Powered By Blogger

Sunday, March 31, 2013

आठवण



जाताना साधारण ६-७ वर्षापूर्वी लिहिलेली “आठवण“  ही कविता आज जेव्हा मी पुन्हा वाचली तेव्हा माझेच डोळे पुन्हा पाणावले. तेव्हा कुठल्या परिस्थिती मधे ही लिहिली होती हे आता आठवत नाही. पण आज इतक्या वर्षांनी पुन्हा वाचताना ही खूप जवळची वाटली. मला वाटतं कवीच्या आयुष्यातली हीच गोष्ट खूप मोठी असते. आपणच लिहिलेली एखादी गोष्ट आपल्याला खूप वर्षांनी पुन्हा नव्याने कळते आणि काहीतरी चांगलं लिहिल्याचं समाधान मिळून जातं आणि वाटतं हेच कदाचित आयुष्याचं सार्थक आहे. 



जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!

आठवावं असं खूप आहे
सगळंच तू आठवू नकोस,
झेलावं असं खूप आहे
सगळंच तू झेलू नकोस.

आठव पेललेली आव्हानं
झेल श्वासाच नवं गाणं ,
म्हणताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!

खूप पूर्वी बोलीन म्हटलं
इच्छेला शब्द सापडलेच नाहीत,
पटकन अंतर कापीन म्हटलं
आशेला श्वास पुरलेच नाहीत.

झालं गेलं जाऊ देत
फक्त एकच लक्षात ठेव ,
डहाळीची फुलंही फार काळ टिकत नाहीत
आकाशाला भिऊन काही झाडाच्या फांद्या वाकत नाहीत.

फुलाकडून फुलणं शिक
फांदीकडण भिडणं शिक,
शिकताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!

कधी तुला एकट वाटेल
तेव्हा आठव नभातल चांदणं ,
आपल्या अंगणातल्या पारावर
कधी व्हायचं त्यांचं नांदण.

आता तिथे ते नसेल
पण तिथे तू असशील,
तुझ्या त्या असण्यानंच
तू त्यांचं नसणं पुसशील.

चांदणं होऊन पसरायचं तुला
माझ्यासाठी जगायचय तुला
जगताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!

रडू नकोस...
रडण्याने का प्रश्न सुटतात ?
मी रोज भेटेन तुला
रोपट्याच्या पालवी मधून ,
झाडाच्या सावली मधून
खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हामधून.

ऋतू बदलतात ,पाने गळतात
फक्त नव्यानं फुलण्यासाठी ,
नदी आटते नभ फाटते
फक्त नव्यानं वाहण्यासाठी .

ऋतू कडनं फुलणं शिक
नदीकडनं वाहणं शिक,
वाहताना फक्त आठव मला
जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!

आता फार बोलत नाही
नाहीतर डोळे भरून येतील ,
दाटलेल्या अश्रूंना
डोळ्यामध्ये पूर येतील.

भरलेल्या डोळ्यांना
काहीच दिसायचं नाही
कितीही फसवलं तरी
मन फसायचं नाही.

तुला मात्र सगळं पहायचंय
आयुष्यभर फक्त हसायचंय,
हसताना फक्त आठव मला
 जाताना फक्त एक आठवण देऊन जाईन तुला...!

                                            आनंद
                                                                                                                   ३१ मार्च २०१३

     

Thursday, February 28, 2013

सुटलेली पाने – भाग एक


सगळं काही सुरळीत चालू असताना सुद्धा कधी कधी हातातून क्षण मागे निसटून जातात पण त्याची जाणीव होईपर्यंत काळ पुढे गेलेला असतो.  आयुष्यातले सगळेच क्षण आपल्याला हवे तसे आणि हवे तेव्हा समोर आले असते तर आयुष्य किती छान झालं असतं असं आपल्याला बऱ्याचदा वाटत असतं. पण अचानक समोर येणाऱ्या क्षण क्षणांची मजा खरंच काही और असते यात काहीच शंका नाही. हातातून निसटलेल्या गोष्टीचं दु:ख होणं , वाईट वाटणं साहजिक आहे पण त्या सुटलेल्या क्षणांची आठवण आपल्याला पुढे जाऊन साथ करते हे ही तितकंच खरं आहे. 
प्रवास करताना एकही वळण नसलेला सरळ मार्ग सुरुवातीला आवडला तरी नंतर कंटाळवाणा होतो. एक वळण घेऊन ते सोडून दुसऱ्या वळणावर जाताना काहीतरी गमवण्याच्या दु:खापेक्षा वळण पार केल्याचा आनंद जास्त  असतो.



