Powered By Blogger

Saturday, December 31, 2016

शब्द



शब्द नेहमी “गर्भार” असतात असं कुठेशी ऐकलेलं वाक्य .अचानक एकदम पुन्हा आठवलं आणि समोर आले ते तेच नेहमीचे ओळखीचे आणि तितकेच नवे शब्द ...! खरंच आहे पण शब्द इतक्या भावनांना जन्म देतात कधी व्यक्त तर कधी अव्यक्त..! जन्म दिलेल्या प्रत्येक वाक्याला अर्थ मिळतो आणि तिथे सुरु होतो चांगलं वाईट या रस्त्यावरचा प्रवास...!

काय गंमत असते नाही या शब्दांची , कधी एकांतात कुठेशी नजर लावून दूर पाहावं तर अचानक मनात दाटून येऊन गर्दी करतात. झरझर वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहा सारखे समोरून वाहतात. आठवणींशी असलेल्या घट्ट नात्याला निभावत कधी डोळ्याच्या कडा पाणावून टाकतात हे समजत सुद्धा नाही. एकांतातल्या अशा शब्दांना ओढ असते हातून सुटलेल्या क्षणांची .

कधी मात्र हेच शब्द खरोखर खळाळत्या पाण्यासारखे होतात. समोरचं माणूस कोण आहे कसं आहे याची फिकीर न बाळगता वाऱ्या सोबत मैत्री करून बेफाम होतात . त्यांच्या त्या कचाट्यात भलेभले अडकतात. असे हे शब्द जन्म देतात अनेक जिवंत क्षणांना आणि त्यात कधी रुजतात नवी नाती..!

कधी हेच शब्द जणू रुसल्या सारखे वागतात , मनात गर्दी करतात पण ओठातून जन्म घेत नाहीत , कधी वाट पाहत बसतात तर कधी कुणावर चिडून मुके होतात. समंजस नाती अशा न बोललेल्या शब्दांनी सुद्धा टिकून राहतात, नकळत केलेल्या मुक्या संवादाने जोडून राहतात. आपण उगाच अमुक अमुक माणसाला मनातल कळत असं म्हणत राहतो खरंतर शब्द तिथेही असतात फक्त त्यांचं अदृश्य रूप कुणालाच दिसत नाही. 

कधी शब्द बोचरे होतात , परिस्थितीला जुगारून वेगळे होतात , कधी समोरच्यावर तुटून पडतात तर कधी तीक्ष्ण बाणासारखे खुपतात. या शब्दांनी खोलवर झालेल्या जखमेला भरून यायला कधी आयुष्य पुरत नाही. नाती दुरावणारे हेच शब्द स्वतः किती एकटे असतील याची  मात्र कुणाला काळजी नसते.

रक्ताची नाती , मैत्रीची नाती , मानलेली नाती, जुळलेली नाती, बोजड नाती, हवीहवीशी नाती, ताणलेली नाती या सगळ्यात एक धागा समान असतो तो म्हणजे गर्भार शब्दांचा... कधी काय जन्मेल याचा काहीच पत्ता नसलेले सगळे जीव मात्र या शब्दांशी झुरत राहतात.  दूरचे कधी जवळ येतात तर कधी साद वेळेत न पोहोचल्याने कायमचा दुरावा निर्माण होतो.

आज वर्ष संपतंय , आणि अशाच सरत्या वर्षाचा मागोवा घेताना जाणवले ते फक्त असेच  गर्भार शब्दच ... त्यांचीच सोबत खूप महत्वाची ठरली आणि किनारा लवकर सापडला. पुढेही त्यांची सोबत अशीच राहणार असली तरी गेलेल्या शब्दांशी पुन्हा भेट नाहीच हे दुखः ही आहेच.  
आठवड्यापूर्वी पेरलेल्या बी मधून फुटलेला पहिला कोंब हा सुद्धा संवाद साधत असतोच, कोवळं असणं म्हणजे काय याची पुर्णतः प्रचिती देणारा आणि स्वतंत्रपणे मोकळ्या आकाशाकडे पाहणारा. निसर्ग आणि त्याचं हे मूक संवादाचं रुपडं म्हणजे शाश्वत गोष्टीं मधला अजून एक अनुभव...! 
शब्दवीण संवादु असं म्हटलं तरीही आत खोलवर काहूर असतच . नव्याने येणाऱ्या वळणाना आणि काही कोवळ्या लहानग्या शब्दांना पुन्हा घडवायला तयार होऊया कारण खरंतर “शब्द” फक्त संवाद साधतात आणि तेवढंच त्यांचं आयुष्य असतं..!


आनंद
३१ डिसेंबर २०१६   

Wednesday, October 12, 2016

उगाचंच सहजच 2 : हट्ट


कधीतरी उगाच हिरमुसून बसावं , रुसावं या आयुष्यावर , हट्ट करावा उगाच 
आणि दूर कुठे क्षितिजावर बुडून गेलेल्या सूर्याला म्हणावं नको येऊस पुन्हा
असं म्हणताच वाऱ्याने येऊन कानाशी कुजबूज करावी
त्या गार झुळुकेने छेडले जावे जुने ठेवणीतले सूर आणि 
अचानक डोळ्या समोर यावे धूसर पावसाळी दिवसाचे क्षण
त्यात दिसणाऱ्या समोर पडणाऱ्या थेंबानी हळूच कानोसा घेऊन 
आपल्या कडे बघावं आणि जमिनीत लुप्त होऊन जावं, 
मग दिसावी उबदार चूल आणि बाडगणाऱ्या ज्वाळा 
त्या मैफिलीत फडफडणाऱ्या पिवळ्या दिव्याने आपला जीव मुक्त करावा आणि
पसरावा काळामिट्ट अंधार आणि मग पुन्हां हिरमुसून बसावं,
हट्ट करावा ,रुसावं आणि कोसावं त्या दिव्याला परत उजळण्यासाठी, क्षणात डोळे उघडावे आणि 
बघावं समोर तांबड्या रंगाच्या क्षितिजावरून वर येणारं लाल सूर्य बिंब.....!


                                                             आनंद
                                                                                                                     
12 ऑक्टोबर 2016


Friday, September 30, 2016

जगण्यातला अर्थ





नको नभा तो तुझा पसारा
नको पर्वता तुझा नजारा
अफाट तुझिया दुनियेमध्ये,
एकही घरटे नसे पामरा....!

