Powered By Blogger

Sunday, August 31, 2014

लघुकथा : झाडाला वाहिलेलं फुल

सुकन्या आज घरीच होती. तिने ऑफिस ला आज सुट्टी टाकली होती. खूप दिवस झाले तिला बर वाटत नव्हतं तरीही तो तसेच दिवस ढकलत होती. शेवटी आज निग्रहाने तिने सुट्टी घेतली. सकाळची कामे उरकली आणि आता काय करावं हा प्रश्न तिला पडला. औषध घेऊन पडून राहावं असं वाटलंही पण इच्छा मात्र झाली नाही. आई २ महिन्यापूर्वी गेल्या नंतर कदाचित पहिल्यांदाच ती घरी सुट्टी काढून बसली होती. शोक करत घरी बसायची सुद्धा तिला उसंत मिळाली नव्हती. जवळ पासाचे ४-५ नातेवाईक तेवढे राहिले होते एक आठवडा, नंतर तेही गेले. मावशी परत येते म्हणाली होती पण ती हि त्या नंतर फिरकली नाही. तसं एकट राहणं तिला काही नवीन नव्हतं पण तरीही का कुणास ठेवूक आज तिला अस्वस्थ वाटत होतं. तेवढ्यात खिडकीत लावलेल्या झाडांकडे तीच लक्ष गेलं, २ दिवस पाणी न घातल्याने ती सुकून चालली होती. ती लगबगीने उठली आणि पाणी घालू लागली. आईने खूप हौशीने लावलेली झाडं अशी कोमेजेलेली पाहून तिला भरून आला. आई असती तर आपल्याला चार शब्द नक्कीच सुनावले असते हे तिला जाणवलं.
पाणी घालतानाच तीच मन कुठे दूर गेलं,  भाऊ परदेशी स्थायिक झाला आणि आई आणि आपण दोघेच एकमेकींना उरलो, प्रत्येक गोष्ट वाटून , बोलून विचार करून करायची जणू दोघींना सवयच लागली. भाऊ गेल्यावर आई आपल्या समोर ढसाढसा रडलेली तिला आठवलं ,सुकन्ये तुझं लग्न कोण करून देणार गं असा भाबडा प्रश्न तिला पडला होता. आई, मी फक्त तुला सांभाळणार आहे, मला लग्न करायचं नाही हे आपण तिला बोलल्यावर क्षणभर ती सुखावली आणि दुसऱ्याच क्षणी हे तिला मान्य नाही म्हणून आपल्यावर तुटून पडली होती. पण काळाने तिनेही माझा विरोध आहे म्हटल्यावर पुन्हा तो विषय काढला नव्हता.
मी नेहमी तिला म्हणायची आई , गोठलेला मन आणि बर्फ दोन्ही सारखेच नाही का गं ? एक घाव दोघांना तोडू शकतो आणि मायेची उब दोघांना वितळवू शकते. दोन्ही मार्गांनी मन मोकळं होतंच पहिल्या मार्गाने ते आपल्या माणसाच्या खूप दूर जातं तर दुसर्याने ते जवळ येतं, निकाल तोच असला तरी परिणाम दोन असू शकतात.
माझ्या एवढ्या बोलण्यावर ती नुसती हसली होती. सुकन्ये तू फार विचार करतेस बघ. अग माया का अशी सांगून, मारून मुटकून करता येते, ती उपजतच लागते बघ. रक्ताचं माणूस दूर जातं आणि परका जवळ येतं तेव्हा कुठली शक्ती हे करते याचा विचार केलास तर तुला उमजेल काही काही नातीच अशी असतात तिथे हे असं कसं हा प्रश्न येत नाही, गोष्टी घडायच्या तेव्हा घडतातच.
आई शाळेत शिक्षिका होती तेव्हा ती मुलांची एवढी लाडकी का होती हे मला ती बोलायला लागली कि कळायचं . ती बोलताना ठरवून कधीच बोलत नसे पण जे काही बोलत असे ते ठेव हृदयाला भिडे. शिक्षिका असताना शेकडो मुलांना ती मदत करायची पण त्याचा साधा उल्लेख केलेलाही तिला अजिबात आवडायचा नाही. जीवन खूप अनिश्चीत असत असं तीच ठाम मत होतं.
ती म्हणायची अनिश्चीतता खरं तर जीवघेणी असते तरीही आयुष्यात क्षणाक्षणाला ती आपल्याला सामोरी येते आणि आपल्याला तिला पार करावाच लागतं, कारण त्याच्याच पलीकडे आपल्याला हवं असणारं तात्पुरत्या निश्चीततेचा जग असत. अनिश्चित आणि निश्चित या दोन गोष्टींमध्ये जे असत तेवढंच खरतरं आयुष्य कारण तेवढ्याच काळात माणूस आयुष्याला अर्थ देणाऱ्या इतर गोष्टी करायला मोकळा असतो.
आई असं काहीतरी बोलायची आणि आपल्याला मात्र चांगलाच हुरूप चढायचा आणि एक दोन आठवड्यातच उतरायचा हे आठवून सुकन्येला हसू आला. पण आई जे काही बोलायची ते किती खरं आणि वजनदार असायचं हे आठवून तिला भरून आलं.
खिडकीतून बाहेर रस्त्याकडे पाहत असतानाच तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका म्हाताऱ्या आज्जी कडे गेलं. तिला उगाचच उत्सुकता वाटली. काही वेळ सुकन्या तिथेच उभी राहिली. हातात एक पिशवी, डोळ्यावर झाड चष्मा . नऊ वारी साडी, सुरकुतलेला चेहरा आणि सैरभैर नजर अशा अवस्थेत ती म्हातारी बाई रस्त्याच्या कडेला बसली होती. हा नेहमीचाच रस्ता असल्यानं इथे कोणी भिकारी बसत नाहीत हे सुकन्येला माहित होतं पण मग हि कुणाची वाट पाहत असावी असं वाटलं आणि ती आत निघून गेली.


