सरते वर्ष आणि त्याच्या बरोबर पुढच्या वर्षा साठी जुने ठरणारे या वर्षीचे भटकंतीचे क्षण यावर थोडं विचार केला आणि उमगलं कि नित्य नेमाने नव्याची आस असणाऱ्या भटक्या जीवाने या वर्षीही खूप काही अनुभवलंय. नव्या आणि तितक्याच ताज्या क्षणांनी व्यापून गेलेलं हे वर्ष खरोखर आनंददायी होतं. हि भटकंती कधी अनोळखी लोकांबरोबर होती, तर कधी आपल्या माणसांबरोबर , कधी एकट्याने तर कधी परक्या देशातल्या नव्या मित्रांबरोबर ,कधी आड वाटेवर तर कधी अगदी डोळे झाकून चालता येईल अशा रुळलेल्या वाटेवर, कधी पावसाळी ढगाबरोबर पाठशिवणीचा खेळ करत, तर कधी उन्हापासून लपतछपत. जीव भटकत राहिला आणि त्यानेच नवी उर्जा मिळत राहिली. उर्जेचा तो झरा कधीच आटला नाही याला कारण अर्थात आपल्या माणसांनी दिलेली हक्काची साथ. भटक्या जीवाची भूक भागवताना एक बाजू कमकुवत पडू न देण्याची जबाबदारी घरातल्या माणसांनी सांभाळली आणि याच कारणामुळे आज प्रचंड वेगळे अनुभव घेऊन जीव जरासाही थकला नाहीये. उलट नव्या वर्षीच्या भटकंतीच्या तयारीला आता पासूनच लागलाय.
थोडासा मागे वळून पाहावा म्हटलं तर काही ठळक आणि लक्षात राहण्या सारखे अनुभव प्रत्येक वळणावर येत होते, २०१५ वर्षाची सुरुवात झाली ती वासोट्याच्या ट्रेक ने. जानेवारी महिन्यातल्या त्या ट्रेक ने धमाल आणली. ४ जानेवारीला ७ जणांच्या आमच्या ग्रुप ने वासोटा सर केला. कार मध्ये खच्चून भरलेल्या Bags, रात्री पोहोचल्यावर थंडी मध्ये कुडकुडत केलेलं maggi आणि ओम्लेट, मंदिरामध्ये काढलेली रात्र, पहाटेच्या धुक्याने धूसर झालेला शिवसागर जलाशय , बोटीचा रम्य आणि कधीच संपू नये असं वाटणारा प्रवास , पहिल्याच दर्शनाने मनात घर करणार वासोटा , वर पोहोचल्यावर चारी दिशांना पसरलेलं दाट अभयारण्य आणि शिवसागर जलाशयाच्या मध्ये मध्ये डोकावणाऱ्या खुणा आणि गड उतरून पुन्हा पायथ्याशी आल्यावर त्या शांत सायंकाळच्या वातावरणात अजून गूढ दिसणारं ते आजूबाजूचं जंगल हे सगळंच केवळ अदभूत होतं आणि आहे. योगायोगाने माझ्या या आवडत्या किल्ल्या पासूनच या नवीन वर्षाची सुरुवातही होण्याची शक्यता आहे आणि मी पुन्हा एकदा त्याला डोळे भरून पाहायला आतुर आहे.
