Powered By Blogger

Saturday, June 2, 2012

लघुकथा : सागरपक्षी


दूर क्षितिजावर सूर्यास्ताला अजून अवकाश होता. साधारण चार साडेचार वाजले असतील. सागराचा तो किनारा सोनेरी उन्हात चांगलाच चमकत होता. ओलसर वाळूत सागराच्या लाटा कुठलं तरी अनामिक चित्र रेखाटताय कि काय असं वाटत होतं. नाहीच आवडलं चित्र तर एक मोठी लाट येऊन ते पुसून टाकत होती. त्यांचा हा खेळ अखंड चालू होता. तिन्हीसांजेची वाट पाहत किनारही सुस्तावला होता.
राम अचानक झोपेतून जागा झाला. आपण स्वप्न पाहत होतो ? छे..! खरंतर स्वप्न पाहण्याचा देखील आपल्याला अधिकार नाही . त्याबाबतीतही आपण कमनशिबी आहोत  असं त्याला वाटून गेलं. मग आपल्या मनात नक्की काय होतं ? त्याला काही केल्या ते आठवेना. झोपेतली सगळीच स्वप्न माणसाला आठवली असती तर किती बरं झालं असतं निदान अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वप्नात पूर्ण होताना पाहून थोडं तरी समाधान मिळालं असतं हा विचार करत तो उठला. खोलीबाहेर आला. अंगणात येऊन पेल्याने तोंडावर पाणी मारलं. कोपऱ्यातल्या रांजणामधलं पाणी प्यायला आणि चपला घालून किनाऱ्याकडे निघाला. अस्वस्थ झाला कि सागर किनारा गाठणं हा त्याचा नित्यक्रम होता. जेमतेम दहा मिनिटामध्ये तो किनाऱ्याकडे पोहोचला. माडाच्या झाडातून वारा पाठशिवणीचा खेळ खेळत होता. आणि माडाच्या झाडांचे शेंडे मधेच खुदकन हसत होते. किनाऱ्यावर पोहोचताच रामला हायसं वाटलं. निदान हा सागर तरी आपल्यावर रागावत नाही, चिडत नाही, आपल्याला काहीबाही बोलत नाही. सागराची लाट जिथे संपत होती तिथपासून साधारण दहा फुटांवर राम बसला. गेल्या महिन्याभरात घडलेल्या घटना त्याला पुन्हा आठवू लागल्या. त्या आठवायच्या नाहीत असं ठरवून सुद्धा पुन्हा तेच विचार त्याच्या डोक्यात येऊ लागले. 
 त्याच्यासमोर जुई आणि त्याची शेवटची भेट आली. शेवटचा निरोप घ्यायला जुई आली तेव्हा ती खूप शांत होती. आपण मात्र खूप चिडलो होतो मनाची लाही लाही होत होती. तिचा हात हातात घेऊन तिला आपण म्हणालो कि आत्ता या क्षणी आपण इथून दूर निघून जाऊयात. फक्त तू आणि मी. पण हातातला हात सोडवत जुई नी मान वळवली. तिने साफ नकार दिला. तिला असं पळून जायचं नव्हतं. आपण तिला खूप समजावलं पण ती ठाम होती. घरच्यांना तिला त्यांना दुखवायचं नव्हतं पण तिला आपलं प्रेम मात्र दिसत नव्हतं. ती म्हणाली यापुढे आपण कधीच भेटायचं नाही. एकमेकांना विसरून जायचं.!