नको सागरा तुझा किनारा
नको दिशांचा तोच इशारा
धुंडाळूनी या जगास साऱ्या,
एकटाच तो फिरतो वारा....!

इथेच थांबून वळतो आता
इथेच थांबून जगतो आता
हरवून गेले तेच शोधतो
विसरून गेले ते आठवतो..!

हिशोब सारा इतका सोपा
अवघड उगाच करुनी बसलो,
उगा धावून काय मिळवले
चैन जीवाचा गमवुनी बसलो..!

सावलीत या सुखावतो अन,
ओंजळीत या घेतो माती...
विहीर अजून ती तशीच ओली,
कवेत घेतो काळे मोती...

कुठे झऱ्याची मंजुळ गाणी
कुठे वाहते नितळ  पाणी,
कुठे डोलते एकच पाते
जगास साऱ्या ते न्याहळते..!

प्रकाश खेळे लपंडाव अन
कधी सरी या डाव साधती,
ओथंबून हि पाने हिरवी
त्या तालावर स्वैर नाचती...

मुक्त पहाटे दिसे पाखरू,
बंधन त्याला नसे उडाया,
सांजवेळ हि येता दाटून,
घरट्यातच मग मिळते माया,

निसर्ग सांगे कसे वहावे
कसे लुटावे त्याचे देणे,
द्यावे घ्यावे आनंदाने,
अन नांदावे सोबतीने...!

साधे सोपे सरळ जगावे
नकोच खोटा तो देखावा,
श्वासाचे ते गणित नसावे,
जगण्याला या अर्थ द्यावा....!

                                                    आनंद
                                                                                                                         30 सप्टेंबर 2016




Thursday, August 25, 2016

नज्म : आशियाना

हिंदी मध्ये नज्म वगैरे लिहावी इतकं माझं हिंदी अर्थातच चांगलं नाही. पण एक वेगळा प्रयत्न म्हणून हा प्रयोग. कालच इथे मोठा भूकंप झाला, शे दोनशे माणसं बघता बघता नाहीशी झाली. डोंगरात वसलेलं गाव दिसेनासं झालं आणि नुसते दगड विटांचे ढिगारे दिसू लागले. बेघर झालेली लोकं आणि त्यांची उध्वस्त झालेली घरं म्हणजेच त्यांचे ते आशियाने . एका पक्ष्याचे नजरेतून हे पाहिलं आणि ओळी सुचत गेल्या.




खिडकीसे झाक कर डुबता सुरज देख रहा था मै , तभी एक कोने मै वो नन्हासा पंछी नजर आया.

कभी नीचे झुककर तो कभी नजर आसमा कि तरफ देखता रहा वो , जैसा कोई गेहरा साया ...

उससे आंख मिलाकर मैने कहा , अंधेरा घेर रहा है , पेड की टेहनी के उपर तेरा आशिया राह देख रहा होगा,
जा उड़ जा अपने आशियाने मै....


मुस्कुराके नजर छुपाते हुये उसने कहा, रास्ता याद नाही आ राहा है, जाने कहा जाना था, राहें भी धोका देंगी ऐसा तो नहीं सोचा था.
फिर मुडकर वो बोलता रहा, कभी आसमां से  कभी जमीन से ,
मै सुनता रहा, जानते हुए की शायद कुछ गहरा जख्म हुआ है उसे ...!
  
कल जिस पतें पर मेरा आशियॉं था ,वहा तो कुछ अलग ही नजारा है ,
ना वो राहें  दिखती है, ना वो नज़ारे दिखते है, कुछ तो पत्थर के ढेर पड़े है गाव मै,
ना जाने कौन छोड़ गया है पीछे अपना सामान.....

आधा अधुरा सा है सब कुछ, ना वो आवाज है ना वो बातों की गुफ्तगू ,
इतनी बैचैनी तो न थी मेरे आशियाने मै कभी , भले लब्ज़ कभी रूठे हो ...

सुर तो हमेशा बसते थे गलियोमै , उन्हिसे फिर शामे रंगीन हुआ करती थी ,
आज तो सिर्फ अंधेरा है, जाने वो खिड़की के कोने मै जलते हुए दियेमें “रूह” क्यों नहीं है,
बहते हुए हवा ने तो शायद बुझाया नहीं उसे,  या फिर किसीको आज वक्त का एहसास नहीं है...

लोग भी तो नहीं है आज, शायद कही गए है..
मैंने सोचा छत के ऊपर बैठकर थोडा इंतजार करू , शायद कोई गुजरेगा इस राह से ,
पर ना वो छत अभी वहां  है, ना मंजिलो को पोहोचाने वाले रास्ते ....

कुछ तो गुम हुआ है आज मेरा, नजारों का रंग है , या वादियोंकी वो  सरसराहट ,
जिससे कभी होती थी बाते बरसात की या फिर ठिठूरती  सर्दीयोकी ,

फिर कही रंग बदलते पेड़ खुश होके हम पंछियों को बुलाते थे , अपनी टहनी  पर खेलने,
फिर कुछ दिनों मै गिरा देते थे उन पत्तो को जमिन पर, और खुद खड़े रहते थे नए पत्तो के ख्वाब देखते हुए धुपमें ...!
बादल फिर कभी छॉंव  बन जाते थे उस उजड़े हुए पेड़ की ,

और फिर बरसती थी बूंदे  जो खुशबु संग लती थी मिटटी की, बाद मै पता चला इसे कहते है मौसम, हमें तो लगता था ये तो उस पेड़ की ये जिंदगी है , पर ये तो पूरी कौम की कायनात थी....!

आज वही ढूँढता रहा सेहरामे , पर कुछ ना मिला, कही दूर से एक माँ  आंसू बहाती नजर आई ,
फिर पता चला उसका नन्हा कही गम हुआ है उन पत्थरो के ढेर मै,
फिर मैंने गौर से देखा उन पत्थरो को , और मुझे नजर आई वो खिड़की की एक टूटी कांच, कही बिखरे दरवाजे तो कही पुराने तस्वीरों मै छुपा बचपन, तो कही मुरझाए फुलोकी एक टहनी  ..!
वही ढेर मै दब गए थे वो लब्ज , जो जिन्दा करते थे उस वादी को, और फिर जिंदगी चलने लगती थी सूरज के साथ हाथ मिलाकर ...