मार्च मध्ये चीन ला भेट देण्याचा योग आला आणि पहिल्याच आठवड्यात "Hangzhou" या चीन मधल्या एका नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिध्द असलेल्या आणि “West Lake” या UNESCO World Heritage Site ला भेट देण्याचा बेत ठरला आणि तो साध्यही झाला. ८२१० एकर मध्ये पसरलेला हा परिसर केवळ नयनरम्य आहे. २ दिवसाच्या या परक्या देशातल्या अचानक ठरलेल्या प्रवासाने तिथल्या संस्कृतीला जाणून घेण्याची संधी फारच लवकर मिळाली होती. तिथे एकगोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे tourism क्षेत्राला लाभलेला सरकारचा वरदहस्त आणि त्या मुळे खूप चांगल्या प्रकारे अबाधित राखलेलं निसर्गाचं रूप. काळानुसार अर्थात त्यात बदल होत जातात पण तरीही पुढची पिढी त्यापासून वंचित राहत नाही. चीनच्याच माझ्या वास्तव्यामध्ये मी अर्थात ज्या शहरात राहिलो होतो तिथल्या जवळपास कुठे डोंगर दऱ्या किंवा फोर्ट आहे का हे आधीच शोधलं होतं आणि त्यात भेट देण्याच्या यादीत सगळ्यात पहिल नाव होतं ते “Huangshan mountain” किंवा “ Yellow mountain” हे सुद्धा १९९० पासून एक “UNESCO World Heritage Site आहे. पाईनची टोकदार झाडे , वरून जरूर अनुभवावा असं केवळ अप्रतिम सूर्यास्त, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे “Granite peaks” हे फक्त डोळ्याने पाहून तृप्त व्हावं इतकं सुंदर आहेत. वर असलेली खूप शिखरे १००० मीटर पेक्षा जास्त उंच आहेत. त्यातलं आम्ही भेट दिलेली “Bright Summit Peak” हे १८४० मीटर उंची वर आहे. १०० million वर्षाआधी एका समुद्राच्या नाहीसं होण्याने निर्माण झालेली हि शिखरे निसर्गाचा एक चमत्कारच आहेत. इथेही मला भावलेली एक गोष्ट म्हणजे इथलं हे पर्यटन फक्त तरुणाई पर्यंत सीमित नव्हतं तर मला इथे प्रत्येक वयोगटातील माणसे दिसत होती. अगदी हातात काठी घेतलेले सत्तरीचे आजी आजोबा, संपूर्ण परिवार सोबत चढाई करायला आलेलं कुटुंब, लहान मुलांचे ग्रुप्स , तरुणांचे कॅम्प्पिंग चे ग्रुप्स आणि या सगळ्यांची प्रचंड गर्दी हे दृश्य खरोखर लोभस होतं. हे दृश्य दिसायला कारणेही तशीच होती कारण इथेही खूप प्रकारच्या सोयी सरकारने करून ठेवल्या आहेत त्यामुळे अर्थात निसर्गाच्या जवळ जाऊन त्याला अनुभवायची अशी संधी कोण सोडेल. या शिखारांवरचे २ दिवसांचे वास्तव्य खूप काही शिकवणारे होते. त्या शेकडो लोकांमध्ये मी परक्या देशातला असूनही मला केवळ एक “भटका” म्हणून मी त्यांच्यातलाच वाटत होतो. “Yellow mountain” सर करून परतताना वाटेत पावसाने गाठून जणू काही आम्हाला निरोप दिला होता. खाली आलो तरी दूरवरची शिखरे अजूनही खूप काही बोलत होती. त्या मूक संवादाला कुठल्याही भाषेचा अडथला नव्हता.
भारतात परत आल्यावर मे महिन्यात पौर्णिमेला गोंदवल्याला जाण्याचा योग आला. आम्ही अनेकदा तिथे गेलो असलो तरी निषादचा हा पहिला मोठा प्रवास होता. प्रवचन, गीत रामायण आणि तिथल्या प्रसादाने मन तृप्त झाल्या शिवाय राहत नाही हा अनुभव जवळ जवळ सगळ्यांचाच आहे. आध्यात्म हि काही म्हातरपणाची सोय नसून खरतर ती आपल्या जीवन शैलीचा भाग बनवून आयुष्यातल्या वेगाला सामोरा जाण्याचं एक इंधन आहे असं मला वाटतं. सगळ्या कुटुंबासोबत केलेली ट्रीप अनेकदृष्ट्या खूप काही साध्य करणारी होती. साधेपणा आचरणात आणला तर कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याचं बळ मिळत हेच खरं आहे आणि हाच अनुभव तिथे वावरणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहून मला नेहमी येतो. जमिनीवर राहण्यासाठी तेवढा अनुभव पुरेसा ठरतो.
मे महिना सरून तशी पावसाची थोडी चाहूल लागली तशी त्याला शोधात फिरण्याची ऊर्मीही जागृत झाली. आज इथे, उद्या तिथे असं बरसणारा पाउस आपल्यावर कधी बरसेल हि आस लागून राहिली होती. आणि याच वेडातून घडल्या त्या पाबे घाट आणि बारामती च्या वेगवान आणि तितक्याच फ्रेश अशा बाईक राईड. पहाटे थोड्याफार गारव्याला सुरु होऊन दिवस मावळे पर्यंत संपणारे हे साधारण १५०/ २०० किमी चे छोटे अनुभव सुद्धा महिनाभर पुरेल एवढी तरतरी शरीरात भरून गेले हे मात्र नक्की. यात सगळ्यात जास्त भावलेला क्षण म्हणजे बारामती वरून परतताना पावसाच्या सरीने दिलेला सुखद धक्का. एकंच ढग दाटून यावा आणि त्याने बरसून आम्हाला चिंब भिजवावं आणि त्यातून आम्ही सावरे जणू काही घडलंच नाही असं दाखवून पुढे निघून जावं अशी लबाडी त्याने दाखवली होती.