 
ती इतकं सहजासहजी असं कसं म्हणू शकते या गोष्टीचं आपल्याला अप्रूप वाटलं होतं आणि तितकाच तिचा राग आला होता. अवघड परिस्थितीत सुद्धा खंबीर राहायची तिची हीच वृत्ती आपल्याला फार फार आवडायची हे रामला आठवलं.
जुई म्हणाली “मी प्रेम केलं माझ्या मर्जीने आणि आज तेच प्रेम मी सोडतेय ते ही माझ्या मर्जीने. कदाचित तुला मी खूप स्वार्थी वाटत असेन. पण ऐकायचं असेल तर ऐक.  नानांना जेव्हा अपघात झाला आणि त्यांचे पाय निकामी झाले आमच्या घराच्या आधारवडाची फांदीच तुटली. तीन मुलींची लग्न आणि छोट्या मुलाचं शिक्षण याचं ओझं कसं वाहायचं हा प्रश्न त्यांना पडला. एका रात्री जन्मदात्या बापाच्या डोळ्यात मी अश्रू पाहिले. आयुष्यभर निधड्या छातीनं प्रत्येक संकटाला सामोऱ्या जाणाऱ्या वडिलांना अशा अवस्थेत पाहिलं आणि तिथेच ठरवलं, नानांचं ओझं आता आपण वाहायचं. घरात मोठा मुलगा असला असता तर त्याने हे केलंच असतं पण आपण का करू नये. तुला हे सगळं मुद्दाम सांगितलं नाही. माझ्या प्रेमापोटी तू कदाचित माझ्या सकट माझ्या घरची जबाबदारी सुद्धा पत्करली असतीस. पण काही काळानंतर सुरुवातीला तुला वाटणारी जबाबदारी नंतर तुला ओझं झाली असती. कारण तू फक्त माझ्या साठी सगळं केलं असतं. स्वतःचा संसार करताना बायकोच्या बापाचा संसार तुला ओढावा लागला असता. आणि जर तू सगळ्या गोष्टी पार पाडल्या असत्यास तरी समाजाने तुला नाकी नऊ आणले असते. आजूबाजूच्या लोकांकडे पाहत माणूस स्वतः कधी स्वार्थी होतो हे त्याचं त्यालाच कळत नाही. स्वार्थाच नातं दुसऱ्यापेक्षा स्वतःशी आपण जोडलं तर माणसाला कमी प्रश्न पडतात. तुला सोडण्यातही माझा स्वार्थ आहेच. तुझ्या प्रेमाला नाकारून तुझ्या अस्मितेला कदाचित धक्का पोहोचला असेल . पण मी हा निर्णय खूप विचारांती घेतला आहे. तुला माझ्या पेक्षा खूप सुंदर आणि चांगली बायको मिळेल. माझ्या स्वप्नांना मी कधीच आहुती दिली आहे. तू मात्र अजूनही नवी स्वप्ने पाहू शकतोस. आणि मला हेच हवं होतं. “
इतकं बोलून जुई चालू लागली , आपण मात्र अनुत्तरीत झालो होतो. तिची पाठमोरी आकृती पाहताना आपल्याला वाऱ्या बरोबर जुई च्या कळीचा चा गंध आला होता हे रामला आठवलं.
एखाद सत्य स्वीकारलं तरी मनाला पुन्हा भूतकाळात जाण्यापासून रोखणं इतकं सोपं नसतं. ते आपल्या मर्जीने पुन्हा सत्य झुगारून बंड करतच. रामला ती भेट आठवली आणि असंच झालं. घडलं ते सगळं खोटं होतं असं त्याला क्षणभर वाटू लागलं. पण पुढच्याच क्षणी त्याला सागराच्या लाटेचा आवाज ऐकू आला आणि तो भानावर आला तो लागेवरून उठला आणि किनाऱ्यावरून पाण्याच्या कडेनी चालू लागला. प्रेमभंगाच दुखः ज्याचं त्यालाच कळत हे असलं तरी आपली गोष्ट वेगळी आहे त्याला माहित होतं. आपला खरतरं प्रेमभंग झाला नाहीये तर त्याच्यापुढे जाऊन ती आयुष्याशी केलेली तडजोड आहे हे तो जाणून होता. जुई ने नकार दिला तेव्हा खरतरं आपण यावर फार विचारच केला नव्हता. पण जेव्हा तिच्या भूमिकेतून आपण आज या गोष्टी कडे पाहतो आहोत तेव्हा जुई बद्दल आपल्याला आदर तर वाटतोच आहे पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्या व्यक्तीने आपल्याला सोडताना सुद्धा आपल्या सुखाचाच विचार केला ही भावना सुद्धा खूप सुखावणारी होता. जुई खरंच वेगळी होती आणि ती अजूनही आपल्याला तितकीच आवडते हा विचार करतानाच एका लाटेने रामच्या पायाला स्पर्श केला आणि तो भानावर आला. 