ये विराना तो न था आशियाँ मेरा , इसलिए भूल गया हूँ रास्ता अब मंजिल का जानबुजकर, शायद भुलनेपर फिरसे ख्वाब जिन्दा हो और सुबह होते ही नजर आ जाये वही पुराना आशियाना......!

तब तक बैठता हूँ यही पे, अंधेरा वैसे तो सब जहग है, रात गुजारने के लिए दिये  की जरुरत तो नहीं है अभी,
चाँद भी तो छुपा है डरकर  , और सितारों को बादल ने झॉंक  दिया है, शायद वो भी न देख सकते होंगे वो बिखरा हुआ आशियाँ आसमां से ,
आज जरुरत है ख्वाब की जो सच हो जाये दिन के उजाले मै और संवर  जाये मेरा आशियाँ फिर से बसंत की बहार में ....!


आनंद
२५ ऑगस्ट २०१६ 


Note : Grammatical correction helped by Gajanan Chavan :-) 

Wednesday, July 27, 2016

उगाचच सहजच 1 : Open Road Diaries :-

माणसं बदलतात कि भोवतालची परिस्थिती ?
मला विचाराल तर मी म्हणेन दोन्ही नाही.
मुळात बदलत काहीच नाही. एकाच ग्रहावर राहून एकीकडे रात्र अन एकीकडे दिवस असतोच कि. बदलतो तो दृष्टिकोन. आरसा मागे बघणारा असला तरी पुढे ठाकणाऱ्या धोक्यापासून आपल्याला वाचवण्यासाठीच असतो. गोष्टी आहेत तिथेच असतात, तरीही इगो आड येतोच. समस्या मोठी नसतेच मोठा असतो तो अहंकार. 

जगाने चांगलं म्हणावं म्हणून चाललेली धडपड खरतर माणूस म्हणून माणसालाच फार मागे नेते , तरीही चांगुलपणाची हाव काही जात नाही. आजूबाजूच्या कित्येक मनांमध्ये असूया नांदत असते हे डोळस माणसाला सुद्धा कळत नाही.
वाट फुटेल तिकडे धावणारं जग आजूबाजूला असताना खरंतर "साधं सरळ सोपं" हे शब्द जगण्याला लागू केले तर त्यातुन मिळणारा आनंद अनुभवणं एवढंच खरं आयुष्य असतं , बाकी सगळा इतरांसाठी मांडलेला देखावा असतो.  
साधेपणा हा मुळात विकत घ्यायचा प्रकार नाहीच तो उपजतच असावं लागतो.
                                                                आनंद
                                                                                                                            27
जुलै 2016

Monday, June 6, 2016

पाऊस इथला ,पाऊस तिथला

मायदेश सोडून दुसरी कडे जाण्याची हि काही पहिली वेळ नाहीच. तसं पाहायला गेलं तर इटली हा चौथा देश ,पण तरीही दरवेळी नव्या देशातला एक नवीन अनुभव घराची ती ओढ आणि नाळ अजून घट्ट करत असतो.

यावेळी इटली मधल्या पावसाने मायदेशातल्या पावसाच्या आठवणी जाग्या केल्या, एकाच वेळी दोन्ही कडे बरसत असूनही इथे परक्या देशात बसून खिडकीतून बघताना तोच पाऊस आपला वाटला नाही आणि आठवला तो चिंब पाऊस जो माझ्या मायदेशातल्या अंगणात , दारात, गावात शहरात ,बरसणारा. लहरी असूनही प्रत्येकाला किती लोभस आणि हवाहवासा असतो तो, तेव्हा जाणवलं कि मुळात तो आपल्या साठी जीवनाचा भाग आहे नुसतीच निसर्गाची किमया नाही.

तो नुसताच बरसत नाही तर धरणी ला गंधाळून चोहीकडे एक ताजेपणा भरून जातो. दूर डोंगरावरून धबधब्यांना जन्म देतो तर कुठे नदीत मिसळून एकरूप होऊन जातो. कुठे शिवारातल्या कोरड्या मातीच्या ढेकळांना सुखावून नवं बीजांकुर रुजवतो.
त्याला सीमा नसते मनसोक्त कुठेही बरसावं अन वाटलं तर रुसून बसावं. कधी हलक्या सरींनी गारव्याला बोलवावं तर कधी बेभान वाऱ्यावर थेंबानी आरूढ होऊन तिक्ष्ण बाणांसारख तुटून पडावं.

त्याला अर्थात शब्दात बांधणं कठीण,
शेवटी पाऊस हा पाऊसच असतो पण त्याला थोड्या वेगळ्या अंगाने पाहिलं तर त्यानेही प्रत्येक देशाची संस्कृती , तिथला पेहराव किंवा अगदी मानसिकता आत्मसात केली आहे कि काय असं वाटत राहतं.

पाऊस इथला अर्थात इटली चा आणि पाऊस तिथला अर्थात मायदेशातला...

पाऊस इथला,
वेधशाळेची वेळ पाळणारा
नियमात बसून बरसणारा,
पण तरीही,
व्हायोलिन च्या स्वरांसारखं
मनाच्या तारा छेडणारा...!

पाऊस तिथला,
भटक्या उनाड ढगांचा
वाटेल तिथे रेंगाळणारा,
गंधाळ ओल्या मातीचा,
हलक्या मधुर सुरांचा...!   ||1||

पाऊस इथला,
एकटा दुर्लक्षित,
सतत नाती शोधणारा
बरसून गेल्यावर सुद्धा
पाऊलखुणा मिटवणारा..!

पाऊस तिथला,
प्रार्थनेत, स्वप्नात
सतत डोकावणारा..
नद्या डोह शेत तलाव
साऱ्यात जीव ओतणारा..! ||2||

पाऊस इथला,
हुशार व पुढारलेला
हिशोबी आणि व्यवहारी..
वीज वादळ साऱ्याला
अंतर ठेवी दारी...!

पाऊस तिथला,
अडाणी अन निस्वार्थी
काहीच नसे स्वतःसाठी,
पाखरं, झाडं ,डोंगरांशी
बांधे रेशीमगाठी..!  ||3||

पाऊस इथला,
मुका आणि अलिप्त
एकटाच बरसणारा,
चिंब भिजवायला ,
आसुसलेला...!
 
पाऊस तिथला
चिखल माती पाण्याचा ,
कंदिलाच्या वातीचा,
चुली पुढल्या रात्रीच्या ,
सुखावणारया घासाचा..!