जुलै जसा उजाडला तसा बेत ठरला नाशिकचा, एका कौटुंबिक कार्यक्रमाला नाशिकला जावं लागणार होतं आणि मग भटकंती प्रिय परिवाराने तोच बेत अजून पुढे वाढवला आणि आमची मजल गुजरात मधल्या सापुतारा या थंड हवेच्या ठिकाण पर्यंत गेली. नाशिक मधेही काळा राम आणि गोरा राम मंदिरे, पंचवटी, रामघाट या गोष्टी एकदा पाहून याव्या अशा आहेत. निषाद साठी हि पुन्हा एकदा दूरची रोड ट्रीप आणि आमच्या साठी एक नवीन अनुभव होता. माझ्या ertiga च्या ७०० किमी च्या या कार प्रवासात खूप धमाल आणणारे काही क्षण होते अन काही केवळ डोळ्याने अनुभवण्याचे. आम्ही राहिलो तिथल्या रेसोर्ट समोर एक लेक होता पण पावसा अभावी तिथे फारसं पाणी नव्हत. पहिल्या दिवशी सकाळी उठून बाहेर बघताना धुकं पांघरलेला तो लेक, प्रचंड वाऱ्याने सळसळणारी झाडे आणि वरून वाहणारे ढग हे दृश्य केवळ अप्रतिम होतं. निसर्ग खरोखर अदभूत आहे तो याच साठी कारण वाहणारा वारा ठरवून वाहत नाही किंवा बरसणारी सर ती ठिकाण बघून बरसत नाही, निसर्गात मुळातच तो मुक्तपणा भरलेला आहे , साचे बद्ध गोष्टी माणसाने शोधून काढल्या आहेत आणि घड्याळाच्या शोधाने त्याला अगदी बंदिस्तच केलं आहे. त्यामुळे तासाने चालायची सवय लागलेल्या जीवाला तो मुक्तता लगेच अंगवळणी पडत नाही.
जुलै मध्ये पुन्हा एकदा घडला तो एका अजून नव्या देशाचा छोटा पण वेगळा अनुभव. देश होता ब्राझील. कामा निमित्त घडलेला ४ -५ दिवसांचा हा प्रवास एखद्या भटक्या साठी पुरेसा होता. भारताशी बरेचसं साम्य असणारी तिथली भौगोलिक परिस्थिती, हवामान आणि लोकांची मानसिकता या जमेच्या बाजू मला आढळल्या. एवढं असलं तरी ब्राझील जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहेत हे नक्की. वेगाने बदलणारी शहरे हे त्याचीच द्योतक आहेत. तिथल्या माणसां बद्दल एक गोष्टी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आयुष्याचा पुरपूर उपभोग घेणे, व्यक्ती स्वात्यंत्र, आनंदी वृत्ती आणि स्वतःच्या कामा बद्दल असलेली आत्मीयता. खुपश्या formalities मध्ये न अडकणाऱ्या तिथल्या संस्र्कुती मुळे परका माणूस तिथे लगेच रुळतो. तिथल्या माझ्या छोट्या वास्तव्यात “TAM” नावाच्या एका विमानाच्या musium ला भेट देण्याचा योग आला आणि पुन्हा एकदा जाणवलं ते पर्यटनाकडे कटाक्षाने लक्ष देणारी सरकारी यंत्रणा. तिथेही खासगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र याचा चांगला मेळ घातलेला दिसतो.
ऑगस्ट मध्ये पावसाने पुनरागमन केलं आणि पावले वळली ती पुन्हा एकदा त्याच्या शोधात. या वेळी ठिकाण होतं चळकेवाडी , सातारा इथल्या पवनचक्क्या. पहाटे बाईक वरून सुरु झालेला प्रवास कास पठार, ठोसेघर, चळकेवाडी असा मजल दर मजल करत पवनचक्क्यांच्या एका अदभूत दुनियेत येऊन थांबला. प्रचंड मोठी पाती असणाऱ्या आणि वाऱ्याच्या शक्तीने फिरणाऱ्या खरतर घोंगावणाऱ्या पावनचक्या खरोखर चमत्कार वाटावा इतक्या भन्नाट दिसतात. नैसर्गिक शक्तीच्या माध्यमातून होणारी हि वीज निर्मिती वाखाणण्या योग्य आहे . चळकेवाडी ला अशा १००० पेक्षा जास्त पवनचक्क्या आहेत. आम्ही वर पोहोचलो तेव्हा डोंगर धुक्याने भरून गेलेला होता. आजूबाजूला पावनचक्क्यांचे खांब तर दिसत होते पण त्यांची पाती मात्र वर ढगात दडून बसलेली होती. ढग पुढे जाताच डोकावणारी पाती लपछपी खेळत असल्याचा भास मला झाला. निसर्ग खरोखर अजूनही आपल्या साठी गूढ आहे. मधून येणारी पावसाची सर, दाट धुके , हलका वारा, चिखलाने माखलेला रस्ता हे एखद्या भटक्याला आवडणारे दृश्य इथे होते आणि तोच क्षण या संपूर्ण ट्रीप मधला खरतर खरा भावलेला क्षण होता.
सप्टेंबर मध्ये बेत ठरला तो नाशिक जवळच्या “पट्टा” (विश्रामगड), रतनवाडी, भंडारदरा इथल्या भटकंतीचा. वेगवेगळ्या छोट्या इतक्या अनुभवांनी भारलेला हा प्रवास खरोखर साहसी होता. पुण्यातून रात्री ११ ला सुरु झाला प्रवास “पट्टा” ( विश्रामगड ) गडाच्या दिशेने. काळ्या मिट्ट रात्री रानावनातून, झोपी गेलेल्या गावातून, डोंगरातल्या नागमोडी रस्त्यातून आणि वर चांदण्या आकाशाच्या साक्षीने प्रवास घडला. पहाटे “पट्टा “ समोर दिसत असताना आमची वाट अडवली ती आडव्या गेलेल्या पाण्याच्या प्रवाहाने. मागे वळणं अशक्य आणि पुढे जाण अवघड अशा परिस्थितीत अडकलेलो असताना, शेवटी आजूबाजूचे दगड गोळा करून कार च्या चाकांना थोडा आधार मिळेल अशी सोय केली आणि धीर धरून माझी कार त्या पाण्यात घातली. आणि सुदैवाने हि बाहेरही आली. साधारण ९ ला पट्टा चढायला सुरुवात केली, वर पोहोचलं कि चारही दिशांना वेगवेगळे असे अप्रतिम दृश्य नजरेस पडत. वरून, “औढा” किल्ला दिसतो, दूर कळसुबाई, AMK, वितंडगड दिसतात. पट्ट्यावरून आम्ही निघालो रतनवाडीच्या अमृतेश्वर मंदिराकडे, भंडारदरयाला पोहोचून रतनवाडी कडे कूच केलं, साधारण तासाभराच्या प्रवासात दाट जंगलाच्यामधोमध गेलेल्या नागमोडी रस्त्याने तिकडे पोहोचलो. मंदिर फार सुंदर आहे. काळ्या पाषाणात कोरलेल्या रेखीव मूर्ती भूतकाळच्या खुणा अधोरेखित करतात. आजूबाजूला पसरलेलं अभयारण्य त्या सौंदर्यात अजून भर घालत. रात्रीची सोय म्हणून तिकडेच कॅम्पिंग साठी जागा शोधली आणि निसर्गाच्या कुशीत झोपी गेलो. थंडीमुळे दवाचे थेंब पाणी होऊन गवतांच्या पात्यांवरून झिरपत होते. जंगलातले अनामिक आणि गूढ आवाज मधेच लक्ष वेधून घेत होते. रात्र संपून पहाट झाली आणि आम्ही परतीचा मार्ग धरला. त्या मार्गावर रंधा falls हा महाराष्ट्रातला सर्वात उंच धबधबा पहिला आणि पाण्याच अजून एक रूप पाहिलं. ठरवून केलेल्या भटकंती पेक्षा थोडी जास्त मजा हि अनिश्तीतते मध्ये असते हे या भटकंती ने पुन्हा एकदा शिकवलं होतं. आलेले अनुभव केवळ दुर्मिळ होते आणि म्हणून ते जवळचे होते. स्वतःमध्ये डोकवायला असे अनुभव फार मोठी मदत करतात आणि आपल्या छोटे पणाची जाणीव करून देतात.
