Powered By Blogger

Saturday, March 29, 2014

लघुकथा : वेगळा


आजही राम ला शाळेत यायला उशीर झाला होता. आणि नेहमी प्रमाणे सुमित त्याची वाट पाहून वर्गात निघून गेला होता. राम नुकताच मागच्या महिन्यात शाळेत येऊ लागला होता. दिसायला सावळा असला तरी सरळ नाक, बोलके डोळे, निरागस चेहरा असलेला राम कुशाग्र बुद्धी मुळे राम सगळ्या मास्तरांचा आवडता झाला होता. तो मुळात या गावातच तो नवीन होता. पण एवढ्या थोड्या दिवसातच राम आणि सुमित ची चांगलीच मैत्री जमली होती. दोघे एकाच वर्गात आणि एकाच बाकावर बसत होते. आठवीचा तो वर्ग तसा फार मोठाही नव्हता जेमतेम ३० मुलं होती वर्गात. आणि गावही छोटं असल्यानं प्रत्येकालाच एकमेकांबद्दल माहिती होती.
राम हुशार होता पण फारसा बोलका नव्हता. सुमित शाळा सुरु होण्या पूर्वी मैदानावरच्या वडाखाली रामची वाट पाहत बसायचा. पण जसं आज झालं तसच बऱ्याचदा व्हायचं आणि रामला शाळेत यायला उशीर व्हायचा. धावत पळत राम वर्गात आला. मास्तरांनी चष्म्याचा वरून त्याच्याकडे नुसता कटाक्ष टाकला आणि बसायला सांगितलं. आज शनिवार त्यामुळे शाळा लवकर सुटली. सुमित आणि राम शाळे बाहेर पडले. सुमितने रामला सकाळी झालेल्या उशिरा बद्दल विचारलं. अरे काही नाही रे उठायला जरा उशीर झाला असं सांगून विषय टाळला. राम त्याच्या आई आणि आजी बरोबर राहत असे. त्याला वडील नव्हते. मैदानावर थोडावेळ खेळून दोघेही आपापल्या घरी गेले.
  


इकडे सुमित नेहमी प्रमाणे राम च्या गुणांचा पाढा आई समोर गात होता. आईलाही उत्सुकता लागून राहिली कि नक्की हा राम आहे तरी कोण कि ज्याच्याशी माझ्या सुमितची इतक्या कमी वेळात इतकी घट्ट मैत्री झाली होती. आई सुमित ला म्हणाली “अरे सुमित तुझ्या त्या रामला आपल्या घरी तरी बोलाव एकदा. बघू तरी कोण आहे हा तुझा नवीन मित्र”. हो आई मी किती वेळा म्हणतो रामला घरी चल म्हणून पण तो नेहमी काहीतरी कारण देतो बघ. पण या वेळी मी त्याला आणतोच बघ घरी. असं म्हणून सुमित रामच्या घराकडे निघाला. त्यालाही रामचं घर तसं माहित नव्हतं पण गावाच्या वेशीपाशी कुठेतरी तो राहतो असं तो म्हणाल्याचं सुमित ला माहित होतं. सुमित चालत चालत वेशीकडे निघाला.
वेशीवर पोहोचताच एक त्याला झोपडीवजा घर दिसतं. बाहेर एक म्हातारी बाई बसलेली दिसते. सुमित पुढे येऊन विचारतो राम इथेच राहतो का ?  “व्हय, तू कोण आहेस र पोरा ?  मी राम चा मित्र आहे. सुमित उत्तर देतो. “असं व्हय बस बस इथं, मी रामची आजी हाय. राम जरा पलीकडच्या गावात गेलाय येईल एवढ्यात, तू बस.” 

थोड्याच वेळात सुमितला दुरून राम येताना दिसतो. त्याला पाहून राम थोडासा अस्वस्थ होतो. रामची आईपण मागून येते. आजी आईला सुमित बद्दल सांगते. आई दोघांना बसायला सांगून आई जाते.
राम विचारतो “ तू कसा काय आलास इकडे अचानक ?”. अरे माझ्या आईने तुला बोलावलं होतं घरी म्हणून तुला बोलवायला आलो होतो. पण तू कुठे गेला होतास ? काय बोलावं न कळल्यानं राम उठून आत जातो. आजी दुरून सगळं पाहत असते. सुमित उठून आजी पाशी येतो. आज्जी तुम्ही तरी सांगा राम कुठे गेला होता ?
बाळा, राम ला वडील नाहीत. घर चालवायला घरात कर्ता माणूस नाही. त्यात आमी खालच्या जातीचे आहोत पोरा. राम आणि त्याची आई पलीकडच्या वाडीत बांधकामावर मोलमजुरी करायला जातात. राम खूप गुणी पोर आहे. लहान वयात सगळं गिळून कष्ट करतो बघ. त्याला खूप शिकून मोठं व्हायचंय बघ. म्हणून आम्ही या गावात आलो कारण इथं शाळा आहे. रात्री जकात नाक्यावरच्या दिव्याखाली अभ्यासाला जातो बघ माझा राम. वेळ मिळेल तेव्हा पडेल ते काम करतो पण एका शब्दानं कुरबुर करत नाही. माझा राम खरच सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आहे.
सुमित ला हे सगळं अनपेक्षित असत. इतके दिवस यातलं आपल्याला काहीच माहित नव्हतं याचं त्याला दुखःही होतं.  सुमित तिथून निघतो. रामच्या उशिरा येण्यामागची कारणे सुमितला कळू लागतात. रस्त्याने येताना त्याच्या डोक्यात खूप विचार येऊ लागतात.
रविवार संपतो आणि पुन्हा शाळा सुरु होते. इकडे सुमित ला रामची कहाणी कळल्याने त्याला राम बद्दल अजून आदर निर्माण होतो. आपण किती सुखात आहोत आणि राम ला किती कष्ट करावे लागतायत याचं सुमितला मनोमन वाईट वाटतं. 

तिकडे सुमितची आई त्या राम बद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल माहिती काढते. ते कोण आहेत आणि कुठे राहतात हे कळल्यावर मात्र तिला चिंता वाटू लागते. संध्याकाळी सुमित शाळेतून घरी येतो. आज आई त्याच्यासाठी आवडीचं जेवण बनवते. जेवायला बसल्यावर आई रामचा विषय काढते. ती म्ह्णते “हे बघ सुमित, अरे तो राम काही फार चांगल्या घरातला नाही आणि तो काही आपल्या बरोबरीचा पण नाही. त्यामुळे तू काही त्याच्याशी फार मैत्री करू नकोस.”

आई पण चांगलं माणूस म्हणजे काय गं ?
अरे चांगलं माणूस म्हणजे जो सर्वांची काळजी करतो, कष्ट करतो ज्याच्या आयुष्यात ध्येय असतात तो चांगला माणूस.

क्षणभर सुमित शांत बसतो आणि म्हणतो , “होय आई तू म्हणतेस ते बरोबरच आहे बघ. तसा राम वेगळाच आहे. माझ्यापेक्षा खूप वेगळा. मी इथे आपल्या घरात बसून अभ्यास करू शकतो पण त्याला मात्र रस्त्यावरच्या दिव्याखाली करावा लागतो. तो आई बरोबर मोलमजुरी करून कष्ट करतो पण मी मात्र नुसताच हुंदडतो. माझी काळजी सारं घर करतं पण त्याला घराची काळजी करावी लागते. त्याच्या आयुष्यात काहीतरी बनण्याचं ध्येय आहे. खरच तो वेगळा आहे ना आई ? भवतेक मीच त्याच्या लायकीचा नाही. एवढं बोलून सुमित उठतो.
आईच्या मनात काहूर माजत , त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तिचे डोळे न कळत पाणावतात. समोरचं दृश्य धूसर होत गेलं तरी तिच्या मनात मात्र लख्ख उजेड पडतो. 
                                                            आनंद
                                                                  ३० मार्च २०१४     
     

Friday, February 28, 2014

मनातून भाग ३



 