 
तिथेच थांबून राम क्षितिजाकडे पाहू लागला. दूर सूर्य अजूनही आकाशात रंगरंगोटी करायची तयारी करत होता. तोच त्याचं लक्ष आकाशात सागरावर मनसोक्त विहार करणाऱ्या पक्ष्याकडे गेलं. त्याला पाहून रामला त्याचा हेवा वाटला. तोच त्या पक्ष्याने सागराच्या पाण्यात डुबकी मारून एक छोटा मासा पकडला आणि किनाऱ्यावरच्या खडकावर येऊन बसला. मासा मेल्याची खात्री करून घेऊन तो तिथून उडून जवळच्याच झाडावर गेला. नीट लक्ष देऊन बघताच रामला दिसलं कि आपल्या पिलांसमोर मासा टाकून तो पक्षी पुन्हा बाहेर आला. त्याच्या सगळ्या हालचाली पाहून रामला मोठी गंमत वाटली. पुन्हा आकाशात विहार करताना तो पुन्हा पाण्यात डुबकी मारत होता. प्रयत्न निष्फळ गेला तरी तो थांबत मात्र नव्हता. अथांग पसरलेल्या सागरात डुबकी मारणारा तो पक्षी आणि आपल्यात काय साम्य आहे असं उगीचच रामला वाटून गेलं.
आयुष्यात लहानपणापासून अनेक लहान मोठ्या संकटांचा, अडचणींचा सामना करूनही आपण यातून तावूनसुलाखून बाहेर पडलो होतो. मग ती शिक्षणसाठी केलेली धडपड असू देत कि हातात पैसा नसताना काटकसरीत काढलेले दिवस असो, कि आईच्या आजारपणातली मनाची झालेली घालमेल असो, कि शिक्षण असून नोकरी साठी केलेली वणवण असो. आता कुठे थोडे बरे दिवस आले होते आणि आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःसाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली होती पण आपल्याला ती ही लाभू शकली नाही. जग जेव्हा माणसाला एकट पाडतं तेव्हा त्याचं स्वतः च मन हेच फक्त त्याचं साथीदार असतं आणि त्याच्याच जोरावर आपण आयुष्याला वेगळी वळणं देत गेलो.  अशाच एका वळणावर जुईची भेट झाली. आधी भेट, आधी ओळख, मग अनामिक ओढ आणि मग प्रेम हा प्रवास इतका सहजासहजी घडत गेला कि दोघानाही काही उमजायच्या आत नातं आपोआप फुललं हे आठवून रामला ते गुलाबी दिवस आठवले.
या पक्ष्याप्रमाणेच अनेकदा त्या आयुष्याच्या अथांग सागरात डुबकी मारली तरीही दरवेळीच आपल्याला सुख गवसत नाही पण जेव्हा ते मिळत तेव्हा मात्र भरभरून मिळत असं रामला वाटून गेलं आणि त्याच्यात आणि आपल्यात साधर्म्य का आहे याचा उलगडा झाला. दरवेळी मासा नाही मिळाला तरी डुबकी मारणं त्या पक्ष्याने सोडलं नव्हतं हे रामच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आज जुईच्या आठवणीने ज्याला जगणं नकोसं वाटत होतं  पण तिच्याबरोबर घालवलेले क्षण आठवताच त्याचं मन फुलून येत होतं. या दोन टोकाच्या भावना असल्या तरी त्या आयुष्यातल्या दोन वेगळ्या टप्प्या वर आल्या होत्या. त्या सागर पक्षाकडे पाहून रामला थोडं हलकं वाटलं.


 
झालं ते झालं. पण आता पुढे काय हा प्रश्न येताच राम विचार करू लागला. विस्तीर्ण पसरलेल्या सागरातून मासा पकडणं जितकं अवघड तितकंच अवघड आपल्या सारख्या माणसाला प्रेम शोधणं आणि ते आपलंसं करणं आहे. पण म्हणून एकाच प्रयत्नात हातपाय गाळून बसणं मूर्खपणाचा ठरेल. जुई आणि आपल्यावर आणि आपण जुईवर जीवापाड प्रेम केलं. दोघांनी मिळून एकमेकांच्या आयुष्यातले अनेक क्षण  गंधित केले . धुंदितले ते क्षण आपल्या वाट्याला आले हे ही आपलं भाग्यच आहे. तिची साथ आयुष्यभर लाभली असती तर कुठलेच प्रश्न उद्भवले नसते पण आता गोष्ट निराळी आहे .भरतीला आलेला सागर ओहोटी लागली कि चार पावलं मागे जातोच कि ...! जुई नसतानाही आपलं आयुष्य चालूच राहणार आहे पण वेगवेगळ्या मार्गाने.
 विचारांची इतकी गर्दी रामच्या मनात झाली पण त्याला सगळं पटू लागलं होतं. त्याने हलकेच क्षितिजाकडे नजर टाकली. नक्षत्रांचं स्वागत करायला सूर्यानं जाताजाता क्षितिजावर रंगांची मुक्त उधळण करून ठेवली होती. चारही दिशांनी काळोख हळूहळू अथांग सागरावर पसरू लागला होता. मगाशी उडणारा सागरपक्षी आपल्या घरट्यात परतला होता. फेसाळणाऱ्या लाटा मात्र अजूनही किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या. रामाच्या मनात विचार आला, निसर्गच प्रश्न टाकतो आणि त्याची उत्तरं सुद्धा आजूबाजूला मांडून ठेवतो सागरा पक्ष्याची आजची भेट आपल्याला असंच बरंच काही देऊन गेली होती.
हळूहळू चांदणं आकाशात पसरलं आणि रामनं त्या चांदण्यात घरची वाट धरली. दूरच्या एका घरातून एका गाण्याचे बोल रामच्या कानावर पडले आणि तो ही ते गुणगुणू लागला...
 “वो चांद खिला ,वो तारे हसे, ये रात अजब मतवारी है, समझने वाले समझ गये है, ना समझे वो अनाडी है .”        
                                                                  २ जून २०१२
.......आनंद 


1 comment: