Tuesday, June 23, 2015
Sunday, May 31, 2015
शब्दविन संवादू
नुकताच परक्या
देशातून परत भारतात आल्या मुळे एका नव्या संस्कृतीची ओळख थोडीफार का होइना झाली
होती. या वेळी परका देश चीन असल्यामुळे भाषा हा मोठा अडसर ठरणार
होता. जाण्या आधी हीच धास्ती होती. संवादामुळे विचाराचि देवाण घेवाण होते पण इथे तोच दुवा कमकुवत होता. तिथे पोहोचल्या नंतर सुद्धा हा समज अजुन दृढ़ झाला. कारण इंग्लिश येणारे 1-2 जण सोडले तर बाकि सगळा
दुष्काळच होता. हळुहळू दिवस जाऊ लागले आणि शब्दाविना संवादू असा काहीसा
प्रकार जमू लागला.
मग ते ऑफिस मधले सहकारी असोत किंवा सुपर मार्केट मधला स्टाफ किंवा रस्त्यावरच्या फ़ास्ट फ़ूड च्या गाड़ी वरचं चायनिज जोडपे किंवा मी रहायचो तिथल्या होटल मधले कर्मचारी किंवा आइसक्रीम च्या दुकानातला पोरगा किंवा फ़ॉरेस्ट मधे चित्रकला काढणारया मुली किंवा yello mountain ला ट्रेकिंग ला आलेली फॅमिली किंवा ऑफिस मधल्या सहकारी मित्राचा मित्रांचा ग्रुप असो किंवा टैक्सी ड्राईवर असो कुठेही शब्द अडसर ठरत नव्हते.
ऑफिस मधल्या सहकार्यां बरोबर तर एक प्रकारचा बॉन्डिंग तयार झाला आणि पुढे तर ते मैत्रीत बदलला. बोलताना नेमके शब्द सापडले नाहीत तरी केवळ काही गोष्टी गृहीत धरून एकमेकांना समजुन घेउन संवाद पुढे चालू राहु राहात होता.
या सगळ्यात हे मात्र खरं होतं की शेवटी व्यक्त व्ह्यायला भाषा हा माणसाने बनवलेल एक साधन
आहे. . मनातले विचार शब्द बद्ध करून ते मांडणे आणि समोरच्याचे शब्द ऐकून त्याचा अर्थ
लावणे ही क्रिया आपल्याला येणारया मात्रूभाषेत बोलताना इतकी सहज होते ती कळुनही येत नाही.
आणि नेमका याच्या उलटी गोष्ट परक्या भाषेला सामोरा जाताना होते.
त्या मुळेच मला वाटणारा भाषेचा अडसर मोठा वाटत होता, पण प्रत्यक्षात ही खरतर संधी होती एका नव्या अनुभवाला सामोरा जाउन तो आत्मसात करण्याची. हे मला ज्या क्षणी जाणवल तेव्हा पटल की माणस जोडायला शब्द धावून येत नाहीत तर तिथे मुळात संवादाची तीव्र इच्छा कामी पडते.
आणि नेमका याच्या उलटी गोष्ट परक्या भाषेला सामोरा जाताना होते.
त्या मुळेच मला वाटणारा भाषेचा अडसर मोठा वाटत होता, पण प्रत्यक्षात ही खरतर संधी होती एका नव्या अनुभवाला सामोरा जाउन तो आत्मसात करण्याची. हे मला ज्या क्षणी जाणवल तेव्हा पटल की माणस जोडायला शब्द धावून येत नाहीत तर तिथे मुळात संवादाची तीव्र इच्छा कामी पडते.
भाषा ,धर्म ,संस्कृति हे सगळच खरतर तस मेनमेड आहे , खरं आणि शाश्वत आहे ते न दिसणार पण सतत साथ
देणारा भावनांच अदृश्य आवरण जे माणसाला जागं ठेवून आहे.
नाती किंवा संबंध जोडले जातात ते प्रथम आतून जेव्हा माणसाला शब्दांची ओळख सुध्हा नसते. म्हणुनच लहान बाळ आपल्या सभोवतालच्या माणसांशी बंध जोडू शकतं. भाषा शब्द काहिहि नसले तरीही तो धागा मात्र हळुहळु घट्ट होत असतो.
नाती किंवा संबंध जोडले जातात ते प्रथम आतून जेव्हा माणसाला शब्दांची ओळख सुध्हा नसते. म्हणुनच लहान बाळ आपल्या सभोवतालच्या माणसांशी बंध जोडू शकतं. भाषा शब्द काहिहि नसले तरीही तो धागा मात्र हळुहळु घट्ट होत असतो.
माणसाला माणसाची ओळख पटली की शब्द फ़क्त मनातल्या भावनांचे वाहक ठरतात.
आईच्या मनातलं ओळखुन मुलाने केलेली कृति , नवरा बायकोने
मनातलं ओळखुन एकमेकांची जपलेली मने, न बोलता मंदिरात जोडलेले
हात ,मित्रां सोबत डोळे भरुन पाहिलेला सूर्यास्त , पहिल्या पावसाला पाहून अंगावर आलेला शहारा तर
कधी निरागस हास्य पाहून मनात उमटलेल्या लहरी, एखादं बक्षिस मिळाल्यावर
वडिलांनी न बोलता पाठीवर दिलेली दाद ,म्हातारया आज्जिचा हात हातात घेउन घालावलेली संध्याकाळ , असे आणि अजुन खुप सारया संवेदना ,भावना शब्दविन संवादू याच
प्रकारात मोडतात आणि आपल्याही न कळत आपण ते अनुभवत असतो.
जगण्याचा समतोल खरं तर कदाचित अशा गोष्टीनेच टिकून राहत असावा कारण न बोलता केलेल्या कृतीच चिरकाल स्मरणात राहतात.
जगण्याचा समतोल खरं तर कदाचित अशा गोष्टीनेच टिकून राहत असावा कारण न बोलता केलेल्या कृतीच चिरकाल स्मरणात राहतात.
शब्द कधी सुख देतात , कधी सांत्वन करतात , कधी वार करतात पण जेव्हा निरुपयोगी ठरतात तेव्हा सगळ्यात
जास्त संवाद साधत असतात हे कळलं की शब्दविन संवादू याचा खरा अर्थ उमगतो.
आनंद
आनंद
३१ मे २०१५
Thursday, April 30, 2015
लग जा गले
लग जा गले हे मदन मोहन आणि लताचं गाणं माझं सगळ्यात आवडतं
गाणं. अगदी हजारो वेळा ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं असं हे गाणं.
फावल्या वेळात ते आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह मला आवरला नाही आणि त्यातून
घडला विडीओ. खूप दिग्गज लोकांची हि कलाकृती गाणं हि खूप मोठी गोष्ट आहे, मला ते फारसं
जमलंय असं अजिबात नाहीये पण तरीही एक चाहता म्हणून माझ्याकडून हा प्रयत्न.
समुद्राच्या लाटांचा आवाज यावा
आणि रात्रीच्या चांदण पसरलेलं असावं आणि त्याच समुद्राने आर्त हाक मारून लाजऱ्या रात्रीला
बोलवाव आणि म्हणावं “लग जा गले” . कारण दुसऱ्या दिवशी दिवस होताच तीच अस्तित्व
नाहीसं होणार आहे . असं काहीसं चित्र हे गाणं ऐकलं कि माझ्या नजरे समोर उभं राहत.
