गान करते आहे असं वाटायचं , तर कुठे एखाद्या घराच्या कोनाड्यात एकटी तेवणारी पणती जणू ध्यानस्थ बसलेली दिसायची.



एकदा मी वाऱ्याशी झुंज देणाऱ्या एका पणतीला पाहिलं , इवल्याश्या वातीने ती सोसाट्याच्या वाऱ्याशी लढू पाहत होती. मला वाटून गेलं कुठून येत असेल हे बळ तिच्यात ? मग कळल मुळात पणतीला हे संकट आहे हेच कळलेलं नसतं, आपण विझलो तर आजूबाजूला अंधार पसरेल हे एकच ध्येय नकळत तिला संकटांमधे तग धरून ठेवायला मदत करत होतं. स्वतःचं आयुष्य इतरांना अर्पण करून तेवणारी पणती माझ्या नजरेत कधीच खूप मोठी झाली होती.
जसं समुद्राला, आकाशाला मोठेपण आपोआप मिळत तसं नशीब पणतीच नव्हतं पण तरीही ती माझ्या ठाई मोठीच होती आणि अजूनही आहे. आयुष्याच्या अनेक वळणांवर निराशेच्या अंधारातून तिची तेवणारी मंद वात आठवली की पुन्हा नवा हुरूप येतो आणि मन पुन्हा पेटून उठते.
 

आता जग खूप बदललंय. शेकडो आकाश कंदील, दिव्यांच्या माळा यांनी बाजारपेठा गजबजू लागल्यात . अनेक प्रकारच्या पणत्या बाजारात मिळतायेत. लाईट वर चालणाऱ्या, लुकलुकणाऱ्या, आपल्याला हव्या तश्या प्रकारे डुलणाऱ्या, एकाच पणतीत ३-४ किंवा १०-१२ वाती असणाऱ्या. अशा अनेक पणत्या दिसतायेत. अशा दिव्यांनी अनेक घरं उजळून जात आहेत. प्रकाशाचा उत्सव खरोखर दिपावणारा होत चाललाय.
मात्र या पणत्या बोलत नाहीत त्यांना न वाऱ्याशी झुंज द्यावी लागते न तेल घालण्याची वाट बघावी लागते. मालकाने म्हणेल तसं लुक्लुकायचं किंवा डोळ्यांची उघडझाप करायची इतकंच त्यांना जमतं. मालक खुपच हौशी असेल तर एका पेक्षा जास्त रंगांच्या दिव्यांची आरास सुद्धा दिसते. पण जिथे हुंकारच नाही तिथे संवादाचा प्रश्नच येत नाही. निर्जीव प्रकाशाच्या खेळण्यांनी सगळी अंगणे हल्ली उजळून जातात. डोळे दिपवणारया दिव्यांच्या प्रकाशात पणतीचा प्रकाश कोणालाच दिसत नाहीये.
हे सगळं असलं तरीही हरवत चाललेत ते पणतीला उजळवणारे ज्योत पेटवणारे हात,  दारातली पणती विझु नये म्हणून लक्ष देऊन तेल घालणारी आजी आणि नातवंडं.
परवा असंच एकेठिकाणी शंभर दोनशे दिव्यांची आरास दिसत होती ,यांत्रिक पणे तेवणारे निर्जीव दिवे खूप लोक उत्सुकतेने पाहत होते. तेवढ्यात वीज गेली आणि यांत्रिक दिवे बंड पडले आणि सगळीकडे अंधार पसरला. आता काय करायचं हा प्रश्न पडे पर्यंत जवळच्या घरा समोर असलेल्या पणतीचा प्रकाश सगळ्यांना दिसला. त्या अंधारातही लक्ख प्रकाश पडावा असं वाटून गेलं. प्रकाशाचा सोहळा खऱ्या अर्थाने साजरा झाला होता. शेवटी ज्योत कितीही छोटी असली तरी अंधाराला सामोरं जाण्याचं बळ तिच्यातच असतं आणि म्हणूनच शेवटी तीच साऱ्या अंधाराचा ठाव घेते आणि प्रकाशाला वाट करून देते.
हजार दिवे लावून आसमंत उजळवून टाकण्यापेक्षा एक पणती लावून प्रकाशाला अंधारावर मात करू दिली तर तिचा प्रकाश जास्त वेळ साथ देईल आणि आशेचे अनेक किरण अशी अनेक आयुष्य सार्थकी लावतील. चला तर मग नवीन दीप लावूया पण असे की जे आपले मार्ग प्रकाशित करतील.

आनंद
३१ ऑक्टोबर २०१३ 



 

Monday, September 30, 2013

पत्रास कारण कि ......


पत्र लिहायला बसलोय खरा, पण बऱ्याचदा होतं तसं या वेळीही काय लिहावं हे काही ठरवलं नाही. हा विचार मनात आला आणि मग जाणवलं कि कित्येक वर्षात कुणाला पत्रच लिहिलं नाहीये आणि कुणाचं पत्र वाचलं सुद्धा नाहीये. मग म्हटलं स्वतःच्या मनालाच पत्र लिहायचा प्रयत्न करून पाहावा. काय हरकत आहे नाही का ? 