बऱ्याच वेळाने तिने पुन्हा बाहेर पाहिलं तर ती म्हातारी बाई तिथेच. आता मात्र सुकन्येला अनावर झालं, ती हातात कुलूप घेऊन बाहेर आली, दर ओढून कुलूप लावलं आणि खाली आली.
आजी तुम्ही कोणाची वाट पाहत आहात का ?  तिने आजीना विचारलं. आजीने नुसताच पाहून मानेने नकार दिला. मग इथे काय करताय भर दुपारी ? मी दोन तासान पासून पाहते आहे तुम्ही इथेच आहात, तुम्ही हरवला आहात का ? आजींच्या डोळ्यात टचकन पाणी आला, नाही ग पोरी, मला इथे सोडून दिलाय माझ्या पोरानं त्यांना मी नकोशी झाले होते.
काय ?? सुकन्या चपापली..! जग खूप पुढ गेलाय असं आपण म्हणतो आणि अजूनही असं काहीतरी पाहायला मिळत याचं तिला नवल वाटलं. क्षणभर तिचा तिच्या कानावर विश्वास बसेना.
ती म्हणाली तुम्ही जरा माझ्या बरोबर चला मी इथेच समोर राहते. आधी आजीने नकार दिला पण सुकन्या त्यांना घेऊनच आली. त्यांना एका खुर्चीत बसवून सुकन्या पाणी आणायला गेली. आजींची नजर शून्यात होती. कदाचित त्यांना पोटच्या पोराने असं वागावं यावर विश्वास बसत नव्हता.
सुकन्या पाणी आणि थोडं खायला घेऊन आली. पण आजी फक्त पाणी प्याल्या. आजी आता मला सविस्तर सांगता का नक्की काय झालं ते ?
आज्जी बोलु लागल्या , पोरी काय सांगू ? मला २ मुलं एक मुलगा आणि एक मुलगी, पती १५ वर्षापूर्वीच गेले. मी शाळेत नोकरी करून मुलांची लग्न करून दिल. मी मुलाकड राहात होते. पण सुनेचा आग्रह थोडं मुलीकडेही राहावं. म्हणून थोडेदिवस तिकडे गेले पण एकेदिवशी मुलीने स्पष्ट सांगितलं आई आमच्या घरात आधीच जागा कमी तू आपली पुन्हा दादा कडे जा राहायला. म्हणून पुन्हा परत आले. तेवढ्या कारणावरून सुनेने भांडण केलं, मुलगाही वाटेल तसा बोलला. मी गप्प बसून सगळं ऐकून घेतलं. थोड्या दर १५ दिवसांनी मला अशी भांडणं ऐकावी लागायची. पण गेल्या महिन्यापासून सून आणि मुलगा बरंच चांगलं वागू लागले होते मला वाटलं त्यांना समज आली असावी. पण आज सकाळी मुलगा म्हणे आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तू हि चल. ७-८ दिवस जायचं आहे म्हणून  कपडे पण बरोबर घ्यायला लावले. थोड्यावेळाने एके ठिकाणी गाडी थाबवून मला उतरवलं आणि म्हणाला आम्ही आलोच ५ मिनिटात तू थांब इथेच आणि मला सोडून गेले. मी संध्याकाळ होई पर्यंत तिथेच थांबले पण कोणीच आला नाही. शेवटी काल रात्री जवळच्या बागेत झाडाखाली झोपले आणि आज सकाळी पुन्हा रस्त्यावर येऊन थांबले. मला काही कळत नव्हतं कुठे जावं. आयुष्य निरर्थक वाटू लागलं. आजींचे डोळे पाण्याने डबडबले होते. सुकन्येने त्यांना सावरलं.
ती म्हणाली आजी तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही माझ्या इथे राहा. मी पाहते काय करायचं ते.
सुकन्या आत आली. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. चेहऱ्यावर पाणी मारून तिने आरशात पाहिलं. खरतर आपल्या माणसाचं वय वाढलं कि माणूस अजून आपलं वाटायला हवं कारण सोबतीचे दिवस कमी होत आहेत याची जाणीव  झालेली असते आणि हातातून निसटलेल्या क्षणांची कदर कळते. आई गेली तेव्हा आपण उन्मळून पडतो होतो ते त्याच मुळे पण इथे तिला आजींच्या बाबतीत वेगळाच चित्र दिसत होतं. दोन टोकाचे अनुभव आणि आपण दोन्हीचे साक्षीदार असं काहीसं तिचं झालं. तिने डोळे पुसले, थोडं पाणी प्यायला. आणि एक निश्चय केला. आजीना मी सांभाळीन. कोण कुठल्या माहित नसल्या तरीही. आपल्या कडे गमावण्या सारखा काहीच नाहीये जे काही आहे ते आई ने दिलेले संस्कार. आज आई असती तर तिने नक्कीच आजींची मदत केली असती. याच विचारात ती बाहेर आली. तिने आजीनना स्वतःची सगळी हकीगत सांगितली. आणि तिने घेतलेला निर्णय हि सांगितला.

ती म्हणाली , आजी तुमच्या घरच्यांचा शोध घेणं हे काम पोलीस करतीलही पण घरचे तुम्हाला किती स्वीकारतील आणि तुम्ही तिथे आनंदी राहू शकाल का हे महत्वाचं आहे आणि या परिस्थितीत मला असं वाटतं कि तुम्ही परत जाऊ नये. ज्यांना तुम्ही नकोशा आहात तिथे पुन्हा जाणा उपयोगाचं नाही. तुम्ही मला ओळखत नाही आणि मी हि तुम्हाला फारशी ओळखत नाही पण म्हणून सध्या काही फरक पडत नाही. तुम्ही माझ्या इथे राहू शकता. मी एकटीच राहते.  माझी आई २ महिन्या पूर्वीच गेली. आम्ही दोघी इथे राहायचो. माणसाला माणसाची ओळख पुरेशी आहे.  तुमच्या रूपाने कदाचित मला पुन्हा एकदा आई भेटेल.
झाडाला येणारं एखादंच फुल असं असत कि ज्याला जन्म देणाऱ्या झाडालाच वाहून घेण्याचं भाग्य मिळत फक्त त्याच फुलाला आयुष्याचं सार्थक झाल्याचा आनंद मिळत असावा. माझ्या आई ला वाहून घेण्याचं भाग्य मला मिळालं होतं पण आता तुमच्या रूपाने अजून एक संधी मला नशिबाने दिली आहे.
आजी फक्त ऐकत होत्या. धूसर झालेल्या डोळ्यातून त्यांना सुकन्या दिसतही नव्हती पण त्यांच्या थरथरत्या हाताला सुकन्येनं केलेला स्पर्श जाणवत होता. आधार फक्त आपल्या माणसच देऊ शकतात हे सुकन्येनं खोटं ठरवलं होतं.  खिडकीतल्या मगाशी पाणी घातलेल्या झाडाला थोडीशी तरतरी आली होती सुकन्या तिकडे पाहून सुखावली.