ऑक्टोबर मध्ये पुन्हा एकदा ऐनवेळी ठरवलेला प्लान म्हणजे कोयना मधली भटकंती. ४५० किमी च्या ertiga प्रवासात असेच दुर्मिळ आणि चिरकाल टिकणारे अनुभव आले ते भैरवगड आणि कोयना / चांदोली अभयारण्या मधल्या जंगल सफारी मध्ये. अनेक डोंगर रस्ता नसलेल्या कच्च्या मार्गावरून जीप ने पार करत साधारण २ तासाच्या प्रवासानंतर आम्ही भैरावगडावरच्या मंदिरात पोहोचलो आणि थोडं जवळपासचा परिसर पायी चालून आजूबाजूच्या डोंगर रांगा पहिल्या. निषादसाठी हा ही अनुभव पहिलाच होता आणि साहसी हि. जाताना च्या प्रवासापेक्षा येताना चा प्रवास अजून थ्रिल्लिंग होता कारण दूरदूर पर्यंत पसरलेल्या मिट्ट काळोखात जीपच्या २ दिव्यांशिवाय कुठलाच प्रकाश नव्हता आणि आजूबाजूच्या दाट जंगलाने तो अनुभव अजून थरारक बनवला होता. साधारण दोन अडीच तासाच्या प्रवासाने आम्ही पुन्हा कोयना नगरला पोहोचलो. कोयना धरणाच्या भिंतीवरच्या दिव्यांना पाहत MTDC च्या रेसोर्ट वर पोहोचलो. संथ लयीमध्ये वाहणाऱ्या आजूबाजूच्या जीवानशैलीमध्ये आपण नकळत विरघळून जातो आणि तोच अशा भटकंतीचा परमोच्च क्षण असतो.
नोव्हेंबर मध्ये घडला तो “beyond mountains“ सोबत कळसुबाई चा ट्रेक. सरळ, साधा तरीही चिरकाल टिकणारा अनुभव देणारा. १६४५ मीटर उंचीचा महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर ३५ लोकांनी पार केला आणि कधीही न विसरणारा क्षणांचे साक्षीदार झाले. वरून दिसणारं दृश्य शब्दात मांडणं खरोखर अवघड आहे. दमछाक करत जेव्हा माणूस वर पोहोचतो तेव्हा त्याला वर पोहोचताना पडलेल्या कष्टाचा विसर न पडेल तर ते नवल आहे. कधी कधी काही गोष्टींचा आपण फक्त साक्षीदार असतो तर कधी आपण त्याचा एक भाग बनतो. इथे मात्र दोन्ही अनुभवायला मिळत आणि ते हि एकाच वेळी. इतक्या उंचीवर पोहोचल्यावर आपण जणूकाही त्या शिखाराचाच भाग बनतो तर दुरून पाहताना आपण प्रेक्षकाची भूमिका बजावत असतो.
नोव्हेंबर मध्ये अजून एक भटकंती झाली ती म्हणजे माझ्या आवडत्या समुद्र किनाऱ्याची, दापोली ची. ५५० किमी च्या या प्रवासाने मन तृप्त केले. आंबा,काजू,सुपारी च्या वाडी मध्ये असलेलं होम स्टेचा लोकेशन, रुचकर जेवण ,बीच वरची मऊ रेती या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जणूकाही थांबलेले घड्याळाचे काटे. रेंगाळणारा दापोलीचा अनुभव हे नेहमीच माझ्या साठी एक हवाहवासा अनुभव असतो. तो या वेळीही सार्थ झाला. आपण जेवढे निसर्गाशी एकरूप होतो तेवढ जगणं सोपं होतं. मला वाटतं समुद्र खरतर नेहमी बोलत असतो आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर त्याची साद नक्कीच ऐकू येते. झेपावणाऱ्या लाटा किनाऱ्याला भेटून काय म्हणत असतील असं विचार केला कि त्यांचा संवाद मनात आपोआप उमटतो. पुढच्या वर्षी उन्हं नक्की यायचं पक्का केल्या शिवाय इथून पाय निघत नाही आणि तसं ठरवूनच आम्ही तिथून माघारी आलो.
डिसेंबर मध्ये घडला तो हरिश्चंद्रगड चा ट्रेक. Beyond mountains च्या या ट्रेक च थोडक्यात वर्णन करायचा असेल तर मोजक्या शब्दात अस म्हणता येईल कि मुळात भटक्या असलेल्या जीवांना मनमुराद, मनसोक्त आणि तेवढीच जाणीवपूर्वक घडवून आणलेली एक सुंदर सफर.
