Powered By Blogger

Wednesday, April 9, 2014

मनातून - भाग ४ : एकटेपणा





एकटेपणा नेहमी खायलाच उठतो असं नसतं. तुम्ही स्वतःशी संवाद साधायला त्याचा उपयोग करून घेऊ शकता. एरवी गर्दीत स्वतःचा हरवलेला आवाज कान देऊन ऐकला तरी ऐकू येत नाही. पण एकटेपणात मात्र तो स्पष्ट ऐकू येतो. त्या आवाजात कधी आपल्याच माणसांच्या आपल्यापर्यंत न पोहोचलेल्या आर्जवी हाका असतात, तर कधी आपल्याला त्यांच्या बद्दल वाटणारं प्रेम कुजबुजत असत , कधी स्वतःकडे त्रयस्थपणे बघणारी आपलीच नजर आपल्याला दोन शब्द सुनावते, तर कधी आजूबाजूच्या शांततेतून एखादी कौतुकाची थाप आपलाच आत्मविश्वास वाढवून जाते.  पण त्यासाठी माणसाला एकटेपणा एन्जॉय करता आला पाहिजे, ऐकायला सोपं असलं तरी ते तितक सहज नसतं. माणस स्वतःशी बोलायला घाबरतात ते उगीच नाही.  
मनाच्या तळाशी पोहोचलं कि खोली तर वाढत जाते पण प्रकाशही कमी होत जातो समुद्राच्या तळाशी होतं ना अगदी तसच. धूसर झालेल्या त्या चित्राचा अर्थ लावणं हीच खरी कसोटी असते. तिथे मग एखादं सुंदर स्वप्नवत वाटावं असं जग दिसतं तरी कधी अंधारात चाचपडताना भूतकाळाशी नातं असलेली शेवाळी सामोरी येतात. तिथंही स्वप्नांना आणि भूतकाळाला वर्तमान वास्तवांपासून दूर ठेवता यायला हवं, तेवढं जमलं कि अर्धी लढाई तिथेच संपते. मग उरतं ते स्वतःबद्दल कुठल्याही भ्रामक कल्पना नसलेलं नितळ मन.  ज्यात स्वतःच प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागतं आणि आयुष्यामधले सगळे प्रश्न गळून पडतात. एकटेपणाचा स्वतः जाणून घेण्यासाठी असा उपयोग किती जण करून घेतात ?
म्हणून मला वाटतं एकटेपणापासून पळण्यापेक्षा त्याला सामोर जाण अवघड असलं तरी तितकंच जास्त महत्वाचं आहे. 

गर्दीत जाऊन पुन्हा नव्या जोमानं आयुष्याशी दोन हात करण्यासाठी या एकटेपणाचा वापर करून घेता आला तर माणसाचं आयुष्य खरच पालटू शकतं. कळपापासून कधीच दूर न राहिलेल्या हरणाच्या पाडसा पेक्षा एकट राहून जग पाहून आलेलं एखादं पाडस बाहरेच्या जगातल्या अनुभवाच्या बळावर स्वतःचा जीव वाचवू शकत, जेव्हा इतर पाडसं मात्र जीव वाचवायला दुसऱ्याची मदतीची वाट पाहत बसतात. एकट राहून स्वतःच्या क्षमतेबद्दल मिळवलेला आत्मविश्वास गर्दीत येऊन स्वतःचं वेगळेपण टिकवायला मदत करतो. एकटेपणातून मिळालेली या पेक्षा मोठी देणगी कोणती ? 