आनंद
5 जून 2016


Tuesday, May 31, 2016

माणसांतले “सूर” : भाग १

माणसांतले “सूर”  : भाग १

मुळात माणसांवर लिहावं असं खरतरं काही विशेष असं कारण नाही पण एक वेगळा प्रयत्न आणि त्यात आजूबाजूच्या म्हणा किंवा कुणा दुसर्याकडून कानावर आलेल्या अशा खऱ्या आणि तितक्याच काल्पनिक वाटाव्या अशा व्यक्ती रेखा किंवा मुळात त्या माणसांच्या प्रकृती या इतक्या लक्षवेधी आहेत कि थोडं विचार केला कि आपल्यालाच त्या खूप जवळच्या वाटू लागतात. अर्थात कुणालाही दुखावण्याचा हेतू नाहीच पण माणसातल्या विविधतेवर नजर टाकली तर किती गम्मत येते हा बघण्याचा हा खटाटोप. हे करताना मला जाणवलं कि खरतर आयुष्य सुरांचं बनलेलं आहे प्रत्येक जण आपला सूर जमेल तसा लावत असतो त्या मुळे प्रत्येक माणसाचा एक स्वतः चा असा सूर असतो आणि मग त्यात हवा तसा बदल करत तो जीवन गाणं गात असतो. प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्शणार्या या माणसांचे “सूर शोधण्याचा एक प्रयत्न इथे केलाय.


“नकार-तक्रार” सूर” आळवणारया व्यक्ती : अर्थात नावावरून जो अर्थ प्रतीत होतोय तशाच प्रकारची हि माणसे असली तरी या सगळ्याचं मूळ शोधणं गरजेचं आहेच. सर्वसाधारण पणे हि माणसे कधीच “हो” म्हणत नाहीत पण “तक्रार” ,“नकार” किंवा “नाही” चा सूर मात्र लावतात. अर्थात हो म्हणायला आधी ऐकावे लागते हि बाब वेगळी. पण मुळात नकार कशाला द्यावा हे हि कळू नये इतकी यांची मजल असते. उदाहरणे द्यायची झालीच तर खूप आहेत , जसे चहा गरम असेल तर “छे.. फार गरम आहे, मध्यम आहे तर साखर कमी आहे , साखर आहे तर कप तुटका आहे, कप छान नवीन आहे तर दुध चांगले नाही  आणि सगळे छान आहे तरी हवा खराब आहे आणि त्या मुळे चहा कसा चांगला लागत नाही हे सुद्धा हि माणसे सिध्द करू शकतात. यांच्याकडे कार असेल तर काही विचारूच नका, ,तुम्हाला यांच्या गाडीत बसायचा योग आलाच तर तुमच्या संवादात पुढची वाक्ये आलीच पाहिजेत, तुम्हाला काहीही करायची गरज नाही , “रस्ता कसा खराब आहे, रस्ता चांगला असेल तर लोक कसे नियम भंग करतात (हे बोलताना स्वतःची कार सिग्नल तोडून पुढे नेतील आणि उलट अशा पठ्ठ्यांना असेच केले पाहिजे हे हि सांगतील), कार कसा आवाज करते, हल्ली कार वाले किंवा गाडी दुरुस्त करणारे कसे फसवतात, सिग्नल बनवणारे लोक कसे मूर्ख आहेत, सगळे लोक एकाच वेळी कशाला घराबाहेर पडतात. अर्थात हे महाशय पण त्याच वेळेला गर्दीत असतात. अशा वेळी मला आपण स्वतः सुद्धा या गर्दीचा भाग आहोत हि गोष्ट हे लोक जाणूनबुजून विसरतात. पाउस पडला तरी यांना त्रास होतो आणि पडला नाही तर ग्लोबल वार्मिंग मुळे कसा दुष्काळ पडला आहे यावर एखादा मोठा लेख A.C च्या गार वाऱ्यात बसून लिहितील. अर्थात तो लेख  पेपर मध्ये छापून आला नाहीच तर आजकालचे पेपरवाले कसे पैसे खातात हे रद्दीचे पेपर विकता विकता  आपल्याला समजावतील.

  परवा असाच एक जण देव कसा निर्दयी आहे आणि मला जास्त वजन कसे दिले म्हणून दैवाला कोसताना पहिला अर्थात समोर ताटात असलेल्या पंजाबी भाजीला आणि रोटीला ऐकता येत नसल्यामुळे ती दोघं बिचारी काहीच करू शकत नव्हती आणि सकाळीच खाल्लेला बर्गर पोटातून मला का खाल्ले असं निषेध व्यक्त करू शकत नव्हताच. अर्थात इथे माझा कुणाचे “खाणे”  काढण्याचा हेतू मुळीच नाही. शेवटी मुद्दा आहे तो तक्रारीचा. प्रत्येक गोष्टीत काहीतरी कमी दिसणे हा गुण (खरतर अवगुण) असलेल्या या व्यक्तिरेखा त्यांच्या याच गोष्टी मुळे प्रकाश झोतात असतात. पण ते क्षणिक चमकण खरतर काही कामाचं नसतं.  
पण समजा कर्मधर्म संयोगाने तुम्हाला भेटलाच असा माणूस तर आपण काय करायचे हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण याचं उत्तर फार सोपे आहे कारण यांच्या नकार घंटे पुढे आपण फक्त “अच्छा .., हो, काय करणार, अरे वाह हो का ? , कसे काय ? ह्म्म्म्म , शशश., एवढाच करू शकतो अर्थात 
आपल्याला तेवढाच वेळ मिळतो. त्यात जर तुम्ही थोडाफार स्वतःच कल त्यांचा म्हणण्याकडे आहे असं दाखवलंत तर मग विचारूच नका कारण तुमची लवकर सुटका नाही. कधी कधी मला वाटतं अशा लोकांना स्वर्गात पाठवलं तरी हे असं म्हणायला कमी करणार नाहीत कि स्वर्ग फारच उंचीवर आहे बुवा, निदान जरा जमीन जवळ असती तर फेरफटका मारून येता आल असत. (अर्थात असे लोक नक्की कुठल्या स्वर्गात जातात हि बाब अलाहिदा J). 