                                                            आनंद

                                                            ३१ ऑगस्ट २०१४ 

Monday, July 28, 2014

घरटे

घरट़े

घराच्या टेरेस वर लावलेली दोन चिमणीची घरटी आणि तिथे रोज न चुकता दाणे टिपायला येणारया तीन चिमण्या मला कुठल्या तरी परत फेडिची जाणीव करून देतात. त्यांच्या चिवचिवाट़ाने कधी त्या काही बोलू पाहत असतीलही. पण तिथे संवादा पेक्षा कृती महत्वाची ठरते. विश्वासाने त्या रोज येतात. दाणे देणार हे घरट त्यानी आपलास करून टाकल आहे.
अशाच अजुन एका खरया घराट्याला भेट देण्याचा योग नुकताच आला.
हडपसर इथला घरटे प्रकल्पतला एक दिवस पुन्हा एकदा नव्या संवेदना देऊन गेला. आकुंचन पावलेल्या आयुष्याला पुन्हा एकदा आपले हात पसरून त्या चिमुकल्या जीवांनी आपलस केला. नक्की कुणी  कुणाला काय दिल होत ? तिथे कुणाला मायबाप आहेत तर कुणाला कुणीच नाही पण सगळे त्या एका घरट्यात राहतात. आपल्या पेक्षा छोट्या मुलांची काळजी मोठी मुल घेतात. बाहेरून आलेल्या नव्या माणसांशीही नुसत्या तोंड ओळखीवरुन ती काही मिनिटात रूळतात. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी होतात. हे सगळ पाहिल आणि पुन्हा एकदा खात्री पटली की  अपोआप जुळणारे काही ऋणानूबंध कधीच ठरवून एकत्र येत नाहित , आयुष्यात स्वतः च घरट सोडून अनोळखी घरट्याचा शोध घेत राहिला पाहिजे. कुठे कोण तुमची वाट पाहत असेल आणि कुठे तुमचा शोध संपेल सांगता येत नाही...!

एक घरट़े अनोळखी,
हसरे आणि जिवंत..
मायबाप नसले तरी
मना नसे खंत....

एक  घरट़े अनोळखी,
पोरक आणि एकट
स्वतः मधेच रमल तरी
आसू ना ते ढाळत...

एक  घरट़े अनोळखी,
कधीतरी कोमेजत...
वाट पाहून कुणाची
स्वप्न पाहत निजत....

एक  घरट़े अनोळखी,
उन वारा सोसणार
पावसाच्या एका सरीनेही
चिंब ओल भिजणार....!

एक घरट़े अनोळखी,
नितळ आणि कोवळ
इवल्याश्या मुठीत त्याच्या
आभाळ सार मावल....

एक घरट़े अनोळखी,
प्रेमाला आसुसलेल
मायेच्या एका हाकेतच
क्षितिज त्याच सामावलेल...

एक  घरट़े अनोळखी,
विश्वासानी भरलेल
जगाच्या पाठीवर
आशेचा किरण उरलेल.....
                                        आनंद
                                       26 जुलै 2014