९ एप्रिल २०१४
आनंद



Saturday, March 29, 2014

लघुकथा : वेगळा


आजही राम ला शाळेत यायला उशीर झाला होता. आणि नेहमी प्रमाणे सुमित त्याची वाट पाहून वर्गात निघून गेला होता. राम नुकताच मागच्या महिन्यात शाळेत येऊ लागला होता. दिसायला सावळा असला तरी सरळ नाक, बोलके डोळे, निरागस चेहरा असलेला राम कुशाग्र बुद्धी मुळे राम सगळ्या मास्तरांचा आवडता झाला होता. तो मुळात या गावातच तो नवीन होता. पण एवढ्या थोड्या दिवसातच राम आणि सुमित ची चांगलीच मैत्री जमली होती. दोघे एकाच वर्गात आणि एकाच बाकावर बसत होते. आठवीचा तो वर्ग तसा फार मोठाही नव्हता जेमतेम ३० मुलं होती वर्गात. आणि गावही छोटं असल्यानं प्रत्येकालाच एकमेकांबद्दल माहिती होती.
राम हुशार होता पण फारसा बोलका नव्हता. सुमित शाळा सुरु होण्या पूर्वी मैदानावरच्या वडाखाली रामची वाट पाहत बसायचा. पण जसं आज झालं तसच बऱ्याचदा व्हायचं आणि रामला शाळेत यायला उशीर व्हायचा. धावत पळत राम वर्गात आला. मास्तरांनी चष्म्याचा वरून त्याच्याकडे नुसता कटाक्ष टाकला आणि बसायला सांगितलं. आज शनिवार त्यामुळे शाळा लवकर सुटली. सुमित आणि राम शाळे बाहेर पडले. सुमितने रामला सकाळी झालेल्या उशिरा बद्दल विचारलं. अरे काही नाही रे उठायला जरा उशीर झाला असं सांगून विषय टाळला. राम त्याच्या आई आणि आजी बरोबर राहत असे. त्याला वडील नव्हते. मैदानावर थोडावेळ खेळून दोघेही आपापल्या घरी गेले.
  


इकडे सुमित नेहमी प्रमाणे राम च्या गुणांचा पाढा आई समोर गात होता. आईलाही उत्सुकता लागून राहिली कि नक्की हा राम आहे तरी कोण कि ज्याच्याशी माझ्या सुमितची इतक्या कमी वेळात इतकी घट्ट मैत्री झाली होती. आई सुमित ला म्हणाली “अरे सुमित तुझ्या त्या रामला आपल्या घरी तरी बोलाव एकदा. बघू तरी कोण आहे हा तुझा नवीन मित्र”. हो आई मी किती वेळा म्हणतो रामला घरी चल म्हणून पण तो नेहमी काहीतरी कारण देतो बघ. पण या वेळी मी त्याला आणतोच बघ घरी. असं म्हणून सुमित रामच्या घराकडे निघाला. त्यालाही रामचं घर तसं माहित नव्हतं पण गावाच्या वेशीपाशी कुठेतरी तो राहतो असं तो म्हणाल्याचं सुमित ला माहित होतं. सुमित चालत चालत वेशीकडे निघाला.
वेशीवर पोहोचताच एक त्याला झोपडीवजा घर दिसतं. बाहेर एक म्हातारी बाई बसलेली दिसते. सुमित पुढे येऊन विचारतो राम इथेच राहतो का ?  “व्हय, तू कोण आहेस र पोरा ?  मी राम चा मित्र आहे. सुमित उत्तर देतो. “असं व्हय बस बस इथं, मी रामची आजी हाय. राम जरा पलीकडच्या गावात गेलाय येईल एवढ्यात, तू बस.” 

थोड्याच वेळात सुमितला दुरून राम येताना दिसतो. त्याला पाहून राम थोडासा अस्वस्थ होतो. रामची आईपण मागून येते. आजी आईला सुमित बद्दल सांगते. आई दोघांना बसायला सांगून आई जाते.
राम विचारतो “ तू कसा काय आलास इकडे अचानक ?”. अरे माझ्या आईने तुला बोलावलं होतं घरी म्हणून तुला बोलवायला आलो होतो. पण तू कुठे गेला होतास ? काय बोलावं न कळल्यानं राम उठून आत जातो. आजी दुरून सगळं पाहत असते. सुमित उठून आजी पाशी येतो. आज्जी तुम्ही तरी सांगा राम कुठे गेला होता ?
बाळा, राम ला वडील नाहीत. घर चालवायला घरात कर्ता माणूस नाही. त्यात आमी खालच्या जातीचे आहोत पोरा. राम आणि त्याची आई पलीकडच्या वाडीत बांधकामावर मोलमजुरी करायला जातात. राम खूप गुणी पोर आहे. लहान वयात सगळं गिळून कष्ट करतो बघ. त्याला खूप शिकून मोठं व्हायचंय बघ. म्हणून आम्ही या गावात आलो कारण इथं शाळा आहे. रात्री जकात नाक्यावरच्या दिव्याखाली अभ्यासाला जातो बघ माझा राम. वेळ मिळेल तेव्हा पडेल ते काम करतो पण एका शब्दानं कुरबुर करत नाही. माझा राम खरच सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे.
सुमित ला हे सगळं अनपेक्षित असत. इतके दिवस यातलं आपल्याला काहीच माहित नव्हतं याचं त्याला दुखःही होतं.  सुमित तिथून निघतो. रामच्या उशिरा येण्यामागची कारणे सुमितला कळू लागतात. रस्त्याने येताना त्याच्या डोक्यात खूप विचार येऊ लागतात.
रविवार संपतो आणि पुन्हा शाळा सुरु होते. इकडे सुमित ला रामची कहाणी कळल्याने त्याला राम बद्दल अजून आदर निर्माण होतो. आपण किती सुखात आहोत आणि राम ला किती कष्ट करावे लागतायत याचं सुमितला मनोमन वाईट वाटतं. 