या सगळ्यात गमतीचा भाग बाजूला ठेवला तर थोड्याफार फरकाने आपण सगळेच या तक्रार वर्गातले असतो. अर्थात प्रत्येकात त्याचे प्रमाण कमी जास्त असते. सुखवस्तू घरात राहून सुद्धा हल्ली प्रत्येकामध्ये तक्रारीचा सूर नक्की येतो कुठून हे शोधायचा प्रयत्न केला तर असं दिसतं कि खरतर तो आपल्याच नव्या जीवन शैलीतून आला आहे. त्या सुराचा अर्थ न जाणता एकाने तो आळवला कि इतर आपोआप त्याच्यात आपला सूर लावतात. अजून एखाद्या घोळक्याला तो सूर ऐकू गेला कि त्याचं गाणं होतं आणि नंतर तोच आपला सोबती असल्या सारखं प्रत्येकजण “तक्रार” मय होऊन जातं. कधीकधी तर इतकं कि एखाद्याला खरंच वाटेल कि हा माणूस फार हलाखीचे दिवस काढतो आहे. तक्रार, निषेध किंवा प्रतिक्रिया देणं हा निसर्गाचा नियम आहे पण त्याची जीवनशैली होता कामा नये. शरीराला चटका बसला तर ते आपसूकपणे प्रतिक्षिप्त क्रिया करून मोकळं होतं. पण त्याच गोष्टीचा निषेध करत बसत नाही. 
एकदा असेच एका ओळखीच्या नातेवाईकांकडे गेलो असता त्यांनी टीव्ही वर लागणाऱ्या त्याच त्याच कार्यक्रमांना आणि नंतर चनेल वाल्यांना नावे ठेवायला सुरुवात केली. दिवसाचे कित्येक तास ते कार्यक्रम बघणाऱ्या लोकांना सारखे नवीन प्रोग्राम कुठून मिळणार. करमणूक म्हणून एखादा तास बघितला जाणारा टीव्ही दिवसभर चालू राहिला तर अर्थात तो कंटाळवाणा होणारच. सुख वाढलं कि तक्रारीचा सूर वाढतो , आराम आला कि विचार सुचतात. सुखसोयी जितक्या जास्त तितक्याच जास्त अपेक्षा वाढत जातात. सतत काहीतरी कमी आहे असं वाटत राहिल कि माणूस तक्रारीचा सूर काढतोच. शहर जितकी जोमाने वाढत आहेत तितकीच ती अतृप्तता वाढताना दिसते आहे.
वयाने बरीच मोठी असलेली मुलेहि हट्टी दिसतात, त्याला हि गोष्ट लागतेच, त्याला नाही ऐकून घ्यायची सवय नाही अशी वाक्ये ऐकून धडकी भरायला होतं. घरातल्या बायकांना पुरुषांना जर या तक्रारीच्या रोगाने ग्रासलं असेल तर संपूर्ण घरंच सतत काहीतरी मागत राहता. घर, ऑफिस, समाज सगळीकडे सतत “ आपल्याकडे काय नाही” इथेच लक्ष केंद्रित राहतं. “Ambition” च्या नावाखाली संपूर्ण आयुष्याला तक्रारीचा सूर लावण्याआधी जगायला काय लागतं आणि काय आहे हे जर प्रत्येकाने जाणलं तर अतृप्तता नक्कीच कमी होईल. नव्याची आस असणं चूक नाहीच फक्त “त्याचीच” आस असणं हे घातक आहे. कुठल्याही महागड्या खेळण्यांशिवाय गेलेल्या जुन्या बालपणाला आठवलं कि मातीची किंमत कळते आणि धावायचा वेग आपोआप कमी होतो. शेवटी म्हणणं एवढंच आहे कि हा सूर न आळवलेलाच बरा कारण “न” चा पाढा गाणं तितकं बर नसतंच त्या पेक्षा संवेदना जाग्या ठेवून जगणं सोपं आहे.
अशाच अजून एखाद्या सुराला भेटू पुढच्या भागात...!

   आनंद

   ३१ मे २०१६ 

Saturday, April 30, 2016

कोकणातलं घर

कोकणातलं कौलारू घर. पावसात चिंब भिजलेल. अर्थात आजूबाजूने माडाच्या झाडांनी वेढलेलं. पावसाच्या थेंबाना त्या हिरव्या गालिच्यावर झेप घेऊन मग हळुवार घसरत जमिनीवर पडाव लागत होतं. समोर अर्ध गोल अंगण मध्ये तुळस आणि कोपऱ्याला एका झाडाच्या बुंध्या पासून सुरु झालेलं कुंपण . अंगणाला झाडाच्या काटक्यांचा खरतर उगाचच केलेलं वाटावं असा ते कुंपण तरीही सुबक आणि नेटकं त्याच्या बाजूला मात्र दगडी भिंत एकसारख्या दिसणाऱ्या तपकिरी रंगाची.
कोपऱ्यात फुलझाडाची वसाहत आणि त्याला आलेली गुलाब ,झेंडू ची फुले .
पारिजात मात्र वेगळा उभा , त्याच्या फुलांचा सडाही खालीच पडेल याचीही त्याने काळजी घेतली असावी असे वाटेल इतका असा त्याचा आटोपशीर पसारा. मागं एका छताखाली नारळ रचून ठेवलेले. त्याच्या पलीकडे पाण्याचा बंब.
लाल मातीच्या रंगाने उठून दिसणाऱ्या ओल्या पायवाटा आणि त्यातून वाहणारे पाण्याचे ओघळ.  परसाला एक जुना आड. हाताने ओढता येईल अशा मोटेचा. त्याच्या ओल्या काळ्या दगडाचा रंगही डोळ्यात भरेल असा दाट. काजू बदामाच्या झाडांची रेलचेल आणि आपापसात चाललेली कुजबूज.