मनातून या सदरातून या आधी मला जे वाटतं ते मी लिहिलं. आताही पुन्हा गेल्या काहीदिवसात मनात उठलेल्या प्रश्नांना मी आज मोकळी वाट करून देत आहे. मागच्या एका जुन्या लेखामध्ये देउळ या विषयावर मी बरंच लिहिलं होतं. आता इथेही देव हीच व्यक्तिरेखा समोर असली तरीही मुख्य पात्र हे आपण सगळे आहोत. गेल्या वर्षभरात मला जास्त करून जाणवलेली ,खरंतर खुपलेली एक गोष्ट म्हणजे सणांच्या उत्सवांच्या नावांवर देवाचा मांडलेला बाजार. मग तो गणेशोत्सव , नवरात्र, महाशिवरात्र , ईद यापैकी काहीही असलं तरी त्याने काहीही फरक पडत नाही. कुठल्याशा मंदिराला वर्गणी काढून सजवलं, मोठे लाउड स्पीकर लावले त्यावर चोविसतास चालणारी चित्रपटांच्या गाण्यांच्या चालीवरची गाणी लावली की भक्तांच्या मोठ्या रांगा आपोआप लागतातच हे ही गृहीत झालं आहे. तिथल्या देवळातला देव मला हरवलेला वाटतो. मुळात तो मला दिसतच नाही. 

अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आताच मी राजस्थान ला जाऊन आलो. तिथे अजमेर ला मोठा दर्गा आहे असं ऐकलं होतं आणि पुष्कर इथे ब्रह्म देवाचं जगातलं एकमेव मंदिर आहे. दोन्ही ठिकाणी जायचं ठरवलं. आधी पुष्कर मधल्या बम्ह्देवाच्या मंदिरात आलो. भक्तांची मोठी रांग इथेही होतीच. पण मला उत्सुकता होती ती बम्ह्देवाच्या मूर्तीची. देउळ तसं साधंच असलं तरी मूर्ती मात्र सुंदर होती. मंदिरात देणगी भरपूर येत असावी कारण तिथली जमिनीवरची प्रत्येक फारशी कुणीतरी दान देलेली दिसत होती. कुणाच्या तरी नावाने अर्पण केलेल्या त्या फरश्या शेवटी भाविकांच्या पायाखालीच येत होत्या. मंदिरातून आम्ही पुष्कर तलावाकडे गेलो. तिथे एके ठिकाणी एक ब्राम्हण पुढे आला आणि आम्हाला बसायला सांगून या जागेची माहिती पुरवू लागला. तो सांगत असलेलं इतिहास तसा रंजक होता. साधारण एक १५ मिनिटे माहिती सांगितल्यानंतर तो त्याच्या मूळ मुद्य्यावर आला. जे मला अपेक्षित होतंच. या दुकानावरून फुले घेऊन आता आपण या तलावाची पूजा करुया असं तो म्हणाला. अर्थात आम्हाला ते नको. होतं. मी पुढे होऊन त्याला माहिती सांगितल्याबद्दल ५० रुपये देऊ केले. ते नाकारून तो अगदी उपहासाने आम्हाला सांगू लागलं की आमच्यात भक्ती भाव कसा कमी आहे, त्याचा आम्हाला कसा त्रास होईल वगैरे. पण त्याला कशालाही दाद न देता आम्ही तिथून निघालो. अर्थात त्याचं एक गिऱ्हाईक कमी झालं होतं. तिथून आम्ही खाली आलो, तिथे तलावाच्या पाण्यात अनेक जण डुबकी मारून सगळी पापं धुवून काढत होते. पण इथे वर मात्र  भोळ्याभाबड्या लोकांना लुबाडून मात्र काही लोक पापाचे धनी होण्यात धन्यता मानत होते. हा विरोधाभास खरोखर त्रासदायक होता. गाभाऱ्यातला देव का नाहीसा होऊ लागलाय हे कळायला मला फार वेळ लागलं नाही. 
 