Saturday, June 28, 2014

लघु कथा : छोट्या आयुष्याची मोठी गोष्ट





प्रेरणा आज तशी उशिराच निघाली , आधी तिला बँकेत जाऊन पैसे भरायचे होते आणि मग तिथून लायब्ररीत जाऊन पुस्तकं बदलायची होती. आणि हे सर्व करून मग पुढे कामाला जायचं होतं. कितीही उशीर झाला तरी हि दोन कामं करण आज आवश्यकच होतं कारण दोन्ही गोष्टींची आज शेवटची तारीख होती नाहीतर दंड पडणार होता. लगबगीने तिने रस्ता ओलांडला आणि चालत बँकेत पोहोचली. कोपऱ्यातल्या टेबलावर बसून ती स्लीप भरू लागली. पटकन काऊटर  वर जाऊन तिने पैसे भरले. पलीकडच्याच लाईन मध्ये उभ्या असलेल्या उन्मेषच सहज लक्ष प्रेरणा कडे गेलं. पैसे भरून प्रेरणा लगबगीने बाहेर पडली. ती बाहेर जाताच उन्मेष चं लक्ष टेबलावरच्या छोट्या पिशवी कडे गेलं. प्रेरणा तिची पिशवी गडबडीत तिथेच विसरून गेली होती. उन्मेष पटकन पुढे झाला आणि त्याने ती पिशवी उचलली आणि तो बाहेर पळत आला. पण तेवढ्यात त्याने पाहिलं कि प्रेरणा रिक्षात बसून निघून गेली होती. त्याला काय करावे सुचेना. नाव गाव काहीच माहित नसताना आता हि पिशवी त्या मुलीला कशी परत करणार हा प्रश्न मनात घोळ घालत असतानाच त्याने पिशवी उघडून त्यात काही ओळखीचं सापडतं का हे पहावं म्हणून ती उघडली. त्याच्या हाताला एक वही लागली त्यात दुमडलेल्या पानावर आजची तारीख आणि आज करायच्या गोष्टींची यादी लिहिली होती. बँक १० वाजता, सुमेध लायब्ररी १०.३० वाजता , निर्मिती पुस्तकालय ११ वाजता .. अशी यादी वाचतानाच त्याला वाटलं यावरून आपण तिला गाठून तिची पिशवी परत करू शकतो.  आणि मग तो हि रिक्षातून लायब्ररी कडे निघाला.
इकडे प्रेरणा रिक्षातून लायब्ररी मध्ये पोहोचली. मोठी पिशवी खांद्याला असल्यामुळे आपली एक पिशवी बँकेत विसरली आहे हे तिच्या अजूनही लक्षात आलेलं नव्हतं. ती भरभर लायब्ररीत पोहोचली आणि पुस्तक जमा केलं. दोन कामं झटपट झाल्यानं तिला हलकं वाटलं आता ती गावातल्या दुकानात निघाली. बाहेर आल्या आल्या बस मिळाल्यानं ती अजून सुखावली. खिडकीतून बाहेर बघताना ती स्वतःशीच हसली. आपण किती उत्साहानी कामं करतो . कदाचित आपण आपल्याला आवडणारं काम करत असल्यानं असं होत असेल असं तिला वाटलं. आपल्या आयुष्याच्या नागमोडी वळणांनी आपल्याला खूप काही शिकवलंय , अगदी या क्षणीजरी मरण आलं तरी आपल्याला काहीही वाईट वाटणार नाही पण जेवढा जास्त जगू ठेवढा अजून चांगलाच आहे असे काहीतरी विचार तिच्या मनात चालू होते.
तिकडे उन्मेष लायब्ररीत पोहोचायच्या आधीच प्रेरणा तिथून निघून गेल्यामुळे त्याचा हिरमोड झाला. आता शेवटी वहीच्या पानावर लिहिलेल्या गावातल्या पुस्तकांच्या दुकानात जायला निघाला. त्याने आलेली बस पकडली. आपण खरतर या अनोळखी मुलीच्या मागे तिची पिशवी द्यायला का जात आहोत हेही त्याला उमगलं नव्हतं पण त्या क्षणी वाटलं आणि केलं असं काहीसं त्याचं झालं होतं. पण मुळात तिच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्न हास्याने त्याला भुरळ घातली होती.