कित्येक पावसाळे पाहिलेल्या त्या घराला हा पावसाळही नवीन नव्हताच.  पाऊस काय हे माणसाने कोकणात अनुभवाव. कौलांवरून टिपटिप पडणारे थेंब इतके तालात पडत होते कि त्याचंच गाणं व्हावं. ओसरीवर झोपाळा आणि त्याच्या जाड साखळ्या जणू  काही वाड्याच वय सांगणाऱ्या. तिथेच एक जुनी खुर्ची अर्थात डुलणारी.
हवेत गारवा आणि मधेच येणारी वाऱ्याची झुळुक. समुद्रही तसा फार लांब नसल्याने त्याच्या लाटांचाही दूरवरून  येणारा आवाज.
घराच्या आत मात्र तशी उब, कोपर्यातल्या चुलीच्या धुराने धूसर झालेली आतली दारे आणि जिने. कोपऱ्यात पिवळा 40 वॅट चा दिवा. त्याचा प्रकाशही उबदार .सारवलेली जमीन. सुरकुत्या पडलेली म्हातारी दारे,  त्याच्या वर चाहूल देणाऱ्या कड्या आणि तरीही त्यांना धरून राहिलेल्या जुन्या चौकटी.
वय वाढलं तरी आधार देणाऱ्या.
घराचे उंबरे सुद्धा नुसते फक्त म्हणायला झिजलेले अनेक जण अडखळले, अनेकांनी ओलांडलं, सणासुदीचं सजवलं, कुणीतरी  कित्येकदा तिथेच वाट पाहत उभं राहिलं, पण तरीही झीज काळाचीच झाली उंबरे अजूनही तेवढेच भक्कम.
गावाच्या एकबाजूला समुद्र तर दुसऱ्या बाजूला नदी. पाण्याचा असा दुहेरी योगायोग. नदी वळसा घेऊन समुद्राला मिळणारी.
कित्येक पिढ्या पाहिलेल्या या घराला पिढीजात मिळालेला वारसा आणि घरही घरातलं एक सदस्य आहे अशा तऱ्हेने त्याच्या विषयी बोलणारी माणसे.

जेव्हा सकाळ पासून बरसणाऱ्या धारा थांबल्या तेव्हा हलकेच पानावरुन ओघळणारे थेंब आनंदाने उड्या मारून खालच्या डबक्यात पडू लागले. नदी लाल मातीच्या पाण्याने वाहू लागली होती. वातावरण तरल शुद्ध आणि ताजं झालं होतं. घर पुन्हा गलबलून गेलं ,जागं झालं, चुलीवर चहा टाकला गेला ,ओसरी वर घरातली मोठी माणसं बसली.
कुणी छत्री घेऊन गावात निघालं कुणी उगाच पारावर गप्पा मारायला तर कुणी समुद्राला आलेलं उधाण पाहायला.
घर तिथंच होतं, सारं पाहत होतं, तृप्त होत होतं. जमीन आकाश पाऊस ऊन माड, या त्याच्या साथीदारांबरोबर वेळ घालवण्यात मग्न. छतातून निघणारा धूर बाहेर आकाशात लुप्त होत होता.
पाऊस पुन्हा नुकताच सुरु झाला होता.पहिल्याच पावसाने घर मात्र आनंदलं होतं...!

कोकणातल्या घरांना ओढ असते ती फक्त माणसांची, नव्या जुन्या सगळ्याला आपलं करणारी हि घरं माझ्या साठी नेहमीच खूप जिव्हाळ्याचा विषय राहिली आहेत, कधी भाताच्या शेता शेजारी तर कधी डोंगर पायथ्याशी तर कधी समुद्राच्या कुशीत वसलेली कोकणी घरं मनाच्या आत घर करतात.साधं सरळ पण आखीव रेखीव कसं जगावं हे दाखवतानाच त्यातल्या खऱ्या आनंदाची ओळख ती पटवतात. बदलणाऱ्या काळात ती मात्र तशीच आहेत आपली ओळख टिकवत आणि जोडलेली नाती जपत...!

आनंद
30 एप्रिल 2016

(ब्लॉग वरील छाया चित्रे माझी नसून ती ज्यांची आहेत त्यांना आभार )

Monday, February 29, 2016

प्रबळ इच्छा

शुक्रवार ची संध्याकाळ, ऑफिस मध्ये मीटिंग  संपली. लॅपटॉप बंद झाला आणि दिवस संपला. पुढच्या आठवड्याच काम आताच डोळ्यासमोर दिसत होतं. पण तेवढ्यात आठवलं कि उद्या शनिवार आहे आणि मन क्षणांत आनंदल कारण शनिवारी प्रबळगडला भटकंती ठरली होती. क्षणांत उत्साह आला आणि जीवाने घराकडे धाव घेतली.
अर्थात Beyond mountains सोबत volunteer म्हणून जाणे हीच पर्वणी होती.
शुक्रवारी रात्री झोपायला तसा उशिराच झाला पण तरीही पहाटे उठून आवरून वेळेत FC रोड ला पोहीचलो ,बाकीचेे मावळे आणि हिरकण्या पण वेळेत हजर झाल्या आणि सुरु झाला तो उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने प्रबळगडाचा प्रवास.
नेहमी प्रमाणेच काही ओळखीचे काही अनोळखी चेहर होते. थोड्याच वेळात सगळ्यांच्या पोटातल्या भुकेला सँडविचचा आधार मिळाला.
मराठी दिनाच औचित्य साधून गायलेली काही भन्नाट गाणी, आणि मधेच "ट" अक्षर आल्यावर "तुम्हावर केली मर्जी बहाल" गाण्याचं "टूम्हांवर" असा अपभ्रंश करून पोट धरून हसून मजल दरमजल करत ठाकूरवाडी आलं.
उतरल्यावरच जाणवलं कि हवेतल्या आर्द्रते मुळे हा ट्रेक तसा जीव जेरीस आणणारा असणार आहे. सुरुवात केली आणि मजल दरमलजल करत दुपार पर्यंत 20 जणांच्या चमू ने प्रबळगड सर केला,  वर पोहीचल्यावर पोटोबा उरकून घेतला, आणि कलावंतीण पॉईंट ,गणपती मंदिर पाहून सगळे उतरणीला लागले. अर्थात उतरतानाही तिथल्या आर्द्रते मध्ये सगळ्यांनाच फार तहान लागत होती आणि पाण्याची खरी किंमत सगळ्यांना कळत होती. कधी एकदा प्रबळ माची वर पोहोचून पाणी पितो असे सगळ्यांना झाले होते.