जसा अनुभव या मंदिरात आला तसाच प्रकारचा अनुभव अजमेरच्या दर्गा शरीफ मधेही आला. गाडी खूप अलीकडे लावून आम्ही चालत दर्ग्याकडे निघालो. जाताना रस्त्यात गुलाबाच्या फुलांच्या चादरी, फुलांच्या माळा , डोक्याला बांधायचे रुमाल, अत्तरे  याची असंख्य दुकाने होती. पायातल्या चपला ठेवण्यासाठी काहीच न मिळाल्याने आम्हाला एका दुकानातून फुलं घ्यावी लागली. इथला देवाचा बाजार सुद्धा काही वेगळा नव्हता. इथेही सर्व धर्माच्या लोकांची खूप गर्दी होती. आत जाऊन दर्ग्याच्या मुख्य चौथार्याचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी होती. अक्षरशः धक्काबुक्की करून दरवाजा पर्यंत पोहोचून डोळ्याला काहीच दिसलं नाही. हातातली फुलं तिथल्या माणसाच्या हातात देऊन मागे वळलो. मनात एकच प्रश्न होता. आपण काय पाहिलं. कदाचित हा ही गाभारा सुनाच असेल.
सणांच्या दिवशी भरून वाहणारी मंदिरे दुसऱ्या दिवशी तितकीच सुनी असतात. इतर दिवशी सुना पडलेल्या गाभाऱ्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. मला वाटतं खरतरं अशाच वेळी देव विश्रांती साठी तिथे येऊन बसत असावा. क्वचित येणाऱ्या भाविकांना इतर दिवशी मंदिरात आल्यवर शांती आणि समाधान मिळत ते कदाचित यामुळेच. 



महाराष्ट्रात दरवर्षी चालणारा पालखी उत्सव हा एक मैलाचा दगड आहे. त्यातून खूप काही शिकण्या सारखं आहे. इथे लाखो भाविक चालत शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात पण त्या प्रवासात त्यांचं विठू त्यांच्या बरोबर असतो. त्यासंपूर्ण प्रवासात माणूस माणसाशी जोडला जातो. आणि हेच वारीचं वैशिष्ट्य आहे.
पंढरपूरला पोहोचल्या नंतर कित्येक वारकरी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन पुन्हा तसेच माघारी फिरतात कारण त्यांचा देव सदा सर्व काळ त्यांच्या बरोबरच असतो. पण तिथेही मंदिरात पुन्हा चित्र सारखंच दिसतं. कदाचित विठू माउली सुद्धा वारीला चालत येत असतील आणि मंदिरात दिसते ती नुसतीच दगडी मूर्ती असेल.  खऱ्या वारकऱ्याला वारी भावते ती १५ दिवसाच्या प्रवासामुळे. त्यात तो आजूबाजूच्या माणसांशी बोलत असतो, सुख आणि दुख दोन्ही वाटत असतो. आयुष्य जगतानाचे अनुभव मांडत असतो. वर्षभरातल्या चांगल्या वाईट गोष्टी विसरून केवळ मनाच्या शांती साठी तो वारीत येत असेल.
पूर्वी बांधलेल्या या श्रद्धास्थानांचा कदाचित हाच हेतू असेल. माणसाला एकमेकांपासून दूर जाण्यापासून वाचवण्यासाठी. हल्ली अशी स्थाने कमी झाली आहेत. जोडण्यापेक्षा तोडण्यासाठी या धार्मिक गोष्टींचा वापर जास्त होताना दिसतो.
भारतातल्या जवळपास प्रत्येक तीर्थ क्षेत्राला बाजारी रूप आलाय. सगळी गणिते पैशात. एकीकडे देशात इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबी आणि विषमता असताना मंदिरांमध्ये सगळीच उधपट्टी दिसते.
मंदिरे पूर्वीही होतीच. लोकही पूर्वी होते. पण देव हे श्रद्धा स्थान होतं. लोकांच्या भावनांशी खेळून गरिबापासून श्रीमंतांपर्यंत पैसा गोळा करणाऱ्या धार्मिक संस्था नव्हत्या.  हे पाहून चीड तर येतेच, पण नुसतं त्याने भागणार नाही हेही तितकंच खरं आहे. मग कसं बदलू शकेल हे ?  गोष्टी आपोआप घडत नसतात. मंदिरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे कळू शकणार नाही पण जर आपण स्वतःपासून सुरुवात केली तर ? तर मात्र या धंदेवाईक लोकांना थोडी का होईना जरब नक्कीच बसेल. देवाला पुन्हा देव पण देण्यासाठी हे होणं गरजेचं आहे. नाहीतर काही दिवसांमध्ये मंदिर ही पैसा गोळा करण्याच्या कंपन्या होतील.
श्रद्धास्थाने ही माणसांना बळ देण्या साठी असतात दु:खही ,कष्टी, थकलेल्या, हरलेल्या, एकट्या जीवांना तिथे नवी दिशा मिळायला हवी. अस्थिर झालेल्या मनाला तिथे शांतता लाभायला हवी. आनंदी असलेल्या जीवाला तिथे येऊन तो आनंद वाटता यायला हवा. मुळात माणसाला माणसाशी जोडायला मंदिरांनी मदत करायला हवी. मला वाटतं वेळ आलीय. बदल घडवायची.