प्रेरणा दुकानात पोहोचून तिने हवी ती पुस्तके घेतली आणि ती बाहेर पडली. उन्मेष ची बस दुकानाच्या समोर थांबली. पळत पळत खाली उतरून त्याने दुकानाकडे पाहताच त्याला लांब चालत जाणारी प्रेरणा दिसली. तो तिला गाठण्यासाठी मागे निघाला. प्रेरणा चौक ओलांडून पलीकडे गेली. उन्मेष तिच्या पासून तसा बराच लांब होता पण ती त्याला दिसत होती.  प्रेरणा रस्ता ओलांडून अगदी छोट्या बोळात शिरली. इथून पुढे आजूबाजूची वस्ती फारशी चांगली दिसत नव्हती. त्याचे पाय थोडे अडखळले पुढे जावं कि नाही याचा त्याला प्रश्न पडला पण जिच्या मागे एवढ्या दूर आलो ती नक्की कुठे चालली आहे याची त्याला उत्सुकता वाटू लागली होती. त्यामुळे खरतर तो आता थोडा अंतर राखून चालू लागला. दोन छोट्या गल्ल्या ओलांडून प्रेरणा चाळी वजा खोल्या असलेल्या इमारतीत जाऊ लागली. उन्मेष ते पाहून चांगलाच चपापला. ती वैश्या वस्ती होती. क्षणभर आजूबाजूला बघताच त्याला गरगरून आलं आपण काय विचार केला होता आणि हे काय निघालं असं त्याला वाटू लागलं पण तरीही त्या मुलीला भेटून पिशवी तिला देऊन दोन शब्द सुनावूनच आपण इथून जायचं असं त्याने ठरवलं. तो जिन्याने वर आला. आजूबाजूच्या स्त्रिया खूप वेगळ्या नजरेनं त्याच्या कडे पाहत होत्या. समोरच्याच खोलीत प्रेरणा शिरल्याच त्याने पाहिलं होतं तो त्याच दिशेने चालत राहिला. दार हाताने लोटून त्याने समोर पाहिलं. लहान मुलांच्या गराड्यात प्रेरणा बसली होती. तापलेल्या जमिनीवर पाणी ओतल्यावर जशी गरम हवा बाहेर पडते तसं त्याचं काहीसं झालं . मुलही तिला बिलगली होती. तिने आणलेली पुस्तके ती एक एक करून प्रत्येकाला देत होती. उन्मेष तसाच उभा राहिला. त्याला काहीच कळेना. मनात विचारांचं काहूर माजला होतं खूप कमी वेळात नाना प्रकारचे विचार त्याच्या मनात येऊन गेले होते. त्याची त्यालाच घृणा वाटत होती आणि कीवही येत होती. तेवढ्यात प्रेरणाच लक्ष त्याच्या कडे गेलं. मुलांकडे वळून त्यांना काही सूचना करून ती उठून त्याच्याकडे आली. तो भानावर आला.
माझ्याकडे काही काम आहे का ? तिने विचारलं . हो तसच काहींसं त्याने अडखळत उत्तर दिल. आणि हातातली पिशवी पुढे केली. उन्मेषने सकाळ पासून ची सगळी हकीकत तिला सांगितली. आणि तिच्या विसरलेल्या पिशवी साठी तो कसा इथे पोहोचला हेही सांगितलं. प्रेरणा ने त्याचे खूप आभार मानले आणि आपण कसे विसरभोळे आहोत हेही मान्य केलं. दोघांनी एकमेकांची नावे एकमेकांना सांगितली.
प्रेरणाला या वस्तीत शिरताना पाहून त्याच्या मनात आलेले विचार, नंतर आपण हिला सुनावून मगच इथून जायचं वगैरे सगळं त्याने तिला सांगितलं. प्रेरणाला ते ऐकून गम्मत वाटत होती आणि जग गोष्टी कशा पाहता हे हि तिला पुन्हा उमगत होतं. तिला अर्थातच हे नवीन नव्हतंच.
शेवटी प्रेरणाला बोलणं भागच पडलं पुन्हा पुन्हा भूतकाळ चार लोकांसमोर उगाळत बसावा हे खरतर तिला अजिबात आवडायचं नाही पण इथे तिला का कुणास ठावूक उन्मेषचा प्रामाणिकपणा पाहून तिला सांगाव वाटलं.