प्रबळमाचीवर गाव आहे आणि इतक्या उंचीवर मुळात तिथले लोक कसे राहतात याचं अप्रूप वाटल्याशिवाय राहत नाही. शेणाने लिंपलेल्या भिंती , कौलारू घरं , त्या समोर सारवलेलं अंगण आणि लाकडी काठ्यांचं कुंपण , सगळीच घरे साधारण अशीच दिसत होती. आजूबाजूला पाहिलं तर अर्थात डोंगर आणि क्षितिज या पलीकडे काहीच दिसत नाही. प्रमाणबद्ध आयुष्य जगणाऱ्या इथल्या माणसांबद्दल मनोमन कौतुक वाटत राहतं. चौकट हा शब्द मुळात इथे अस्तित्वातच नसावा इतकं हे सगळं मोकळं भासतं. प्रगतीच स्वप्न सुद्धा इथे फार दूर वाटत होतं पण निसर्गाच्या जवळ नाही तर त्याचा भाग होऊन जगणारी माणसं बघून भारावून जायला होत.अर्थात हे जगणं प्रचंड कष्टाचं होतंच पण तरीही त्यात एक समाधान दिसत होतं.
गड उतरताना शरीरातल्या कमी झालेल्या पाण्याने आलेला थकवा गावात येऊन पिलेल्या थंडगार सरबताने नाहीसा झाला.
पुढच्या वेळी येईन तेव्हा इथे मुक्काम नक्कीच मुक्काम करेन असं ठरवूनच इथून निघालो. सायंकाळ चा सूर्यास्त पाहत पुन्हा सगळे जण पायथ्याशी परतलो.भटक्या जीवाची शिदोरी अजून एका अनुभवाने वाढली होती.



या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती खरतर ती प्रत्येक भटकंती ला लागू होते,  इथे या ट्रेक मध्ये नुसता गड सर झाला नव्हता तर आयुष्याने एक नवा पडदा उघडून आत डोकावून पाहिलं होतं. ट्रेक ला आलेल्या पैकी कुणी अशा अनुभवाला पहिल्यांदा सामोरं जात होतं तर कुणी अनेकदा सामोरं जाऊनही पुन्हा पुन्हा फिरून इथे येत होतं पण सगळ्यांना जोडणारा धागा मात्र एक होता,
आत खोलवर असलेली किंवा रुजलेली एक दुर्दम्य इच्छा, काहीतरी नवं गवसेल, काहीतरी पुन्हा आठवेल , एखाद्या दुर्मिळ गोष्टीला साकडं घालता येईल , सतत धावणाऱ्या आयुष्याला एक चिरकाल थांबलेला क्षण सापडेल, मनाला असलेली जुनी जखम वा सल तेवढ्यापुरते का होईना विरून जातील आणि त्या विशाल काळ्या कातळाला पाहताना सगळ्याच गोष्टी खूप छोट्या होऊन जातील.
अर्थात प्रत्येकाला यातलं काहीतरी नक्कीच गवसलं होतं आणि या भटकंती साठी तेवढं पुरेसं होतं.
Beyond चा आणखी एक ट्रेक पार पडला होता आणि सगळ्यांना असंख्य आठवणी देऊन गेला होता..!




29 फेब्रुवारी 2016
आनंद

Sunday, January 31, 2016

पुन:श्च वासोटा





मागच्या वर्षी प्रमाणेच या ही वर्षीचा हा पहिला ट्रेक. वासोटा मुळात त्याच्या नैसर्गिक सौंदर्य मुळे कुणालाही भावेल असा किल्ला आहे आणि त्यामुळेच माझा सगळ्यात आवडता.
30 खूप उत्साही ट्रेकर्स , वय हा एक फक्त आकडा आहे हे सार्थ ठरवणारे सर्वात मोठे काका आणि एक लहानगा चिमुरडा, निसर्ग आणि त्याचं देणं याचा नेमका अर्थ जाणणारे भटके, फोटो मध्ये हे सगळं टिपणारे डोळस फोटोग्राफर, पहिला अनुभव असून केवळ "all it takes is courage" या उक्ती ला खरोखर सार्थ ठरवून मर्यादा शब्दाचीच मर्यादा रुंदावणारे अफाट जीव , या आणि अशा अनेक भन्नाट कारणांमुळेच एकाच दिवशी “नागेश्वर” आणि “वासोटा” अशा दोन्ही ठिकाणांची चढाई यशस्वी रित्या करता आली आणि "Beyond Mountains" च्या या ट्रेक नेही आपलं वेगळेपण यावेळीही जपलं.
रात्रीच पुण्यातून निघून साधारण पहाटे ३ वाजता सगळे बामणोली ला पोहोचलो ,गावातल्या मंदिरात सगळ्यांनी आपल्या स्लीपिंग बैग्स अंथरल्या आणि थंडीत सगळे झोपी गेले.

पहाटे सुरुवात झाली 6 च्या wake up कॉल ने. समोर धुक्यात हरवलेला शिवसागर जलाशय, थंडीत जागं झालेलं गाव, पाण्याचे पेटलेले बंब, नाश्ता करून बोटीची आतुरतेने वाट पाहणारे सगळे लोक, दूरवर दाट झाडीची चादर ओढून बसलेले कोवळ्या उन्हातले डोंगर, पाण्यात डुबकी मारून एखादा मासा पकडणारा पक्षी, एखाद्या चित्रात शोभेल असा आजूबाजूचा परिसर दिसत होता. अर्थात फॉरेस्ट ची परवानगी आणि सोपस्कार उरकून  साधारण 8.35 च्या दरम्यान सगळे बोटीत चढले अन सुरु झाला तो केवळ स्वतःने अनुभवावा आणि ज्याचा त्याने अर्थ लावावा असा एक तरल प्रवास. दूरवर पसरलेल्या हिरव्या रंगांच्या अनेक छटा पाहत असतानाच जणू जगाशी असलेला धागा तोडून एका वेगळ्याच जगात मन नकळत आलं होतं. तासा दिड तासाने आम्ही मेट इंदवली च्या जवळ पोहोचलो, अर्थात यावेळी पाणी कमी असल्यामुळे बोटीने आम्हाला तसं बरंच लांब सोडलं. दूर खुणावणारा वासोटा जुन्या आठवणी ताज्या करत होताच पण त्याचं ते रुपडं अर्थात नेहमी प्रमाणेच केवळ डोळ्याचं पारणं फेडणारे होतं.



मेट इंदवली मधल्या फॉरेस्टच्या ऑफिस जवळ एकत्र जमून सुरु झाला तो आमचा नागेश्वर चा प्रवास. वासोट्याच्या दिशेने थोड चालून आम्ही ओढ्याच्या वाटेला वळलो आणि हे काहीतरी फार भन्नाट असणार आहे याची सगळ्यांची खात्री पटली.