खरतर पत्र म्हणजे नक्की काय असत ? मनातले संवादात न मावणारे शब्द कागदावर उतरवण्याचे साधन म्हणजे पत्र. असं मला वाटतं. मुळात हल्ली माणसाचं स्वतःशी बोलणच बंद झालंय. काहीकाही गोष्टी आपण कुणाशीच बोलत नाही. अगदी स्वतःशी सुद्धा. मग म्हटलं अशाच शब्दांना वाट करून द्यावी. आणि मोकळं व्हावं. थोडासा आतल्या मनाशी हितगुज करावी , त्रयस्थ पणे त्याच्या कडे बघून पाहावं , कदाचित त्यातूनही काहीतरी गवसेलच कि. आणि नाहीच गवसलं तरी समाधान मात्र नक्कीच मिळेल.

 
माझ्या प्रिय मनास ,

तू अनेक कित्येक वर्ष भल्याबुरया परिस्थितीत साथ दिलीस. खूप त्रासही करून घेतलास. कधी मुक्त होऊ दिलंस ,तर कधी बंधनात बांधून ठेवलंस, पण कधीही एका शब्दाने तक्रार केली नाहीस कि असहकार पुकारला नाहीस. त्यासाठी आधी तुझे खूप खूप आभार. खरतर नुसते आभार मानून काही फारसा फरक पडणार नाही पण हे आभार खरच मनापासून आहेत.  J अरे हे काय, पण मी तर मनाशीच बोलतो आहे ना ?  मग असं म्हणतो कि माझ्या अगदी अंत:करणापासून आहेत. तुझी साथ नसती तर कदाचित आत्ता पर्यंतचा प्रवासही शक्य झाला नसता. प्रत्येक वळणावरची दरी फक्त तुझ्या मुळे पार झाली.  तू कुठे राहतोस हे मला माहित नाही. पण तुझं अदृश्य अस्तित्व पावलोपावली जाणवत राहता हे मात्र नक्की. कधी कधी समोर न दिसणाऱ्या गोष्टीच जास्त परिणाम करतात ना मला हा त्यातलाच प्रकार वाटतो. 
चपळ, चंचल, भावूक, कणखर, नाजूक, जिद्दी, हट्टी, प्रेमळ, रागीट अशी एक न दोन कितीत्तरी विशेषणं तुझ्या बाबतीत वापरली जातात. आणि तुझ्या या विशेषणांनी तेवढ्या पुरता का होईना मलाही ओळखलं जातं. ती खरतर माझीच ओळख होऊन जाते. पण मला आश्चर्य वाटतं ते तुझं , इतक्या भावनांचं संमेलन भरलेलं असताना तू स्वतःची ओळख माझ्यावर लादत नाहीस. ती स्वीकारणं तू खुशाल माझ्यावर सोडून देतोस. स्वतःच्या मालकीच्या प्रत्येक गोष्टीचं भांडवल करणाऱ्या या जमान्यात तुझं हे निस्वार्थी वागणं मला खरच भावून जातं. तुला वेगळा करून मी माझा विचारच करू शकत नाही हे कदाचित त्याच मुळे. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी तू मात्र गूढच होताच ,आहेस आणि पुढेही राहशील. सगळ्याच गोष्टी माणसाला कळल्या तर त्या मला वाटतं कदाचित जगण्याचा अर्थच निघून जाईल. त्यामुळे तू आहेस तसाच रहा. 
अगदी गूढ ,  अथांग.......!



 बाकी तू एक गोष्ट मात्र सुधारली पाहिजेस हं , आणि ती म्हणजे स्वतःची काळजी घेणं. मला माहित आहे कि रोज तुझ्या मागे हजार गोष्टी लागलेल्या असतात पण याचा अर्थ असा नाही कि तू पूर्ण पणे त्यातच वाहून जावस. कधी कधी हात वर करून एखाद्या गोष्टीला खुशाल नाही म्हणत जा. इतकी दमछाक का म्हणून करून घ्यायची ?  आम्ही माणसे सुद्धा स्वतःला झेपेल तेवढीच कामे करतो. कधी कधी मर्यादा ओलांडून काम करतोही पण ते तेवढ्या पुरता. तू मात्र अविश्रांत राबत राहतोस. त्यासाठी काहीतरी कर बाबा. मी तुझ्यावर खूप जास्त दबाव टाकला कि खुशाल झिडकारून लावत जा. अगदी मधून मधून सुट्टी घेऊन दूर कुठे फिरुन सुद्धा येत जा. हवापालट तुलाही हवाच कि. मला माहितीय अनोळखी रस्त्यावर भटकायला तुला फार आवडतं. कधी कधी खूप दूर भटकत गेलं ना कि एखादं नवीन शिखर दिसतं तर कधी एखादी नवी पायवाट सापडते. तू खुशाल अशा पायवाटा धुंडाळत फिरत जा. कारण तुझ्या त्या हरवण्यात मला बरंच काही गवसत असत.
 
आयुष्यातल्या आव्हानांना सामोरा जाताना तुझी अशीच साथ राहील यात शंकाच नाही पण तुला हव्या असणाऱ्या गोष्टीही तू माझ्या मार्फत पूर्ण करून घेत जा. शेवटी म्हणतात ना “Two is company “. आपल्याला अजून एकमेकान सोबत आयुष्य काढायचा आहे. त्यामुळे एकमेकांना जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. बाकी आता फार लिहित बसत नाही.
मधून मधून मी पत्र लिहित जाईन. तुला जमेल तसं उत्तर पाठवत जा. घाई नाही. 
बाकी इकडे सगळं क्षेमकुशल आहे. काळजी घे. निरागसता जप आणि नितळ रहा. चल बोलू नंतर.

                                                                     तुझाच आनंद