तिकडे सुमितची आई त्या राम बद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल माहिती काढते. ते कोण आहेत आणि कुठे राहतात हे कळल्यावर मात्र तिला चिंता वाटू लागते. संध्याकाळी सुमित शाळेतून घरी येतो. आज आई त्याच्यासाठी आवडीचं जेवण बनवते. जेवायला बसल्यावर आई रामचा विषय काढते. ती म्ह्णते “हे बघ सुमित, अरे तो राम काही फार चांगल्या घरातला नाही आणि तो काही आपल्या बरोबरीचा पण नाही. त्यामुळे तू काही त्याच्याशी फार मैत्री करू नकोस.”

आई पण चांगलं माणूस म्हणजे काय गं ?
अरे चांगलं माणूस म्हणजे जो सर्वांची काळजी करतो, कष्ट करतो ज्याच्या आयुष्यात ध्येय असतात तो चांगला माणूस.

क्षणभर सुमित शांत बसतो आणि म्हणतो , “होय आई तू म्हणतेस ते बरोबरच आहे बघ. तसा राम वेगळाच आहे. माझ्यापेक्षा खूप वेगळा. मी इथे आपल्या घरात बसून अभ्यास करू शकतो पण त्याला मात्र रस्त्यावरच्या दिव्याखाली करावा लागतो. तो आई बरोबर मोलमजुरी करून कष्ट करतो पण मी मात्र नुसताच हुंदडतो. माझी काळजी सारं घर करतं पण त्याला घराची काळजी करावी लागते. त्याच्या आयुष्यात काहीतरी बनण्याचं ध्येय आहे. खरच तो वेगळा आहे ना आई ? भवतेक मीच त्याच्या लायकीचा नाही. एवढं बोलून सुमित उठतो.
आईच्या मनात काहूर माजत , त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिचे डोळे न कळत पाणावतात. समोरचं दृश्य धूसर होत गेलं तरी तिच्या मनात मात्र लख्ख उजेड पडतो. 
                                                            आनंद
                                                                  ३० मार्च २०१४     
     

Friday, February 28, 2014

मनातून भाग ३



 


मनातून या सदरातून या आधी मला जे वाटतं ते मी लिहिलं. आताही पुन्हा गेल्या काहीदिवसात मनात उठलेल्या प्रश्नांना मी आज मोकळी वाट करून देत आहे. मागच्या एका जुन्या लेखामध्ये देउळ या विषयावर मी बरंच लिहिलं होतं. आता इथेही देव हीच व्यक्तिरेखा समोर असली तरीही मुख्य पात्र हे आपण सगळे आहोत. गेल्या वर्षभरात मला जास्त करून जाणवलेली ,खरंतर खुपलेली एक गोष्ट म्हणजे सणांच्या उत्सवांच्या नावांवर देवाचा मांडलेला बाजार. मग तो गणेशोत्सव , नवरात्र, महाशिवरात्र , ईद यापैकी काहीही असलं तरी त्याने काहीही फरक पडत नाही. कुठल्याशा मंदिराला वर्गणी काढून सजवलं, मोठे लाउड स्पीकर लावले त्यावर चोविसतास चालणारी चित्रपटांच्या गाण्यांच्या चालीवरची गाणी लावली की भक्तांच्या मोठ्या रांगा आपोआप लागतातच हे ही गृहीत झालं आहे. तिथल्या देवळातला देव मला हरवलेला वाटतो. मुळात तो मला दिसतच नाही. 

अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आताच मी राजस्थान ला जाऊन आलो. तिथे अजमेर ला मोठा दर्गा आहे असं ऐकलं होतं आणि पुष्कर इथे ब्रह्म देवाचं जगातलं एकमेव मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी जायचं ठरवलं. आधी पुष्कर मधल्या बम्ह्देवाच्या मंदिरात आलो. भक्तांची मोठी रांग इथेही होतीच. पण मला उत्सुकता होती ती बम्ह्देवाच्या मूर्तीची. देउळ तसं साधंच असलं तरी मूर्ती मात्र सुंदर होती. मंदिरात देणगी भरपूर येत असावी कारण तिथली जमिनीवरची प्रत्येक फारशी कुणीतरी दान देलेली दिसत होती. कुणाच्या तरी नावाने अर्पण केलेल्या त्या फरश्या शेवटी भाविकांच्या पायाखालीच येत होत्या. मंदिरातून आम्ही पुष्कर तलावाकडे गेलो. तिथे एके ठिकाणी एक ब्राम्हण पुढे आला आणि आम्हाला बसायला सांगून या जागेची माहिती पुरवू लागला. तो सांगत असलेलं इतिहास तसा रंजक होता. साधारण एक १५ मिनिटे माहिती सांगितल्यानंतर तो त्याच्या मूळ मुद्य्यावर आला. जे मला अपेक्षित होतंच. या दुकानावरून फुले घेऊन आता आपण या तलावाची पूजा करुया असं तो म्हणाला. अर्थात आम्हाला ते नको. होतं. मी पुढे होऊन त्याला माहिती सांगितल्याबद्दल ५० रुपये देऊ केले. ते नाकारून तो अगदी उपहासाने आम्हाला सांगू लागलं की आमच्यात भक्ती भाव कसा कमी आहे, त्याचा आम्हाला कसा त्रास होईल वगैरे. पण त्याला कशालाही दाद न देता आम्ही तिथून निघालो. अर्थात त्याचं एक गिऱ्हाईक कमी झालं होतं. तिथून आम्ही खाली आलो, तिथे तलावाच्या पाण्यात अनेक जण डुबकी मारून सगळी पापं धुवून काढत होते. पण इथे वर मात्र  भोळ्याभाबड्या लोकांना लुबाडून मात्र काही लोक पापाचे धनी होण्यात धन्यता मानत होते. हा विरोधाभास खरोखर त्रासदायक होता. गाभाऱ्यातला देव का नाहीसा होऊ लागलाय हे कळायला मला फार वेळ लागलं नाही. 
 

जसा अनुभव या मंदिरात आला तसाच प्रकारचा अनुभव अजमेरच्या दर्गा शरीफ मधेही आला. गाडी खूप अलीकडे लावून आम्ही चालत दर्ग्याकडे निघालो. जाताना रस्त्यात गुलाबाच्या फुलांच्या चादरी, फुलांच्या माळा , डोक्याला बांधायचे रुमाल, अत्तरे  याची असंख्य दुकाने होती. पायातल्या चपला ठेवण्यासाठी काहीच न मिळाल्याने आम्हाला एका दुकानातून फुलं घ्यावी लागली. इथला देवाचा बाजार सुद्धा काही वेगळा नव्हता. इथेही सर्व धर्माच्या लोकांची खूप गर्दी होती. आत जाऊन दर्ग्याच्या मुख्य चौथार्याचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती. अक्षरशः धक्काबुक्की करून दरवाजा पर्यंत पोहोचून डोळ्याला काहीच दिसलं नाही. हातातली फुलं तिथल्या माणसाच्या हातात देऊन मागे वळलो. मनात एकच प्रश्न होता. आपण काय पाहिलं. कदाचित हा ही गाभारा सुनाच असेल.
सणांच्या दिवशी भरून वाहणारी मंदिरे दुसऱ्या दिवशी तितकीच सुनी असतात. इतर दिवशी सुना पडलेल्या गाभाऱ्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. मला वाटतं खरतरं अशाच वेळी देव विश्रांती साठी तिथे येऊन बसत असावा. क्वचित येणाऱ्या भाविकांना इतर दिवशी मंदिरात आल्यवर शांती आणि समाधान मिळत ते कदाचित यामुळेच. 