आर्त हाकेचा जणूकाही परिपाठ असल्या सारखे ,असे एक एक शब्द या गाण्यात लिहिले आहेत.
आनंद
३० एप्रिल २०१५
Tuesday, March 31, 2015
दूर देशी चाललेला बाप
घरात ४ महिन्याचा निषाद ,त्याच्यात अडकेला माझा जीव आणि मला कामासाठी
बाहेरच्या देशातल्या कंपनी मध्ये कामासाठी आलेलं बोलावणं या कात्रीत मी सापडलो आणि
मनाची नुसती घालमेल सुरु झाली. तब्बल ४५ दिवस कसा राहणार होतो मी या कल्पनेनेच
डोळ्यात पाणी तरळत होतं. सुरुवातीच्या या महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी काही नवीन
शिकणाऱ्या आणि आम्हालाही नवीन काहीतरी शिकवणाऱ्या त्या छोट्या जीवाला पाहताना श्रावणातल्या
सरी सारखं आनंदाने खळाळणारं माझं मन दूर जावं लागणार या जाणीवेने एकदम वादळाच्या
तडाख्याने हिरमुसलेल्या रानासारखं कावरं बावरं झालं. जाण्याची तारीख जशी कळली तसं
प्रत्येक क्षण त्या चिमुकल्या जीवाबरोबर घालवावा असाच वाटत होतं पण कामाच्या लोड
मुळे तेही शक्य होत नव्हतं. एकंदर काय मी आणि माझं मन शिडाच्या होडी सारखं हेलकावे
खात होतो.
या सगळ्यात सगळ्यात मोठी खंबीर साथ होती ती माझ्या बायकोची म्हणजेच
स्वातीची आणि माझ्या आई ची. घर घरातल्या बायकांमुळे उभं राहता आणि बाहेरच्या अथांग
आकाशाशी नातं जोडायला आपल्याला बाहेर पडता येतं हे त्रिवार सत्य आहे. हाच जोडणारा
दुवा मला दोघींच्या रूपाने मिळाला होता. सुरुवातीला मला जावं लागणार हि बातमी
समजल्यावर कदाचित (...नव्हे पक्कच..! )
त्यांनाही वाईट वाटलंच असणार, त्यांच्याही मनाची घालमेल झालीच असणार पण त्याची
थोडीही जाणीव न होऊ देता त्या दोघी फक्त मला सांभाळू पाहत होत्या. स्वतःला प्रचंड
भाग्यवान समजण्यासाठी एवढं कारण सुद्धा पुरेसा व्हावं आणि स्वतःचाच हेवा वाटावा इतकी
हि गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. हे असं सगळं आजूबाजूला घडत होतं आणि मी माझ्या
मनाची तयारी करू पाहत होतो.
जाण्याआधी अजून एक असाच अनुभव आला तो चक्क न्हाव्याकडे. एका रविवारी असाच
कटिंगला गेलो आणि केस कापणाऱ्या पोराशी बोलत असताना कळला कि तो फार खुश आहे कारण
तो बरोबर एका महिन्याने घरी जाणार आहे. माझी उत्सुकता वाढली म्हणून घरची चौकशी
केली तेव्हा तो म्हणाला साहेब घरी बायको आहे आणि एक वर्षाचा मुलगा. वर्षातून २
वेळा घरी जातो. वडील घरी जाऊ देत नाहीत कारण इथे धंदा बुडतो. अजून एक महिन्याने
मुलाला भेटेन म्हणून खूप आनंद झाला आहे. मी फक्त ऐकत होतो. पुढे तो बोलत राहिला पण
मी अलीकडेच अडकून पडलो आणि मला पुढचं
काहीच ऐकू आला नाही. तो आणि मी एकाच समुद्राच्या लाटांवर स्वार होतो , फरक एवढाच
होता त्याची लाट त्याला किनाऱ्याला घेऊन जाणार होती आणि माझी मात्र किनाऱ्यावरून
परतून दूर चालली होती. घरी जायला मिळणार म्हणून त्याला खूप आनंद झाला होता आणि मला
दूर जावं लागणार म्हणून दु:ख. आयुष्यात प्रत्येक वळणावर नवा अनुभव उभा असतो याचा
पुन्हा एकदा प्रत्यय आला, तो मी माझ्या शिदोरी मध्ये टाकला.
काही लोकांच्या ठाई कदाचित माझ्या
दु:खाला काही किंमत नव्हतीही किवा पुरुष
आहे म्हटल्यावर घरासाठी कष्ट घ्यावेच लागतात किंवा कष्टाशिवाय फळ मिळत नाही नाही ,
वगैरे उपदेशात्मक वाक्येही कुणी ऐकवली पण मला त्याने फरक पडला नाहीच आणि पडणारही
नव्हताच. पुरुष असूनहि आपल्या मनातल्या भावना मोकळे पणाने घरातल्या लोकां समोर
व्यक्त करता येत होत्या याचं जास्त समाधान होतं. मुळात भावना व्यक्त करायलाही
स्त्री आणि पुरुष असं भेदभाव म्हणजे करणं म्हणजे मला हवेतला ऑक्सिजन घेताना
स्त्रीलिंगी ऑक्सिजन आणि पुल्लिंगी ऑक्सिजन असा भेदभाव केल्या सारखं वाटतं.
अश्रू
खरतरं सामर्थ्याचं प्रतिक असू शकतात कारण ते बाहेर पडण्यासाठी आत हिम्मत असलेलं मन
असावं लागतं. अर्थात मी इथे लिहून उद्या
पासून तो समज पुसून टाकला जाणार आहे असं मुळीच नाहीये त्यामुळे हा विषय इथेच
सोडलेला बरा , असो...!
जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा खरतरं काही समजेनासं झालं होतं पण शेवटी मनाचा
निर्धार केला मन घट्ट केलं. बाहेर पडण्याआधी झोपी गेलेल्या माझ्या चिमुकल्या
निषादला डोळे भरून पाहून घेतलं. झोपेतून उठल्यावर रोज समोर येणारा चष्मा घातलेला
बाबा समोर येणार नाही आणि कडेवर घेऊन फिरवणार पण नाही याची किंचितही जाणीव
नसलेल्या त्या निरागस जीवाला पाहून मन गलबलून गेलं. तशाच अवस्थेत घर सोडलं आणि
निषाद चा हा बाबा दूर देशी निघून आला.
आई बापाला मुलं म्हणजे सर्वस्व असतात हे जरी सत्य असलं इवलाश्या कोवळ्या जीवाने लावलेली ओढ , संपूर्ण घराला दिलेला नवा
आकार, नात्यांमध्ये भरलेलं नवा रंग या सगळ्याच मला खूप अप्रूप वाटतं आणि हे सारं
कुठल्यातरी अनामिक शक्तीने भारलेलं आहे असं वाटत राहत. हे असे लहान कोवळे जीव मला
सकाळच्या कोवळ्या किरणांसारखे भासतात. निरागस आणि पारदर्शी. पहाटेची किरणं खूप
हळुवार येतात पण सारी श्रुष्टी त्याने जागी होते ,पक्षी किलबिलाट करतात, पाती
वाऱ्याने डुलतात, पाणी कोवळ्या उन्हाने चकाकतं आणि हे सारं आपसूक घडतं.