प्रेरणा म्हणाली, मुळात मी इथे का ?, या प्रश्नापेक्षा हि वस्ती इथे का हा प्रश्न लोकांना पडायला हवा. तुला म्हणून सांगते उन्मेष , (न कळत तिने त्याच्या नावाचा एकेरी उल्लेख केला) मला जन्मतःच एच.आय.व्ही आहे. माझ्या वडलांकडून तो आईला आणि मग माझ्या जन्मानंतर मला तो फुकटच मिळाला. पूर्वीच्या काळात त्यांनी केलेल्या कुठल्यातरी चुकीची शिक्षा हि अशी आम्हा सगळ्यांना मिळाली. आई आणि बाबा दोघेही पंधरा वर्षापूर्वीच गेले. मी एका संस्थेत वाढले. तिथल्याच एका शिक्षकांच्या मदतीने पुढे कॉलेज केलं. खरतर जगण्याची इछाच नव्हती पण दर वर्षी अजूनही माझ्यासारखे जन्मतःच एच.आय.व्ही असलेली लहान मुलं संस्थेत येणं काही बंद होत नव्हतं, मग ठरवलं जेवढं जगेन तेवढं सार्थकी लावेन. आता या वस्तीत येते या बायकांच्या मुलांच्या शिकवण्या घेते. इथल्या बायकांना शिकवते आयुष्याचं मोल समजावते. आपल्या चुकीमुळे कुणाचे संसार कसे उध्वस्त होतात हे जेव्हा त्या बायकांनी पाहिलं तेव्हा त्याही ढसाढसा रडल्या. पण मी म्हटलं रडून काही होणार नाही बदल घडवावा लागेल. एकदा धंद्यात पडलं कि बाहेर येता येत नाही वगैरे गोष्टी खोडून काढत आम्ही इथल्या ४ मुलीना बाहेर शिक्षणाला पाठवलं त्या आता इकडे कधीच फिरकायच्या नाहीत. मी हि किती जगेन हे मलाही माहित नाही कदाचित फार फार तर दोन चार वर्ष पण मला ती खूप मोलाची वाटतात अजून खूप काही करायचय.
उन्मेष ऐकून स्तब्ध झाला होता. त्याला काय बोलावं हेच कळेना. त्याची घालमेल बघून प्रेरणा म्हणाली, तू वाईट वाटून घेऊ नकोस बरीच लोकांना दुसरी बाजू माहित नसते त्याने लोक माझ्या बद्दल असा विचार करतात पण त्याने आता काहीच फरक पडत नाही. गर्दीत आणि एकटी असल्यावर मी फक्त “मी” असते. त्यात माझ्याकडे वर्ष आहेत कमी आणि काम आहे खूप त्यामुळे काही गोष्टीना बगल देऊन पुढे जाण भागच आहे. तेच मी करते. ज्यांच्याकडे आहेत ७०-८० वर्षे त्यांनी खुशाल करावा इतरांच्या आयुष्याबद्दल चांगल्या वाईट चर्चा मला या जन्मी ते थोड अवघडच आहे. असं म्हणून ती खळखळून हसली.
एक एक कप चहा घेऊन प्रेरणाला निरोप देऊन उन्मेष बाहेर पडला. त्याला आजूबाजूची लोकं खुजी वाटत होती आपणही त्यातलेच आहोत हे हि त्याला कळत होतं. आयुष्याची परिमाणं कशी बदलतात हे त्याने आज नुसता अनुभवलच नव्हतं तर प्रत्यक्ष पाहिलं होतं. अमक्या वर्षी हे करू तमक्या वर्षी हे करू असं ठरवणारी कित्येक माणसे त्याने पहिली होती अशा लोकांची मोठ्ठाली आयुष्ये त्याला शुल्लक वाटू लागली होती. जी गोष्ट माणसाकडे मुबलक असते त्याची किंमत त्याला नसते हेच खरं आणि आयुष्यचं सार्थक करणारी कामे माणूस नेहमीच कशी लांबणीवर टाकतो याचीही त्याला जाणीव झाली होती. आयुष्य म्हटलं तर खूप मोठा शब्द आणि म्हटलं तर खूप छोटा. पण मग हे छोटं मोठं कसं ठरतं ? मुळात ते आपण ठरवत असतो. मिळालेल्या वेळेचा काळाचा आपण किती आणि कसा उपयोग करतो यावर आयुष्य जगण्याची गणितं अवलुंबून असतात. हो गणितच कारण ते एकदा चुकलं कि पुन्हा सुधारता येत नाही.
प्रेरणाचं आयुष्य छोटं असलं तरी तिचीच गोष्ट खूप मोठी आणि खरी होती. आज आलेला आयुष्याची नव्याने ओळख करून देणारा अनुभव मनात ठेवून तो गर्दीतून वाट काढत निघाला.
आनंद
२८ जून २०१४
 