         आनंद
         २८ फेब्रुवारी  २०१४
 



Saturday, January 25, 2014

लघुकथा निर्माल्य



आज सोमवार, आज पुन्हा सुमीतला ऑफिसला उशीर झालेला. घाईघाईत तो घराबाहेर पडला. बस थांब्यावर पळत पळत निघाला. आई ला दारातूनच “येतो गं” अशी हाक दिऊन तो निघाला. आता मिळेल त्या बसने जायचं असं तो मनात बोलत होता. खरतरं ऑफिस तसं फार दूर नव्हतं पण गर्दीमुळे खूप वेळ लागायचा. सुमित बस थांब्यावर पोहोचला. त्याची नेहमीची बस तर कधीच निघून गेली होती. त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मागे बाकड्यावर जाऊन बसला. नुकतीच बस गेल्याने गर्दी थोडीशी कमी झाली होती. आता पुढची बस केव्हा येते इकडे त्याचं लक्ष लागून राहिलं होतं. घाईने घरातून निघून आता इथे आपण निवांत बसलो आहोत याचा विचार करून त्याचं त्यालाच हसू आलं. माणसाला उगाच असं वाटत असतं की सगळं आपल्या मनासारखं व्हावं पण खरतरं ते बऱ्याचदा होत नसतं. १५ मिनिटांपूर्वी असलेली लगबग नाहीशी होऊन आता एकप्रकारची हतबलता आली होती. काहीशी सक्तीची विश्रांतीच.
बसल्या बसल्याच सुमितच लक्ष बाकाच्या टोकाला बसलेल्या एका आजींकडे गेलं. त्या एकट्याच बसल्या होत्या. सहावारी साडी, हातात छोटीशी कापडी पिशवी, डोळ्यावर बारीक काड्यांचा चष्मा हे त्यांचं रूप पाहून त्या चांगल्या सुशिक्षित घरातल्या आणि शिकलेल्या वाटत होत्या. सुमितचं त्यांच्या कडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे त्या आजी हातात असलेल्या एका वहीची पाने उलटीकडून पलटत होत्या. उत्सुकतेनं तो त्यांच्या कडे पाहू लागला. प्रत्येक पान उलटताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. सुमितला गंमत वाटली. आणि त्याच बरोबर त्याची उत्सुकता सुद्धा वाढली.त्यांचं निरीक्षण करण्यात त्याची १०-१५ मिनिटे निघून गेली आणि तोच बस आली. लगबगीने तो बस मधे चढला. चढताच त्याने मागे वळून पाहिलं पण त्या आजी अजूनही तिथेच बसून होत्या. तो उगाचच थोडासा हसला.
तो दिवस कामाच्या गडबडीत तसाच निघून गेला. रात्री घरी येऊन जेवण झाल्यावर तो पलंगावर वाचत पडला तोच त्याला सकाळच्या आजी आठवल्या. त्या उलट्या वहीत काय वाचत असतील याची त्याला कमालीची उत्सुकता लागून राहिली. खरतरं आपला तसा काहीच संबंध नाहीये पण तरीही हे काहीतरी विचित्र आणि वेगळं आहे असं त्याला सारखं वाटत होतं. उद्या आपण लवकर जाऊन पाहूया असं मनात ठरवून तो झोपी गेला. 




सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठून तो साधारण १५ मिनिटे आधीच निघाला. बस थांब्यावर येताच त्याची नजर त्या अज्जीना शोधू लागली, पण तिथे त्या नव्हत्याच. त्याचा हिरमोड झाला. कदाचित त्या फक्त कालच इथे बसल्या असाव्यात आणि नेमकं आपण त्यांना पाहिलं असं त्याला वाटलं. घडणाऱ्या सगळ्याचं गोष्टींचे अर्थ लावायचे नसतात असं विचार तो करतच होता तेवढ्यात समोरून फुटपाथ वरून आज्जी हळूहळू चालत येताना दिसल्या. त्याला उगाचच आनंद झालं. त्या येऊन बसायची तो वाट पाहू लागला. आज्जी नेहमी प्रमाणे कोपऱ्यातल्या बाकड्यावर बसल्या. जरा सुस्कारा सोडून मोठा श्वास घेतला. सुमित त्यांच्या हालचालींकडे हळूच लक्ष देऊन होता, त्यांच्या चेहऱ्यावर सुमितला एक प्रकारचा समाधान आणि आनंद दिसत होता. तेवढ्यात त्यांनी पिशवीतून पुन्हा ती कालची वही बाहेर काढली. सुमितची उत्सुकता शिगेला पोहोचली. आज्जीनी पुन्हा शेवटून वही उघडली. त्यांच्या डोळ्यातले भाव बघून त्या काय वाचत असाव्यात याचा काही अंदाज येईना. कारण मधेच त्या गालात हसत होत्या तर मधेच त्यांचे डोळे भरून आल्या सारखे वाटायचे, कधी वही सोडून शून्यात पहायच्या तर कधी स्वतःच्याच हाताच्या तळव्या कडे पहायच्या. साधारण १५ मिनिटे गेली असतील. सुमित ची नेहमीची बस आली. पण तो बस मधे न चढता तो तिथेच थांबला.
काही वेळाने आजीने वही बंद केली आणि पिशवीमध्ये ठेवून दिली. हातातल्या घड्याळाकडे पाहून त्या उठल्या आणि ज्या रस्त्याने आल्या त्याच वाटेने जाऊ लागल्या. एकतर आपण त्यांना ओळखत नाही त्यामुळे खूप इच्छा असूनही त्याला आजींना विचारायचा धीर होईना. तो हा विचार करे पर्यंत आज्जी पुढे गेल्या होत्या. पुढच्या बसने तो ऑफिस ला निघून गेला. दिवसभरात पुन्हा कामाच्या गडबडीत तो सकाळचा प्रसंग थोडाफार विसरला पण एकदोनदा त्याच्या मनात धुसर विचार येऊन गेलेच.
त्याला माणसाच्या मनाची त्याला गंमत वाटली. ते कशाच्या मागे धावेल याचा खरंच काही नेम नाही. उद्या आपण त्या आज्जीशी जाऊन बोलूया आणि आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मागुया असं ठरवून तो झोपी गेला.
दुसऱ्या दिवशीही तो पुन्हा बस थांब्यावर थोडा लवकर येऊन बसला. कालप्रमाणेच आज्जी समोरच्या रस्त्याने हळूहळू चालत आल्या. त्या जागेवर जाऊन बसताच सुमित उठला. आज्जी नुकत्याच बसल्या होत्या आणि तेवढ्यात सुमित त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला. त्यांनी सुमित कडे पाहिलं. त्या हसल्याचा भास सुमितला झाला.  आज्जी तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक प्रश्न विचारू का? सुमित म्हणाला.  आजीने स्मित करत मानेनेच होकार दिला. मी गेले ३ दिवस तुम्हाला पाहत आहे. तुम्ही याच वेळेला येता, इथेच बसता आणि एक वही काढून ती उलटी वाचता. मला याबद्दल खूप आश्चर्य वाटतं. खूप काही खासगी नसेल तर तुम्ही मला सांगू शकता का की नक्की तुम्ही काय वाचता आणि ते ही रोज ? 