लवकरच हे विरहाचे दिवस संपतील आणि आयुष्याच्या अजून एका
वळणावर सुखाची लकेर उमटेल हा विश्वास आहेच फक्त गरज आहे काळाचे काही अजून थोडे
क्षण उलटण्याची.
"निषाद" चा बाबा
३१ मार्च २०१५
Saturday, February 28, 2015
Let it go..!
हिवाळा संपून आता
उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कुणीही न सांगता निसर्गाने नेहमी प्रमाणे आपल्यात
बदल घडवून आणला आहे. मला नेहमी खूप अप्रूप आणि आश्चर्य वाटतं जेव्हा निसर्गात असे
बदल आपोआप घडून येतात. तिथे न कुणाचं वाट पाहणं असत न कुणाच्या सल्ल्याने केलेली
कृती. ते इतकं सहज असत कि बदल घडतोय हे कळायलाही तो नेमका क्षण सापडत नाही. काही
दिवसांपूर्वीच जिना उतरताना घराच्या जवळच्या बागेत डोकावलं तर दिसलं कि काही दिवसांपूर्वी
बहरलेला गुलमोहोर पर्णरहित झाला आहे. त्याचं ते भकास रूप पाहून क्षणभर वाईट वाटलं
पण नंतर पहिला त्याच्या आसपासच्या छोट्या झाडांनीही त्याचंच अनुकरण केला आहे. सगळ्या जुन्या पानांचा
पालापाचोळा जमिनीवर पडलेला होता. मग जाणवलं कि जुन्या पानांनी स्वतःच फांदीला
सोडून नव्या पालवी साठी जागा करून दिली आहे. आता काही दिवसांसाठी तो असाच भकास
दिसत राहील खरा पण लवकरच तो पुन्हा नव्या पालवीने भरून जाईल आणि त्याच्या केशरी
तांबड्या फुलांनी उन्हाला समोर जाईल. जे मुळात निसर्गाचं देणं आहे ते धरून ठेवून
चालत नाही हे या झाडांना कोण सांगत असेल. एखाद्या वर्षी एका झाडाची पाना गळतच
नाहीत असं कधीच कसं होत नाही ? बदल घडवून आणत असताना इतकं त्रयस्थ पणे झाड कसं
वागू शकतं ? मग कळलं कि जुन्याला सोडून नव्याला सामोरं जाण हा सहज भाव निसर्गात
मुळातच आहे. तिथे प्रत्येक झाड स्वतःचा विचार करत नाही तर नियमाला धरून ते
निसर्गाचा भाग म्हणून जगत राहत. त्यामुळेच निसर्गात समानता जपली जाते आणि त्याचा
समतोल ढासळत नाही. जुन्याचा अट्टाहास ठेवला नाही तरच नवीन क्षण जन्म घेतात.
निसर्गात याची इतकी उदाहरणे सापडतात कि खरोखर विस्मयचकित व्हायला होतं.
माणूस म्हणून आपण जेव्हा या
निसर्गाचाच भाग आहोत तेव्हा मात्र ते तितकं सोपं राहत नाही. माणसाला मुळात भावना
असल्यामुळे खरतरं प्रश्न सोपे व्हायला हवेत पण खरं चित्र काहीसं वेगळच दिसतं. आयुष्यातल्या
भौतिक गोष्टीं पासून माणसांपर्यंत प्रत्येकाला एकच नियम लावला जातो. घडून गेलेल्या
गोष्टींचं भांडवल करून त्या धरून ठेवल्या जातात, ओठातून बाहेर पडलेल्या शब्दांना
जास्त किंमत देऊन माणसं दुरावतात. भूतकाळ
आणि भविष्य याचा नेहमीच संबंध असतो पण माणसांच्या जगात तो नुसताच संबंध उरत नाही
तर तिथे वर्तमान आणि भविष्यावर भूतकाळातले अनुभव लादले जातात. या सगळ्यात होतं
इतकंच कि नव्याचं नवंपण जपलं जात नाही कारण जुन्याला हातातून सोडलंच जात नाही. मुळात
आयुष्यात गोष्टी ठरवून घडत नसतात पण त्या जशा घडतील तशाच प्रकारे त्याला सामोरा
गेलं आणि कुठलाही आवश्यक नसलेला संदर्भ जोडला नाही तरच आयुष्यातल्या नाविन्यपूर्ण
गोष्टींचा आनंद घेता येऊ शकतो. पण “सोडून देणं “ हे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना जमत
नाही आणि त्याचं ओझं वर्षानुवर्ष वाढत जातं. ऐन उमेदीच्या काळात थकलेली तरुण पिढी
हेच ओझं वाहत असते. आयुष्यात वाटचाल
करताना चांगल्या वाईट अनुभवांना सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. त्यातल्या वाईट अनुभवांना
तिथल्या तिथे सोडणं गरजेचं असत आणि चांगल्या अनुभवांना अनुभवून ते स्वतःत आत्मसात
करून इतरांना ते अनुभव दिले तरच खरतर त्याचं सार्थक होतं. अनुभवातून शिकणे यालाच
म्हणतात पण तो अनुभव नुसताच आत दडवून ठेवल्याने काही काळ छान वाटेल पण नंतर अपेक्षाभंग
झाला तर मात्र दुःखच होईल. त्यासाठी तिथल्या तिथे गोष्टी सोडून देणे आणि पुढे
वाटचाल करण गरजेचं आहे.
गोष्टी “धरून” ठेवून काहीही
मिळत नाही उलट अनावश्यक अपेक्षांचं ओझं आपण स्वतःवरच लादून घेतो. झाकलेल्या सव्वा
लाखाच्या मुठी पेक्षा कष्टा साठी नेहमी पुढे असलेला हात आपल्याला जास्त पुढे नेतो.
“आनेवाला पल जाने वाला है” असं जेव्हा गुलझार म्हणतो तेव्हा त्याला हेच सांगायचं
आहे. क्षण धरून ठेवताच येत नाहीत. सूर्यास्त रोज होत असला तरी एखाद्या
सूर्यास्ताला समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर घेत डोळे भरून पाहतानाचा “क्षण”
मुठीत दडवून ठेवता येत नाही तो फक्त तेवढ्या पुरता अनुभवायचा असतो आणि त्याची आठवण
मनात साठवायची असते. शहरातल्या गजबजलेल्या रोड वरून तोच सूर्य दुसऱ्या दिवशी दिसला
तर तो काल सारखा दिसत नाही म्हणून त्याला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. गेलेल्या
क्षणांचं परिमाण येणाऱ्या नव्या क्षणांना लावयचं नसतं. इतकं साधं गणित सोडवलं
म्हणजे आयुष्यात घडणारा प्रत्येक बदल सुखावह वाटू लागेल आणि त्याच्या स्वागताला
आपण नव्या जोमाने पुढे जाऊ शकू. साचलेलं पाणी शेवटी गढुळ होतं पण वाहत्या पाण्यालाच
जिवंतपणा असतो. किनाऱ्याला असलेल्या झाडांच्या मुळाना स्पर्श करत ते पुढे जात
राहत.
सोडून देणं अवघड असलं तरी शेवटी
“Let it go” म्हटलं कि बरेच प्रश्न सुटतात हेच खरं, कारण आयुष्याची गती राखण्यासाठी हाच
एकमेव मार्ग आहे.