दोन्ही बाजूला घनदाट शब्द अपुरा पडेल इतकं अंगावर येणारं जंगल, ओढ्यात लागणारे पाण्याचे नितळ साठे , सूर्याची लपाछपी खेळणारी किरणे ,मधेच गायब होऊन अचानक कुठल्या फांदीतून डोकावणार आकाश , ओढ्यातले असंख्य दगड त्याच्यावर पाय ठेवून पुढे जाण्याचा आमचा चाललेला खेळ, पावसाच्या पाण्याने उन्मळून पडलेली जुनी झाडे आणि त्यांच्या अवाढव्य फांद्या नि खोडे आणि पक्ष्यांच्या न थांबणारा चिवचिवाट हे सगळं अफाट होतंच पण तितकंच हवाहवासा होतं. नागेश्वर कधी येतं यापेक्षा हे कधी संपु नये अशी वेडी आशा मनाने धरली होती, 


अर्थात असं होणार नव्हतंच आणि आम्ही साधारण 2.30 तासात सगळे नागेश्वर ला पोहोचलो. वरून दिसणारं दृश्य इथपर्यंत येण्याच्या सर्व कसरतीला विसर पाडणारं तर होतंच पण त्याही पेक्षा तिथून दिसणाऱ्या वासोट्याच्या दर्शनाने मनाला त्याच्या दिशेला खेचून घेत होतं. शंकराच्या पिंडीच्या दर्शन घेऊन फार वेळ तिथे न रेंगाळता आम्ही कूच केलं ते वासोट्याकडे.

कड्याच्या काठावरून गेलेल्या पायवाटेने एकामागे एक ओळीने अत्यंत सावधपणे चालत एक एक टेकडी पार होत होती. 
मधेच गवा ,अस्वल यांची विष्ठा त्यांच्या जवळ पास असल्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होती. अर्थात दुपारच्या टळटळीत उन्हात त्यांचं दर्शन दुरापास्तच होतं. बराच वेळ उन्हात चालून आम्ही पुन्हा एकदा दाट जंगलात शिरलो आणि अंगावर काटा आणणारी गार वाऱ्याची झुळूक आली. कदाचित वासोट्याला स्पर्शून आलेल्या त्या हवेने आमचं असं स्वागत केलं होतं. वासोटा तसा अजून बराच लांब होत.




जंगल शांत होतं आम्ही एकमेकांना दिलेल्या आरोळ्या शिवाय आता फारसे आवाज नव्हते. सगळ्यांच्याच पोटात भुकेचा डोंब उसळलेला असल्याने जिथे वासोटा आणि नागेश्वर चे मार्ग एकत्र येतात त्या फाट्यावर जेवायचा निर्णय झाला आणि सर्वांनी विसावा घेऊन जेवणावर ताव मारला. घनदाट जंगलाच्या मधोमध गारव्याला ,जसे लोक येतील तसे जेवायला घेतलं. आणि ताव मारून पोट भरेपर्यंत जेवलो. त्यात लिंबू सरबत, कोकम हे जोडीला होतेच. पोट भरून आत्मा शांत झाला आणि आता लक्ष्य होते वासोट्याचे. साधारण २० - २५ मिनिटाची चढण चढून वासोट्याला सगळे पोहोचले आणि वरून दिसणाऱ्या दृश्याने डोळ्याचं पारणं फेडलं. दूरवर दिसणारा शिवसागर जलाशय, हिरव्या रंगांच्या असंख्य छटा, बाबुकडा आणि तिथून दिसणारा जुना वासोटा, मागे नागेश्वर च्या गुहा हे सगळं भारावणार होतं.

निसर्ग आणि त्याची हि रूपं ,अनेक ठिकाणी दिसतात, पण इथे दिसतं ते त्याचं नितळ रूप, कुठल्याही पडद्याशिवाय. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीशी एकरूप झालेला निसर्ग खूप काही सांगून जातो. जंगलातल्या पायवाटेवर पडलेल्या वाळलेल्या पानांवर दव पडून आलेली ओल आणि त्यामुळे त्यांच्यावर पाय पडून होणाऱ्या आवाजाला आलेली मर्यादा हि केवळ निसर्गाने तिथल्या शांततेला अबाधित राखण्याची केलेली सोय आहे असं वाटत राहता. चालता चालता अचानक वळणारी पायवाट आणि तिलाच लागून असलेली एखादी गायब होणारी पायवाट या जंगलातल्या गूढतेची प्रतिक आहेत. 
म्हणूनच जंगल मला एक जिवंत पोट्रेट वाटतं खूप हळुवार पणे त्यातले रंग बदलतात, आकार बदलतात, जुन्या झाडांची जागा नवी खोडं घेतात , विळखा घालणारे वेळ कधी नाहीसे होतात तर कधी उंच चढत जातात आणि मुळात हे सगळं इतकं आपसूक होत असतं कि एखादी जादू वाटावी. खूप विचार केला कि कळत कि याला सगळ्याला कारणीभूत एकाच गोष्ट असते आणि ती म्हणजे “सहजता”. निसर्गात तेवढी एकाच गोष्ट शाश्वत आहे , बदल स्वीकारत निसर्ग पुढे जात राहतो आणि ते हि मागे राहिलेल्या भूतकाळाला न कवटाळता आणि म्हणूनच तो सहजता जोपासू शकतो. होणारा बदल चांगला वाईट असं नसून तो स्वीकारत पुढे जाण्यात निसर्ग जास्त वाकबगार असतो.

सूर्य मावळत असताना आणि जंगलात अंधार हळूहळू डोकावतानाच आम्ही सगळे खाली पोहोचलो आणि बोटीचा प्रवास सुरु झाला. मागे वासोटा सूर्याला झाकून स्वतः हि अंधारात लुप्त होऊ लागला होता. माणसांच्या भौतिक जगातला दिवस संपला होता, जंगल मात्र जागं होत होतं. दरवेळी वासोटा सोडताना वाटतं तसेच विचार मनात गर्दी करत होते. सायंकाळच्या वेळेला मनाला येणारी अस्वस्थता टाळता येण्याजोगी नव्हतीच. सकाळी जगाशी तोडलेला धागा आता पुन्हा जोडला जाणार होता, काळ्या मिट्ट अंधारात बोट किनाऱ्याला आली. पाउल जमिनीवर पडलं आणि धागा पुन्हा जुळला. मन मात्र भरलेलं होतं ते वासोट्याच्या अजून एका भेटीच्या आठवणीने आणि तो अनुभव मागच्या अनुभवांसारखाच चिरकाल टिकणारा होता यात शकाच नव्हती.

   





आनंद
१८ जानेवारी २०१६