 

Saturday, May 31, 2014

मनातून भाग ५ - आपलेपणा


आपलेपणा नेहमी दिसून येतोच अस नसत.  बोलून शब्द व्यक्त होउ शकतात पण समोरच्या माणसाला आपलेपणा जाणवावा लागतो तो बोलून दाखवण्याचा प्रकार नाही.  कधी  स्वत: हुन केलेली एखादी कृति  तर कधी न सांगताच समजुन घेतलेली गोष्ट, कधी आपल्याला वाईट वाटू नये म्हणुन जाणून बुजून  लपवलेली नावडती गोष्ट तर कधी मुद्दाम घडवून आणलेली आपली आवडती गोष्ट. अशा एक ना अनेक गोष्टी आपलेपणा निर्माण करत असतात.
माणुस दूर गेल की भरुन येणारे डोळे किंवा नुसत्या आठवणीने हिरमुसणार मन याचीच प्रचिती देत असतात.
गृहीत धरणा जस कधी कधी खुप जिव्हारी लागु शकता तसच आपलेपणात ते हवहवस वाटू लागत. स्वतः बरोबर आपला विचार करणार माणुस प्रत्येकालाच हवा असत.
आजुबाजुला पाहताना इतकी नाती केवळ समाज का्य म्हणेल या प्रश्नाला अडून अजुन तग धरून राहताना दिसत असताना मला प्रश्न पडला की नाती कोरडी का होत असावीत आणि उत्तर मिळाल  ते  टेरेस मधल्या निळ्या जांभळ्या रंगांच्या बहरलेल्या झाडाकड़े पाहून. भर उन्हात ते इतक ताजतवाने कस राहू शकता ? म्हणुन वर पहिला तर निळ आकाश खाली डोकावून पाहत असल्या सारखा जाणवल. मग वाटला आकाशाच प्रतिबिम्ब तर उतरला नाही ना या फुलांमधे ?
निसर्गाच कुठल रुप का्य दाखवेल काही सांगता येत नाही. कुणाला अंगाची लाही लाही करणारा उन दिसत तर कुणाला शुभ्र आकाश.
आकाश आणि फुलात कुठून येत असेल ती आपलेपणाची भावना ?  मला वाटता निसर्ग एकच असतो म्हणून सगळ्या गोष्टीत आपलेपणा दिसतो.
नाती ही स्वार्थी असतात आपल्याला हवा त्याचीच अपेक्षा ती करत राहतात. जित्याजागत्या माणसांची परवड होत राहते. अपेक्षा कधीच आपलेपणा निर्माण करत नाहीत हे समजुन घ्यायलाहि थाम्बायला वेळ नसतो.
"तुला माझी कदर नाही किंवा तुला मी समजलेच नाहीये " अशी बिनबुडाची वाक्य एकमेकाना सुनावली जातात तेव्हा खरतर गरज असते स्वतः सावरायची आणि आपल्या माणसाला जपायची पण स्वतःत हरवलेल्या जिवाला धूसर झालेला आपलेपणा दिसत नाही. आलेल्या परीस्थितिला सामोरा जाऊन माणुस जपायच की स्वाधीन होउन नुसता पाहत बसायच हे ज्याचा त्याने ठरवाव.
पण शेवटी खर हेच असत की माणसाला माणुस लागत मग ते कुणाच्याही रुपात असल तरी फरक पडत नाही. कुणाला ते रक्ताच्या नात्यात सापडत तर कुणाला मैत्रीच्या.
आपलेपणात नाती फुलतात , छोट्या छोट्या आनंदाची नांदी होते , समाजात वावरताना एकटेपणा जाणवत नाही आणि जगाच्या पाठीवर कुठेही गेल तरी पापण्या ओल्या करणार माणुस असल्याची खात्री असते.
मला वाटत माणसाला चार भिंतींची गरज नसते तर गरज असते वर पसरलेल्या  आकाशाख़ाली चालताना उन वारा आणि पावसात काळजी करणार आपल माणुस.!
भिंती माणस तोड्तात आणि आकाश जग जोड़त....!


                                                आनंद
                                              31 मे 2014