My Version of Aanewala pal janewala hai :
आनंद
२८ फेब्रुवारी २०१५
Saturday, January 31, 2015
लघुकथा : आज्जीची फुलं
हिवाळ्यातली सकाळ. साधारण
साडेनऊ दहाची वेळ. धावणारे रस्ते , पळणारी माणस, ओसंडून वाहणारे बस थांबे , शाळेला
निघालेली मुलं, कामावर चालेलेले चाकरमाने , बाजूला भाजीवाल्यांच्या हातगाड्या
तिथेच भाव करणाऱ्या गृहिणी, चौकात झालेलं ट्रेफिक जाम , ओरडणारे हॉर्न , कुठे
बागेत जमलेला आजोबांचा कट्टा तर कुठे छोट्या मुलांचा चाललेला गलका. कुठल्याही
शहरात लागू पडेल असं हे चित्र. याच चित्रात जणूकाही कुठेच नसणाऱरी मोठी आज्जी. हो
मोठी आज्जीच. हेच तीचं नाव. कुणी ठेवलं हे खरतर कुणालाच माहित नाही . सडपातळ शरीर
यष्टी, सावळा रंग, शुभ्र पांढरे केस, खणखणीत आवाज, वयानुसार कमकुवत झालेली नजर,
हाताला अडकवलेली छोटी पिशवी. मोठी आजी एकटीच राहायची, याच वर्षी ती या छोट्या
शहरात राहायला आली होती. याआधी एका मानलेल्या मुलीने त्यांना सांभाळल होतं पण आता तीच
लग्न झाल्यावर त्या स्वतःहूनच बाहेर पडल्या. आज्जीला आता कुणीही नव्हतं, हा आता
दुरच कुणीतरी नातेवाईक असावं पण तेवढ्या पुरतंच. तर आज मोठी आज्जी बाहेर पडली होती
कारण फार पूर्वी ती काम करत होती तिथल्या सरकारी
दवाखान्यातल्या डॉक्टरांना भेटायला जायला. त्या डॉक्टर बाई याच शहरात आता स्वतःचा
दवाखाना चालवतात असं आजीनं त्यांच्या मानलेल्या मुलीकडून कळलं होतं.
रस्त्याच्या कडेनी हळूहळू
चालत आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टी कडे लक्ष न देत ती चालत होती. खूप वर्षांनी
डॉक्टर बाई भेटणार म्हणून तशी ती आनंदात होती आणि कारण पण तसच होतं आज डॉक्टर
बाईंचा वाढदिवस होता. आजी नेहमी त्यांना वाढदिवसाला गुलाबाची फुलं भेट द्यायची .
आजही कोपऱ्यावर एक एक लहान मुलगी फुले विकत बसली होती , आजीने तिच्याकडून दोन
गुलाबाची फुलं विकत घेतली. डॉक्टर बाईना गुलाबाचं फुल फार आवडायचं . जुन्या आठवणीत
हरवलेल्या आजी दवाखान्या समोर आल्या. गेट उघडून आल गेल्या. दवाखान्यात फार गर्दी नव्हती. तिथल्या काऊटर वर
बसलेल्या रिसेप्शनिस्ट ला त्यांनी आपली ओळख सांगितली. आणि डॉक्टर बाईना भेटायचा
निरोप पाठवायची विनंती केली. रिसेप्शनिस्ट
उठून आत गेली आणि तिने निरोप दिला. मोठ्या आजीना तिने बसायला सांगितलं. डॉक्टर बाई
बाहेर आल्या, मोठ्या आजीला पाहून त्या थोड्या चपापल्या. पण आजीना फार आनंद झाला
होता. त्या लगबगीने उठून पुढे झाल्या आणि बाईना शुभेच्छा दिल्या आणि गुलाबाची दोन
फुलं हातात दिली. बाईंनी ती घेतली आणि त्यांचे आभार मानले, त्यांची विचारपूस केली
आणि त्यांना बसायला सांगून आत गेल्या. आजीला तहान लागली होती म्हणून ती पलीकडे कोपररयातल्या
नळावर पाणी प्यायला गेल्या. तिथेच बाईंच्या खोलीची खिडकी होती. बाई आत जाऊन आपल्या
नवऱ्याला सांगत होत्या कि मोठी आजी म्हणून काम करणाऱ्या एक बाई बाहेर आल्या आहेत.
मला वाटतं आता आपण त्यांना काहीतरी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असावी. उगाच का
एवढ्या वर्षा नंतर त्या आज अचानक आल्या. त्यावर तो म्हणाला काही नको उगाच तू त्यांना
आता देशील आणि सारखी सवय लागेल. दोन गुलाबाची फुलं उगाच खूप महागात पडतील
आपल्याला. त्या पेक्षा त्यांना काहीतरी खायला दे आणि जाऊ देत.
पाणी पिताना आजींच्या
कानावर हे शब्द आले. त्यांची तहान मेली. त्या पुन्हा बाकावर जाऊन बसल्या. डॉक्टर
बाई बाहेर आल्या त्यांनी आजीना खायला आणलं होतं. आजी नको म्हणाल्या. त्या उठल्या
आणि मगाशी दिलेली फुलं परत मागितली. डॉक्टर बाईना काही कळेना. त्या आत जाऊन फुलं
घेऊन आल्या. आजीनी फुलं परत घेतली. आजी बोलू लागली, “तुम्हाला जी फुलं महाग पडतील असं वाटत आहे ती
फुलं न देणंच चांगलं म्हणून ती परत घेते आहे. मी आले ते केवळ जुन्या आठवणींना
स्मरून पण मला वाटतं काळ खूप पुढे गेलाय, प्रत्येक गोष्टीत स्वार्थच असला पाहिजे
आणि आपणही प्रत्येक गोष्टीत स्वार्थच बघितला पाहिजे अशा प्रकारे जगायची सवय
लागलेल्या जगात माझ्या फुलांची किंमत शून्य आहे.“
एवढं बोलून आजी बाहेर पडली.
तो पर्यंत टळटळीत दुपार झाली होती. हवेत आता सकाळचा गारवा उरला नव्हता. चटका बसावा
असं उन होतं. आजी पुन्हा आल्या रस्त्याने परत चालू लागली. मगाशी फुलं विकत
घेतलेल्या मुलीपाशी येऊन त्यांनी ती फुलं परत केली. छोटी मुलगी म्हणाली आजी आम्ही
एकदा दिलेली फुलं परत घेत नाही. आजीचा उदास चेहरा पाहून छोटी मुलगी पुढे झाली आणि
फुलाचे पैसे परत देऊ लागली. आजीने तिच्या कडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात
फिरवला आणि म्हणाली “असू देत तुला माझ्या कडून भेट आहेत असं समज.” एवढं बोलून आजी
निघाली , आजूबाजूचं चित्र पुन्हा तेच होतं पण आजी मात्र त्यात दिसत नव्हती.