आजीनी मोठ्या कौतुकाने सुमित कडे पाहिलं. हातातली वही बंद केली. एक मोठा श्वास घेतला आणि बोलू लागल्या. “तू मला गेले २ दिवस पाहतोयेस हे मला कळलंय. जसं मी काय वाचते याची तुला उत्सुकता वाटत होती तसच मलाही तुझ्या बद्दल कुतूहल वाटत होतं. शेवटी आज तू स्वतःच मला येऊन  विचारलंस याचं बर वाटलं. आज एक गोष्ट मात्र मला फार समाधान देऊन गेली ती म्हणजे माझ्या सारख्या म्हाताऱ्या बाई कडेही जगांच लक्ष जातं. बर असो. तू प्रश्न विचारलेच आहेस तर मी उत्तर देते.
मी वाचते ती माझ्या पतीची डायरी आहे. ते मागच्याच महिन्यात गेले. खूप दु:ख झालं. हे गेले आणि मग खूप मोठी पोकळी निर्माण झाली.  आमची मुले इथे नसतात ती देशाबाहेर स्थायिक झालीयेत. आम्हाला दोघांना एकमेकांशिवाय कोणीच नाही. मग वाटलं आता एकटा जगणं जमेल का? पण ते गेल्या नंतर पंधरा दिवसांनी यांच्या टेबलाच्या कप्प्यात ही डायरी दिसली.
यांनी लिहिलं होतं “ मी गेल्यावर तुझं कसं होईल याची मला नेहमी काळजी वाटायची आणि तुझ्या आधी मी जाणार हेही मला उमगलं होतं. मग म्हटलं तुला एकट वाटणार नाही असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझी उणीव तुला भासायला नको म्हणून मी तुझ्या साठी भरपूर पत्रे लिहून ठेवलीयेत. पण ही पत्रे पहिल्यापासून नाही वाचायचीस. तर उलटी वाचायचीस. आज पासून सुरु करायचं आणि अगदी आपली पहिली भेट जेव्हा झाली त्या दिवशी पर्यंत भूतकाळात हळूहळू जायचं. आयुष्यात आपण दोघांनी किती सुख अनुभवलय, किती आनंद मिळवलाय फक्त हेच तुला त्यातून पुन्हा एकदा कळेल आणि मग तुला माझी उणीव भासणार नाही. आपण आपलं आयुष्य सार्थकी लावलंय हेच तुला त्यातून पुन्हा उमजेल . कारण या उलट्या प्रवासात आपण दोघेही असू. फक्त एक करायचं , तुला कळू नये म्हणून मी ही पत्रे जिथे जिथे बसून लपून छपून लिहायचो तिथेच बसून तू ती वाचायचीस. हे का करायचं हे तुला जेव्हा तिथे जाशील तेव्हा कळेल. प्रत्येक पत्राच्या सुरुवातीला उजव्या कोपऱ्यात ते ठिकाण लिहिलंय. चल भेटूया मग तिथेच. “
 