महाराष्ट्रात दरवर्षी चालणारा पालखी उत्सव हा एक मैलाचा दगड आहे. त्यातून खूप काही शिकण्या सारखं आहे. इथे लाखो भाविक चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात पण त्या प्रवासात त्यांचं विठू त्यांच्या बरोबर असतो. त्यासंपूर्ण प्रवासात माणूस माणसाशी जोडला जातो. आणि हेच वारीचं वैशिष्ट्य आहे.
पंढरपूरला पोहोचल्या नंतर कित्येक वारकरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन पुन्हा तसेच माघारी फिरतात कारण त्यांचा देव सदा सर्व काळ त्यांच्या बरोबरच असतो. पण तिथेही मंदिरात पुन्हा चित्र सारखंच दिसतं. कदाचित विठू माउली सुद्धा वारीला चालत येत असतील आणि मंदिरात दिसते ती नुसतीच दगडी मूर्ती असेल.  खऱ्या वारकऱ्याला वारी भावते ती १५ दिवसाच्या प्रवासामुळे. त्यात तो आजूबाजूच्या माणसांशी बोलत असतो, सुख आणि दुख दोन्ही वाटत असतो. आयुष्य जगतानाचे अनुभव मांडत असतो. वर्षभरातल्या चांगल्या वाईट गोष्टी विसरून केवळ मनाच्या शांती साठी तो वारीत येत असेल.
पूर्वी बांधलेल्या या श्रद्धास्थानांचा कदाचित हाच हेतू असेल. माणसाला एकमेकांपासून दूर जाण्यापासून वाचवण्यासाठी. हल्ली अशी स्थाने कमी झाली आहेत. जोडण्यापेक्षा तोडण्यासाठी या धार्मिक गोष्टींचा वापर जास्त होताना दिसतो.
भारतातल्या जवळपास प्रत्येक तीर्थ क्षेत्राला बाजारी रूप आलाय. सगळी गणिते पैशात. एकीकडे देशात इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबी आणि विषमता असताना मंदिरांमध्ये सगळीच उधपट्टी दिसते.
मंदिरे पूर्वीही होतीच. लोकही पूर्वी होते. पण देव हे श्रद्धा स्थान होतं. लोकांच्या भावनांशी खेळून गरिबापासून श्रीमंतांपर्यंत पैसा गोळा करणाऱ्या धार्मिक संस्था नव्हत्या.  हे पाहून चीड तर येतेच, पण नुसतं त्याने भागणार नाही हेही तितकंच खरं आहे. मग कसं बदलू शकेल हे ?  गोष्टी आपोआप घडत नसतात. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे कळू शकणार नाही पण जर आपण स्वतःपासून सुरुवात केली तर ? तर मात्र या धंदेवाईक लोकांना थोडी का होईना जरब नक्कीच बसेल. देवाला पुन्हा देव पण देण्यासाठी हे होणं गरजेचं आहे. नाहीतर काही दिवसांमध्ये मंदिर ही पैसा गोळा करण्याच्या कंपन्या होतील.
श्रद्धास्थाने ही माणसांना बळ देण्या साठी असतात दु:खही ,कष्टी, थकलेल्या, हरलेल्या, एकट्या जीवांना तिथे नवी दिशा मिळायला हवी. अस्थिर झालेल्या मनाला तिथे शांतता लाभायला हवी. आनंदी असलेल्या जीवाला तिथे येऊन तो आनंद वाटता यायला हवा. मुळात माणसाला माणसाशी जोडायला मंदिरांनी मदत करायला हवी. मला वाटतं वेळ आलीय. बदल घडवायची.

         आनंद
         २८ फेब्रुवारी  २०१४