आनंद
३१ जानेवारी २०१५
Tuesday, December 30, 2014
तहान
वर्ष संपता संपता खरंतर बऱ्याचदा ३१ डिसेंबर साजरा करत येणाऱ्या नवीन वर्षासाठी
काही संकल्प सोडले जातात. काही थोडेफार उत्साही जीव फारफार तर नवीन वर्षात काय
नवीन घ्यायचं , करायचं हे हि ठरवून टाकतात. काही नुसतेच संकल्प सोडणारे ती गोष्ट
फळास नेण्यासाठीचा भव्यदिव्य आराखडा सुद्धा बनवतात. थोडक्यात काय बहुतांश लोक पुढे
म्हणजेच भविष्याकडे पाहतात. सरलं वर्ष आणि आयुष्यात आलेले अनुभव तसे दुर्लक्षितच
राहतात. हा हल्ली आता फेसबुकने किंवा तसल्याच तस्सम सोशल वेबसाईट ने फुकटात बनवलेला
आपल्या सरल्या वर्षाचा गोड सुखावह स्लाइड शो किंवा व्हिडीओ म्हणजेच जर सरल्या
वर्षाचा आढावा, असं म्हणायचं असेल तर मग सगळेच या परीक्षेत पास होतील कारण तिथे
आपल्याला काहीच कष्ट पडत नाहीत कारण आपल्या आयुष्याचा रेडीमेड आढावा तिथे मिळतो. टेक्नोलोजी
ने आपल्याला आळशी केल्याचा हा आणखी एक पुरावा इतकंच. त्यात ना आपल्या भावनांचा
कल्लोळ असतो ना आपलेपणाची जाण.
रोजचं आयुष्य जगताना असे अगणित क्षण असतात ज्यांची नोंद फक्त आपल्या मनात होत
असते, आजूबाजूच्या जगाला कधीही कळू न शकणाऱ्या असंख्य गोष्टी फक्त आपल्या असतात
असे “ शेअर” न केलेल्या क्षणांचा आढावा घ्यायला अजूनतरी कुठला “automatic” मार्ग
नाहीये, तिथे आपल्यालाच आत डोकवावं लागतं तेव्हा कुठे तो झरा वाहू लागतो. पण खूप
कमी लोक आत डोकावू शकतात आणि ती हिम्मत दाखवतात.
येणाऱ्या वर्षाचा विचार करताना अगदी सहज मनात एक विचार आला तो असा कि माणूस
खरंच आळशी होत चाललाय कि परावलंबी ? नवे नवे शोध तर लागतच आहेत आणि त्याने आपलं
राहणीमान दिवसेंदिवस सुधारत आहे याचा अर्थ माणूस आळशी नक्कीच नाहीये. मग नक्की काय
होतंय ? खूप वेळ विचार केला आणि मग उमगलं कि माणसाची “भौतिक तहान” भागत
नाहीये तो सारखाच तहानलेला आहे. मग हि तहान आहे तरी कशाची ? तर ती अनेक प्रकारची
आहे. कुणाला पैशाची तहान आहे, कुणाला
स्वतःच्या (फक्त स्वतःच्या )करिअरची , तर कुणाला अजून मोठ्या हुद्द्याची , कुणाला
परदेशाची, कुणाला मोठ्या घराची , कुणाला उच्चभ्रू राहणीमानाची , कुणाला मोठ्या
पगाराची , कुणाला फक्त आनंदी राहायची तहान आहे. आता या प्रकारची कुठलीही तहान असणं
म्हणजे गुन्हा वगैरे आहे असं मी मुळीच म्हणणार नाहीये आणि तसं माझं वैयक्तिक मतही
नाही. पण तरीही वाईट या गोष्टीचं वाटतं हि फक्त भौतिक असणाऱ्या गोष्टींचीच तहान सगळीकडे
वाढत चालली आहे. एका मर्यादे पर्यंत अशा प्रकारची तहान माणसाला “so called आनंदी”
ठेवू शकते, पण ती फक्त सुरुवात असते एका मोठ्या कृष्ण विवरा सारख्या मोठ्या काळ्या
गुहेची. असं म्हणतात कृष्ण विवर सर्व काही गिळंकृत करत तसच हि तहान आपल्या “आतल्या”
माणसाला गिळंकृत करत चालली आहे. या तहानेच्या हव्यासापोटी माणसातली नाती आणि
प्रेमाचे धागे मात्र विरताना दिसतायेत. कुठे मुलगा परदेशात म्हणून त्याच्या आठवणीत
झुरणारे आईबाप दिसतात तर कुठे अनाठाई चढाओढ करताना एकमेकांशी स्पर्धा करून दमछाक
होणारे तरुण, पैशाच्या जोरावर गळचेपी करणारे राजकारणी तर कुठे एकमेकांच्या जीवावर उठलेली
नवी पिढी.
पण खरतर “तहान” हि हवीच किंबहुना ती उपजतच प्रत्येक गोष्टीत असते.
नव्या शोधाची जननी हि तहानच असते तसेच ती नव्या अनुभवांची नांदी हि असते. निसर्गातल्याही
प्रत्येक गोष्टीत ती दिसते. मग पावसाळ्या आधी तहानलेली धरणी असो , कि हिवाळ्यातल्या
बोचऱ्या थंडीच्या रात्री नंतर उन्हाची पाहिलेली वाट, न थकता समुद्राचं तहानलेल्या किनाऱ्याकडे
झेप घेणं असो किं तहानलेल्या वाऱ्याने डोंगराला घातलेली साद असो.
पैसा कमावणं, घर, गाडी, नोकरी, मूळबाळ अशा स्वकेंद्रित आयुष्याची सवय नव्या
पिढीला होत चालली आहे. यात सगळ्यात “मी” हि व्यक्तीरेखा मुख्य पात्र आहे. त्या पलीकडे
जाऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाशी बोलता येईल आणि त्याला अनुभव संपन्न करता येईल यासाठी
फारच कमी प्रयत्न होताना दिसतात. आणि याच साठी लागते ती निर्मळ ,चिरकाल टिकणाऱ्या शाश्वत
गोष्टींची तहान. कुणाला ती स्वतःच्या छंदात सापडते ,कुणाला रोजच्या कामात तर
कुणाला सामाजिक कार्यात.
भटकंती हे जरी सध्या एक फॅड म्हणून सुद्धा काही लोकांना वाटत असलं आणि ते
स्टेटस सारख काही लोक मिरवत असले तरी भटकंतीची “तहान” हि एक प्रचंड मोठी ताकद
असलेली गोष्ट आहे. भटकंती करून निसर्गाच्या जवळ जाऊन नवे अनुभव तर मिळतातच पण
त्याच बरोबर भिन्न समाजातील लोकांना भेटून अनेक गोष्टीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन
मिळतो. आपल्याच देशातल्या , राज्यातल्या अनेक विस्मयचकित करणाऱ्या गोष्टी पाहायला
मिळतात. पावसाळ्यातल्या अनेक भटकंतीमध्ये पाहिलेले उलटे धबधबे, काळ्या मिट्ट
रात्री काजव्यांनी प्रकाशून टाकलेला डोंगर किंवा जंगल , घनदाट झाडीमध्ये एकटच उभं
राहून ऐकलेला शांततेचा आवाज, डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्यात तोंड बुडवून भागवलेली
तहान, कुठे उंचावरल्या टोकावरून ढगाला लावलेला हात तर कधी दाट धुक्यामध्ये केलेला
स्वर्गीय प्रवास , कधी जंगलात चालताना लागलेला चकवा तर कधी मुद्दाम घेतलेला “longcut”,
कधी अनोळखी माणसांनी दाखवलेली माया तर कधी न कळत जुळलेले ऋणानुबंध, कधी एकाच
फुलपाखरामागे केलेला उन्हातला प्रवास किंवा कधी रान फुलांच्या रानामध्ये हरवून
गेलेला वेडा जीव, कधी समुद्राने घातलेली साद तर कधी डबडबलेल्या डोळ्याने शेवटचा किरण
दिसे पर्यंत पाहिलेला सुर्यास्त, हे सगळे प्रकार या तहानेचे द्योतक आहेत. अशा
प्रकारची तहान असणं मी भाग्याचं समजतो. ती माणसाला “जागं” ठेवते.