एवढं बोलून आज्जी थोडं थांबल्या. त्यांचे डोळे भरून आले होते. पण लगेच सावरून घेत त्या बोलू लागल्या. “पाच दिवसांपूर्वी ही पत्रे त्यांनी सांगितल्या प्रमाणे उलटीकडून वाचायला सुरुवात केलीये. त्या प्रमाणे शेवटची २ पत्रे यांनी चक्क एका छोट्या मुलांच्या शाळेसमोर बसून लिहीलीयेत. मी ही ती त्या शाळेसमोर बसूनच वाचली. आमची स्वतःची नातवंडे जरी जवळ नसली तरी ही इतर मुले पाहून मला फार आनंद व्हायचा. आम्ही कित्येकदा बालवाडीच्या शाळेसमोर जाऊन लहान मुलाकडे पाहत बसायचो. आज ते गेल्यावरही मी पुन्हा तिथे गेले ते केवळ त्यांच्या पत्रामुळे.”
नंतरची २ पत्रे यांनी या इथे या बस थांब्यावरच्या बाकड्यावर बसून लिहिली आहेत. शाळेनंतर आमचा दोघांच आवडत ठिकाण होतं ते बसथांबा. खूप कंटाळा आला की आम्ही दोघे सरळ उठून कुठल्याशा बस थांब्यावर जाऊन बसत असू.  इथे आम्हाला पुन्हा जगाबरोबर पळू लागल्या सारखं वाटायचं. कुणी बस साठी धावत पळत यायचं, कुणी रमत गमत, कुणी अनिइछेने , कुणी बेफिकीर पणे , तर कुणी खूप आनंदाने पण प्रत्येक जण शेवटी एकाच बस मधे बसायच. आम्हाला दोघांना आयुष्य आणि ही बस यात फार साम्य वाटायचं. सगळ्यांना जोडणाऱ्या दुव्याप्रमाणे ही बस सगळ्यांना आपल्या पोटात घेऊन निघून जायची तेव्हा आम्हाला खूप गंमत वाटायची. कदाचित म्हणूनच यांनी ही पत्रे इथे बसून लिहिली असतील.
आता मला उत्सुकता आहे ती उद्याच्या पत्राची. उद्या मला हे कुठल्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत कुणास ठाऊक.
हे वाक्य आज्जी इतक्या विश्वासाने म्हणाल्या की क्षणभर सुमितला सुद्धा आजोबा जवळ पास आहेत की काय असं वाटून गेलं. शेवटी आजोबांच्या पत्रामुळे आज्जी साठी ते अजूनही त्यांच्या जवळच होते हे मात्र सिध्द झालं होतं.  
तोच आजी म्हणाल्या “ तुला एक सांगू सुमीत माणूस म्हातार झालं ना की त्याला काही नको असतं तेव्हा लागते ती आपुलकीनं चौकशी करणारी जीवाची माणस. खरतरं प्रत्येक माणूस आपलं प्राक्तन घेऊनच जन्माला आलेला असतो. माणसाला मुळात दुखाची भीती नसतेच ,त्याला सतत भीती वाटत असते ती एकट पडण्याची. आपला तोल गेला तर आपल्याला सावरायला कुणीतरी येईल ही जाणीव खरतर त्याला स्वतःचा तोल सांभाळायला बळ देत असते. म्हातारपणी नेमकं हेच होतं दोघांमधलं कुणीतरी एकजण आधी निघून गेलं की मग तो आधार सुटतो आणि जगाच्यापरीनेही ते एकट राहिलेलं माणूस सुद्धा ओझं होऊन जातं. अशावेळी वेळी त्या एकट्या जीवाचा मनाचा तोल ढळतो आणि ते कष्टी होतं आणि जग मात्र फक्त पाहत बसतं. माझंही कदाचित हेच झालं असतं पण यांच्या पत्रांमुळे आम्ही आजही एकत्र आहोत. शरीर कदाचित नसेलही पण त्यांचा आधार मला अजूनही जाणवतो आणि त्याच बळावर मी आज उभी आहे. मी अजूनही उद्याची तितक्याच आर्ततेने वाट पाहते आहे ते केवळ याचमुळे.
चल मी खूप बोलत बसले. मला आता गेलं पाहिजे. घरातली कामे उरकून पुन्हा दुपारचा रेडीओ वरचा गाण्याचा कार्यक्रम ऐकायचा आहे आम्हा दोघांना. उशीर करून चालणार नाही. तू आपुलकीनं चौकशी केलीस बरं वाटलं. निघते मी.
मी काही बोलायच्या आत आज्जी पुन्हा आल्या वाटेने जाऊ लागल्या होत्या. आज्जी नुसत्या बोलल्या नव्हत्या त्यांनी आनंदी जगण्याचा मार्ग दाखवला होता. आजूबाजूच्या म्हाताऱ्या लोकांकडे, माणसांकडे पाहताना मला आज्जीची वाक्य आठवत होती. “देवाला वाहिलेली फुलं जेव्हा दुसऱ्या दिवशी सुकून निर्माल्य होतात तेव्हा आपण फक्त पायी तुडवले जाऊ नये एवढीच अपेक्षा असते,  आपल्याला पुन्हा कुणीतरी हारामध्ये मध्ये माळाव असं त्यांना कधीच वाटत नसतं. “ 


गर्दीत धुसर होत गेलेल्या वाटेवर आज्जी दिसेनाश्या झाल्या. सुमित पाहत राहिला. निर्माल्यातल्या त्या एका दोन फुलांनी आपली वाट स्वतःच शोधली होती.                                                                                                                              आनंद
२५ जानेवारी २०१४