आज इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना मला आठवतायत ती खूप काही लिहायचं असलं तरीही हातातून सुटलेली कोरी पाने. ती कोरी असली तरीही त्यांच्या मधे इतकं काही दडलंय कि कोरा कागद समोर धरला तरीही वाचता यावा. कधी शब्दांनी साथ न दिल्यामुळे, तर कधी काळाने दगा दिल्यामुळे, कधी जाणूबुजून तर कधी नकळत, पानं मागे सुटतच गेली. त्या वेळच्या आठवणी मात्र तशाच राहिल्या, कधीतरी शब्दरुपाने आपण पुन्हा जन्म घेऊ अशी वेडी

आशा त्यांनीही ठेवली असावी.  ही सुटलेली पाने पाहून मन भरून नक्कीच येतं पण मग त्याच वेळी एक माणूस म्हणून समाधान सुद्धा वाटतं कारण प्रत्येक वेळी सुटलेल्या त्या पानांनी मला अनुभवाची मोठी शिदोरी दिली आहे आणि आयुष्य समृद्ध करायला खूप मोलाची मदत केली आहे. सुटलेल्या पानांमागाच्या गोष्टी गोळा करून जमा करून त्यातल्या मला भावलेल्या काही निवडक पानांना  इथे सादर करायचा प्रयत्न केला आहे.


लहानपणीच्या सगळ्याच गोष्टी माणसाला आठवल्या असत्या तर मोठं होऊनही माणसाने लहानपणीची निरागसता विसरली नसती. असंच माझ्या लहानपणीचं माझ्या मनाच्या खूप जवळ असलेलं सुटलेलं कोरं पान जे मला अजूनही डोळ्यात पाणी भरायला भाग पाडते ते म्हणजे माझ्या बालपणीच्या मैत्रीचं..! तो मित्र होता अमर. तेव्हा आमचं वय साधारण सात आठ असावं ,शाळेच्या दुसरी ते चौथी च्या वर्गात असताना आमच्यात मैत्री झाली. अमरला दोन्ही पायांना पोलिओ होता. खूप हुशार असलेला अमर आणि माझी मैत्री कशी झाली हे मला आठवणं खूप कठीण आहे पण ती मैत्री खूप निरागस आणि कोवळी होती. त्या वयातल्या स्वभावाला साजेशी आणि खूप नितळ स्वच्छ आणि तितकीच बोलकी होती. आम्ही वर्गात शेजारी बसायचो ,मी फारसा हुशार नसलो तरी अमर बरोबर राहून थोडाफार फायदा मलाच व्हायचा.
वर्गात सर्वांना हात वर करून उभं राहायची शिक्षा झाल्यावर अमर बरोबर बऱ्याचदा मलाही त्याचा मित्र म्हणून शिक्षेतून सुट मिळायची.

आज २० वर्षांनी सुद्धा मला अजूनही त्याचे बोलके डोळे आठवतात, आजीच्या पाठीवर बसून शाळेत येतानाचा अमर मला अजून डोळ्या समोर येतो. मधल्या सुट्टीत सगळा वर्ग रिकामा झाला तरी अमर, मी आणि तब्बसुम ने खाल्लेला डबा मला अजून आठवतो. सगळं वर्ग खाली खेळत असताना आम्ही वर्गात बसून गप्पा मारत बसायचो. खूप कोवळ्या वयातल्या त्या मैत्रीला कसलेच बंधन नव्हते. कुठलीच अपेक्षा नसली कि माणूस माणसाला जिंकू शकतो त्यातलाच हा प्रकार असावा. फारशी समज नसलेल्या त्याही वयात मला अमर खूप दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला वाटायचा. त्याच्या अपंगत्वाचा त्याने कधीही बाऊ केलेला मला आठवत नाही. चौथी नंतर शाळा बदलली आम्ही वेगळे झालो. पुन्हा भेटण्याचा योग कधीच आला नाही. अमर शहर सोडून गेला असं कळलं तेवढीच काय ती खबर. शाळेचा शेवटचा दिवस मला आठवत नाही, पण आज असं खूप वाटतं कि, का नाही आमची मैत्री दूर होऊनही टिकू शकली , आयुष्याचे संदर्भ इतके भरभर का बदलले ? कापसासारखं हलकं होऊन हवेत अलगद उडावं आणि वाऱ्याच्या एका लाटेने आपली दिशा बदलावी असं काहीसं झालं असावं. समाधान फक्त याचंच आहे  कि आज इतक्या वर्षांनी सुद्धा हातातून निसटलेल ते पान मला आठवतंय. 

   


आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ असतात असं म्हणतात , पण या मैत्रीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मी कधीच केला नाही कारण अर्थ नसलेली हीच गोष्ट माझ्या बालपणीच्या आठवणींमधली सुखाची लकेर आहे.  निर्ढावलेल्या जगात डोळ्यात एकाच वेळी आनंदाचे आणि दु:खाचे अश्रू आणणारी इतकी नितळ गोष्ट दुसरी कुठली असू शकते नाही का ?
हातातून सुटलेलं हे पान कोरं राहिलं कारण समज येण्यापूर्वीच काळ खूप पुढे निघून गेला होता. त्याच कोऱ्या कागदावर आज एक कुंचला फिरवून आठवणी रेखाटायला मिळणं हे सुद्धा मला वाटतं फार भाग्याचीच गोष्ट आहे.
 
                                                            आनंद
                                                            २८ फेब्रुवारी २०१३