भटकंती प्रमाणेच वाचनाची तहान असणं हि एक प्रचंड मोठी शक्ती आहे. वाचनाने
नुसतेच अनुभव मिळतात किंवा माणूस समजदार होतो असं नाहीये तर वाचनाने माणसाला स्व
कळू लागतो, जगणं समृध्द होतं आणि मुखवटे दूर सारून स्वतःचा चेहरा समजतो. पुस्तक खरंतर
बोलत असते , वाचणाऱ्याला फक्त शब्द वेचायचे असतात. आपण हि तहान जेवढी जागृत ठेवू
तेवढी ती आपल्याला नव्या गोष्टी शिकवत राहते.
संकुचित आयुष्य जगण्यापेक्षा बहरलेलं आणि उर्जेने भरलेलं आयुष्य जगण्यात जी
मजा आहे ती खरतरं कशातच नाही. म्हणूनच आयुष्याचा वेग हा आपण शाश्वत सुखासाठी किती
तहानलेले आहोत यावर अवलंबून असतो. जितकी हि तहान जास्त तितकं आयुष्याला नवे अर्थ
येत जातात. आपण का जगतो आहोत हा प्रश्न पडायची वेळच येत नाही कारण आपल्या प्रत्येक
श्वासाला एक उद्देश असतो. तहान भागल्यानंतर जी तृप्ती अनुभवायला मिळते ती शब्दात
मांडणं खरोखर अशक्य आहे. पण ती तहान टिकवणं आणि पुन्हा पुन्हा नवी क्षितिजे धुंडाळत
राहणं जास्त महत्वाचं आहे. प्रत्येकाने जर
अशा गोष्टी शोधून त्यात स्वतःला गुंतवून घेतलं तर समाज प्रगल्भ होण्यास मदतच होईल.
सक्रीय युवाशक्ती हि देश घडवते असं
म्हणतात आणि हीच युवाशक्ती घडते ती शाश्वत गोष्टीसाठी तहानलेल्या निर्लेप मनांनी. येणाऱ्या वर्षात हीच तहान प्रत्येकामध्ये जागृत
व्हावी आणि आयुष्याला खरं परिमाण मिळवं हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि अशाच एका
संध्याकाळी पावसात चिंब भिजल्यावर पावसावर लिहिलेल्या चार ओळी इथे लिहितो आणि
थांबतो. पुन्हा भेटूच तहानलेल्या एखाद्या किनाऱ्यावर जिथे किनारा समुद्राकडे झेप
घेत असेल आणि सूर्य क्षितिजाकडे...!
इति आनंद
३० डिसेंबर २०१४
पुन्हा भेटूच २०१५ मध्ये
नव्या
अनुभवांच्या नव्या गोष्टीं सोबत
Sunday, November 30, 2014
आई बाप
आई बाप होण या सारखी जगात दूसरी आनंददाई गोष्ट नाही.नऊ महीने पोटात वाढवून जन्म देणारी आई आणि बाळाला पहिल्यांदा हातात घ्यायला चातका सारखी आतुरतेने वाट पाहणारा बाप दोघेही तेवढेच भाग्यवान असतात.
गेले काही महीने इतके वेगळ्या प्रकारचे अनुभव देणारे होते की बस..
मग ती बाळाच्या पोटातल्या हालचालिचि पहिली चाहुल असो किंवा त्याने पोटातुन हातपाय मारून आपल्या हाकेला दिलेला प्रतिसाद असो , त्याला बाहेरून एकवलेल्या गोष्टी असोत किंवा गायलेली गाणी असोत. सगळच कसं आम्हा दोघांना नवं आणि विलक्षण अनुभूति देणारं होतं. ते दिवस कसे सरले हे खरंतर कळलंच नाही. म्हणता म्हणता तो दिवस आला आणि सारं घरदार त्या नव्या जिवाच्या जन्माकड़े डोळे लावून हॉस्पिटल मधे जमलं. हिला ऑपरेशन थेटर मधे नेलं आणि माझ्या कानाने आहे नाही ती सारी शक्ति एकवटून घेतली आणि फ़क्त पहीला "ट्या " कड़े एकवटली..! साडे सहाच्या दरम्यान तो कानावर पडला आणि बाहेर येउन सिस्टर ने मुलगा झाल्याची बातमी दिली . लगेच एकमेकाना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि फ़ोन सुरु झाले. माझी नजर मात्र बाळाला पहायला असुसली होती. थोड्याच वेळात तोहि क्षण आला.
पहिल्यांदा हातात घेतल्यावर कुणीतरी हलकी फुंकर मारावी अन मी हवेत तरंगायला लागाव अस काहीस झाल ,आजुबाजुचा विसर पडला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. इवलेसे डोळे उघडून मी मारलेल्या हाकेला त्याने साद दिली आणि माझ्या डोळ्यांच्या कड़ा आनंदून पाणावल्या खरया पण लगेच स्वतः ला सावरून घेत त्याला डोळे भरुन पाहिल आणि मनोमन धन्य झालो.
तो क्षण केवळ विलक्षण नव्हता तर एका नव्या अध्यायाची सुरुवात करणारा होता. नऊ महीने आम्ही फ़क्त "होणारे आई बाप" होतो त्या एका क्षणाने ते अंतर एका निमिषात संपवलं होतं. स्वप्न आणि सत्य यात खुप अंतर असतं असं म्हणतात पण कदाचित या एका क्षणाने स्वप्नाचं सत्यात झालेलं स्थित्यंतर प्रत्यक्षात डोळ्या देखत दाखवून दिलं होतं.
या नव्या अध्यायाला काही दिवसात महिना पूर्ण होईल. त्या चिमुकल्या जिवाने आमचं सारं आयुष्य व्यापून टाकलं आहे.
आता जेव्हा जेव्हा त्याची नजर मला शोधते तेव्हा तेव्हा मला सार जग ठेंगण वाटत. तो कधी हळुच गालात हसून पाहतो , कधी आठ्या आणुन मला खुणावतो, कधी इवल्याशा बोट़ात माझा हात पकडू पाहतो, तर कधी एक टक पाहत जणू माझ्या आत डोकावतो आणि शब्दा विना माझ्याशी संवाद साधतो. माझी अंगाई तुला जेव्हा झोपवते तेव्हा जीव् आनंदून जातो आणि बाप होण्याचा सार्थ अभिमान वाटतो.
बोबडं बोलून आम्ही दोघांनी त्याच्याशी साधलेला संवाद जरी एकतर्फी वाटत असला तरी त्याने दिलेले हुंकार थेट काळजात पोहोचतात.
हे सारंच कस अप्रूप वाटावं असं आहे. या अशाच काही पहिल्या क्षणांना आठवून जे सुचला ते लिहिलय फ़क्त तुझ्या साठी....:-)
पहिल रडू
पहिल हसू
पहिला स्पर्श
पहिला हर्ष..!
पहिली हाक
पहिली साद
पहिला हुंकार
पहिला प्रतिसाद..!
पहिला कटाक्ष
पहिली नजर
भुकेने व्याकुळ
पहिला गजर..!