वर्षातला शेवटचा ट्रेक असल्याने सगळ्यांचा उत्साह तितकाच दांडगा होता. मजलदरमजल करत कुठल्याही अडथल्याशिवाय सगळे वर पोहीचलो आणि मंदिरात जेवण उरकलं. थोडी तरतरी आल्याने पाय कोकणकड्या कडे निघाले आणि जवळ येताच त्याने सादही घातली. पण आधी राहण्याची सोय लावून मग तिकडे धाव घेतली.
संध्याकाळचा सूर्यास्त सुरेश वाडकरच्या "सुरमई शाम" ची आठवण करून देत नकळत डोळे पाणावत होता .कोकणकडा वाऱ्याशी कुजबुजत होता आणि वारा जणू त्याच्या मनीचा गुज आम्हाला वर येऊन स्पर्शातून सांगू पाहत होता. क्षितिजावरचे रंग डोळे लवताच बदलत होते आणि त्या अथांग आकाशातल्या चांदण्या हळूच डोकं वर काढून डोळे मिचकवत होत्या.
जशी रात्र झाली तसा चंद्र डोंगरामागून वर आला आणि जमीन चांदण्या प्रकाशाने भरून गेली. जणू चंद्राला पाहून वेडा पिसा होऊन वारा रौद्र वाटावा इतका जोराने वाहू लागला.
मंतरलेली रात्र संपली आणि कोवळ्या उन्हाने पुन्हा कोकणकडा न्हाऊन निघाला.
आयुष्यातले असे क्षण क्षणिक असले तरी सोनेरी असतात आणि आपण फक्त त्याचे साक्षीदार असतो. सरत्या वर्षाला मागे सारताना सर झालेला हरिश्चंद्रगड चिरकाल लक्षात राहील यात शंकाच नाही.
वर्षभराच्या भटकंतीवर नजर फिरवली तर मन आनंदी होतं पण मग त्याची भूकही अजून वाढते. भटक्या जीवाला अजून खूप काही पहायचं. दडलेल्या वाटा, सुटलेले रस्ते, अतृप्त किनारे, गूढ जंगले आणि त्यातले अनामिक आवाज, नवे डोंगर आणि त्याची खुणावणारी शिखरे. कदाचित हीच भटकंती नवीन पायवाटा शोधेल आणि जन्म देईल नव्या कुणीहि न स्पर्शिलेल्या गूढ अनुभवांना जे चिरकाल टिकतील आणि अनेक वर्ष मला जागं ठेवतील, नव्या क्षणांच्या शोधात.
भटकंती हि सुद्धा खरतरं एक भाषा आहे, संवादाचं साधन आहे असं मला नेहमी वाटतं. भटकंतीच्या याच भाषेनं आज पर्यंत खूप लोक जोडले गेले आहेत आणि अजूनही जातील.
शेवटी कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे “Sooner or later we must realize there is no station , no one place to arrive at once and for all. The true joy of life is in trip.
शेवटी मग भटकंती करतानाचा हा आनंद लुप्त होऊ न देता ती तहान वाढवत राहणं हे एवढाच हाती उरतं.
आणि म्हणूनच Its always good to be lost in right directionJ). कारण हरवलं तरच खरं तर नवीन काहीतरी गवसतं. आणि तीच तर आपली शिदोरी आहे. पुढच्या वर्षी असेच अनुभव येतील आणि ते जमतील तसे शब्दात बंदिस्त करायचा संकल्प करून इथेच थांबतो.
३१ डिसेंबर २०१५
इति आनंद
शेवटी कुणीतरी म्हणून ठेवलंच आहे “Sooner or later we must realize there is no station , no one place to arrive at once and for all. The true joy of life is in trip.
शेवटी मग भटकंती करतानाचा हा आनंद लुप्त होऊ न देता ती तहान वाढवत राहणं हे एवढाच हाती उरतं.
आणि म्हणूनच Its always good to be lost in right directionJ). कारण हरवलं तरच खरं तर नवीन काहीतरी गवसतं. आणि तीच तर आपली शिदोरी आहे. पुढच्या वर्षी असेच अनुभव येतील आणि ते जमतील तसे शब्दात बंदिस्त करायचा संकल्प करून इथेच थांबतो.
३१ डिसेंबर २०१५
इति आनंद