पहिला स्वर
पहिला सुर
डोळ्याला आलेला
पहिला पुर..!
पहिली ओळख
पहिला विश्वास
पहिला काळोख
पहिला भास्..!
पहिली अंगाई
पहिल गाणं
तुझी निजही
सुरांचं देणं..!
पहिलं कौतुक
पहिला राग
क्षणभर झोपताच
आलेली जाग..!
रात्र शाळेतली
पहिली सभा
जागेपणीच
झालेली प्रभा..!
भरभर धावे
आता काळ
खोटे बोलू
लागे घडयाळ..!
पहिल सगळ
वाटे वेगळ
आता दिसे
जग आगळ..!
तुझ सार
तेच पहिलं
पहिले आम्ही
उरलो नाही..!
जन्म झाला
अमुच्या पोटी
दैवाचीच ही
कृपा मोठी..!
30 नोव्हेंबर 2014
आनंद
गेले काही महीने इतके वेगळ्या प्रकारचे अनुभव देणारे होते की बस..
मग ती बाळाच्या पोटातल्या हालचालिचि पहिली चाहुल असो किंवा त्याने पोटातुन हातपाय मारून आपल्या हाकेला दिलेला प्रतिसाद असो , त्याला बाहेरून एकवलेल्या गोष्टी असोत किंवा गायलेली गाणी असोत. सगळच कसं आम्हा दोघांना नवं आणि विलक्षण अनुभूति देणारं होतं. ते दिवस कसे सरले हे खरंतर कळलंच नाही. म्हणता म्हणता तो दिवस आला आणि सारं घरदार त्या नव्या जिवाच्या जन्माकड़े डोळे लावून हॉस्पिटल मधे जमलं. हिला ऑपरेशन थेटर मधे नेलं आणि माझ्या कानाने आहे नाही ती सारी शक्ति एकवटून घेतली आणि फ़क्त पहीला "ट्या " कड़े एकवटली..! साडे सहाच्या दरम्यान तो कानावर पडला आणि बाहेर येउन सिस्टर ने मुलगा झाल्याची बातमी दिली . लगेच एकमेकाना शुभेच्छा दिल्या गेल्या आणि फ़ोन सुरु झाले. माझी नजर मात्र बाळाला पहायला असुसली होती. थोड्याच वेळात तोहि क्षण आला.
पहिल्यांदा हातात घेतल्यावर कुणीतरी हलकी फुंकर मारावी अन मी हवेत तरंगायला लागाव अस काहीस झाल ,आजुबाजुचा विसर पडला आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. इवलेसे डोळे उघडून मी मारलेल्या हाकेला त्याने साद दिली आणि माझ्या डोळ्यांच्या कड़ा आनंदून पाणावल्या खरया पण लगेच स्वतः ला सावरून घेत त्याला डोळे भरुन पाहिल आणि मनोमन धन्य झालो.
तो क्षण केवळ विलक्षण नव्हता तर एका नव्या अध्यायाची सुरुवात करणारा होता. नऊ महीने आम्ही फ़क्त "होणारे आई बाप" होतो त्या एका क्षणाने ते अंतर एका निमिषात संपवलं होतं. स्वप्न आणि सत्य यात खुप अंतर असतं असं म्हणतात पण कदाचित या एका क्षणाने स्वप्नाचं सत्यात झालेलं स्थित्यंतर प्रत्यक्षात डोळ्या देखत दाखवून दिलं होतं.
या नव्या अध्यायाला काही दिवसात महिना पूर्ण होईल. त्या चिमुकल्या जिवाने आमचं सारं आयुष्य व्यापून टाकलं आहे.
आता जेव्हा जेव्हा त्याची नजर मला शोधते तेव्हा तेव्हा मला सार जग ठेंगण वाटत. तो कधी हळुच गालात हसून पाहतो , कधी आठ्या आणुन मला खुणावतो, कधी इवल्याशा बोट़ात माझा हात पकडू पाहतो, तर कधी एक टक पाहत जणू माझ्या आत डोकावतो आणि शब्दा विना माझ्याशी संवाद साधतो. माझी अंगाई तुला जेव्हा झोपवते तेव्हा जीव् आनंदून जातो आणि बाप होण्याचा सार्थ अभिमान वाटतो.
बोबडं बोलून आम्ही दोघांनी त्याच्याशी साधलेला संवाद जरी एकतर्फी वाटत असला तरी त्याने दिलेले हुंकार थेट काळजात पोहोचतात.
हे सारंच कस अप्रूप वाटावं असं आहे. या अशाच काही पहिल्या क्षणांना आठवून जे सुचला ते लिहिलय फ़क्त तुझ्या साठी....:-)
पहिल रडू
पहिल हसू
पहिला स्पर्श
पहिला हर्ष..!
पहिली हाक
पहिली साद
पहिला हुंकार
पहिला प्रतिसाद..!
पहिला कटाक्ष
पहिली नजर
भुकेने व्याकुळ
पहिला गजर..!
पहिला स्वर
पहिला सुर
डोळ्याला आलेला
पहिला पुर..!
पहिली ओळख
पहिला विश्वास
पहिला काळोख
पहिला भास्..!
पहिली अंगाई
पहिल गाणं
तुझी निजही
सुरांचं देणं..!
पहिलं कौतुक
पहिला राग
क्षणभर झोपताच
आलेली जाग..!
रात्र शाळेतली
पहिली सभा
जागेपणीच
झालेली प्रभा..!
भरभर धावे
आता काळ
खोटे बोलू
लागे घडयाळ..!
पहिल सगळ
वाटे वेगळ
आता दिसे
जग आगळ..!
तुझ सार
तेच पहिलं
पहिले आम्ही
उरलो नाही..!
जन्म झाला
अमुच्या पोटी
दैवाचीच ही
कृपा मोठी..!
30 नोव्हेंबर 2014
आनंद
Sunday, October 26, 2014
मनातून भाग 6 :- वाचू आनंदे
गेल्या काही महिन्यात राधेय, मृत्युंजय, एकलव्य, पावनखिंड अशा पुस्तकांचा वाचन घडल आणि एक प्रचंड ताकदीचे आणि दुर्दम्य इच्छा शक्ति जागृत करणारे विषय असल्याने अर्थातच भारावून व्हयायला झाल.
पुस्तकांच विश्लेषण कराव इतकी ताकत तर माझ्यात नाहीच त्या मुळे तो खटाटोप मी करणार नाहीच पण तरीही राहवला नाही म्हणून मनाला जे वाटल आणि मला जे जाणवल ते इथे लिहिलय.
राधेय खरतर एकदा वाचल असा म्हणु शकत नाही कारण ते पुन्हा पुन्हा खुप वेळा चाळुन झालय. चांगला आणि वाईट याच्या खुप पलिकडे जाऊन कर्ण समजुन घ्यावा लागतो.
युद्धाच्या आधी कर्णाच एक स्वगत आहे त्याचा सारांश खुप काही सांगुन जातो.
मृत्यु येणार हे गवसुन सुद्धा कर्ण त्या रुपंताराची कारणमीमांसा करत असतो. मृत्यु ला रूपांतर मानणारा कर्ण खरोखर निर्भयि होता हेच क्षणोंक्षणी जाणवत राहत.
ऐहिक ऐश्वर्य , व्यवहारिक समाधान , वासना तृप्ति म्हणजेच का् साफल्य ! ते प्राण्यांनाही भोगता येत. मानवी जीवनाचा साफल्य ऐहिक तृप्तित नाही. या खेरीज अजुन एक तृप्ति असते ती कर्णाने संपादन केली होती. त्याच्या मृत्यु बरोबर संपणारी ती तृप्ति नाही. परमेश्वराने सुर भरलेल्या बासरीतुन जसे तीव्र सुर उमटले , तशीच असंख्य कोमल सुरांची पखरण सुध्हा झाली. चारित्र्य जपता आला. उदंड स्नेह संपादन करता आला. मित्रच न्हवे तर शत्रुही तृप्त झालेले पाहिले. वैरभाव पत्करला , तो ही परमेश्वररुपाशी. या पेक्षा जीवनाच यश यापेक्षा वेगळ का्य असत ?
हे विचार कर्ण नदी तीरावर उभा राहून करत असतो तोहि एक दुर्मिळ योगायोगाच म्हणावा लागेल. नदीच्या पाण्यात ज्याला सोडून देण्यात आल ,तोच आज तिथे उभा राहून आयुष्याकडे मागे वळुन पाहत होता आणि मृत्यु ला आव्हान देत होता.
कर्ण वाचताना माझ्या मनात उगाच त्याच्या बदल करुणा किंवा दया अजिबात आली नाही तर त्याच्या प्रत्येक कृतिमागे असलेली कारणे आणि त्याची भूमिका ही खुप गहन विचार करायला लावणारी होती.
एक प्रचंड इच्छा शक्तीचा स्त्रोत कुठेतरी आत आयुष्यभर झिरपत रहावा आणि वाटेवरच्या काटयाना, संकटाना लीलया सामोरा जाण्याचा बळ मिळत रहावा आणि तरीही ताठ मानने मृत्युलाही कवटाळण्याची ज्याची तयारी करणारा कर्ण भावतो तो याच मुळे...!
कर्णा प्रमाणेच नंतर वाचलेला "एकलव्य" भावला तो त्याच्या प्रचंड प्रामाणिक आणि दुर्दम्य आशेने व गुरू भक्तिमुळे. एकलव्य ची गोष्ट तशी सगळ्याच्या परिचायाची.
एकलव्य हा हिरण्यधनु चा पुत्र. द्रोणाचार्यांकडे विद्या याचना करण्यासाठी जातो पण ते नकार देतात. त्या नंतर एकलव्याने स्व प्रयत्नातुन मिळवलेली विद्या , त्यातून अर्जुनाला वाटू लागलेला मत्सर आणि द्रोणाचार्यांना गुरु दक्षिणा म्हणुन दिलेला उजव्या हाताचा अंगठा , हा घटनाक्रम. पण यात प्रत्येक वळणावर एकलव्यने दाखवलेला संयम केवळ प्रशंसेस पात्र ठरतो.
एकलव्य वाचत असताना मला क्षणोंक्षणी जाणवत होत ते आजही आपल्या आजुबाजुस असलेले अनेक द्रोणाचार्य आणि असंख्य एकलव्य. खरतर ही सामाजिक शोकांतिका आहे. पात्रता असुनही जवळ असलेली विद्या देऊ न शकणारे गुरु आणि ती शिकू न शकणारे विद्यार्थी.
संयमाच्या जोरावर माणुस किती आणि का्य प्राप्त करू शकतो याचा परिपाठ एकालव्यच्या गोष्टीतुन मिळतो. आणि तोच मला इथे जास्त भावला.
पावनखिंड आताच वाचून संपवल. एक अप्रतिम पुस्तक. बाजी प्रभुची ओळख पटायला पुरेशी अशी माहिती आणि वर्णन त्यात आहे. बर्याचदा खिंड लढ़वणारे बाजी एवढीच ओळख आपल्याला असते आणि होती पण त्या पलिकडे माणुस म्हणून ते कसे होते आणि शिवाजीन्बद्दल त्यांना कशा प्रकारे आदर होता हे खुप प्रामाणिकपणे मांडले आहे. बाजी अक्षरशः सावली सारखे महाराजांच्या सोबत असायचे आणि या राजाला काही होउ नये म्हणुन सतत झटायचे. जेव्हा सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून येतो आणि मिरजेचा वेढा सोडून शिवाजी महाराज पन्हाळ्याला परत येतात तेव्हा उद्विग्न पणे ते म्हणतात " बाजी माणसाचा यश जस वाढत जात तसे त्याचे शत्रु पण वाढत जातात आणि तो एकाकी पडतो." यावर बाजी राजाना धीर तर देतातच पण पन्हाळा किती मजबूत आहे आणि इथे राहण कस योग्य आहे हे ही सांगतात. यावर महाराज आपल्या मनातला होरा बाजीनी बरोबर ओळखला म्हणून खुश होतात.
महाराज बाजीना वडिलकिच्या नात्याने वागवायचे ते उगीच नाही. बाजी नुसतेच लढ़वय्ये नव्हते तर ते एक प्रचंड हुशार सेनानी होते. पहिली तोफ पन्हाळ्या वरुन कधी डागायची हे महाराजानी पूर्ण पणे बाजींवर सोपवले होते ते फ़क्त त्यांना बाजीं बद्दल असलेल्या प्रचंड विश्वासा मुळेच.
राजा जगला पाहिजे हे एकच ध्येय समोर ठेवून खिंडित उभे ठाकलेले बाजी मन जिंकतातच पण त्याही पेक्षा मोठा काम म्हणजे इतर मावळ्या मधेही ते ती जिगर आणि इच्छा जागवून जातात.
या सगळ्या पुस्तकां मधे एक समान गोष्ट होती आणि ती म्हणजे प्रचंड बिकट , प्रतिकूल परिस्थिति असुनही केवळ मिळालेल्या आयुष्याचे सार्थक करण्यासाठी जिवाचा रान करून झटणारि काही दुर्मिळ आणि देदीप्यमान व्यक्तिमत्वे...!
दाटुन आलेले ढग उदास वाटत असले तरी मला वाटत , आपला जन्म ज्या धरणीवर बरसुन तिला तृप्त करण्यासाठी झाला आहे ती कृति करायला ते आसुसलेलेच असतात.
ढगच काय पण प्रत्येकचाच जन्म हा फ़क्त हवेतला ऑक्सीजन शोषून जिवंत राहण्या साठी झाला नसून तो जगण्याचा महोत्सव करून त्याचा सार्थक करण्या साठी झाला आहे हे जेव्हा प्रत्येकाला उमजेल तेव्हा खरे ढग बरसतील आणि आकाश निरभ्र होईल....!
आनंद
26 ओक्ट्बर 2014
Tuesday, September 30, 2014
आशा
आशेला भूलताना
स्वप्न ते फुलले
नदीला मिळताना
थेंबही हरले..
उमलून कोमेजताना
फुलही हसले
सरूनही उरताना
क्षणही फसले....
स्वप्नात रमताना
सत्यही सरले
उरत जपताना
भास जुने स्मरले....
आभाळाला सोडताना
पाणीही रुसले
डोळ्यांनी अश्रूंना
स्वतःच पुसले....
सुख दुखाना झेलताना
श्वासही संपले
संपलेल्या श्वासांना
गंध तरी कसले....?
हे गंध आशेचे......
एका नव्या दिशेचे....!
नव्या क्षितिजाच्या , नव्या
प्रवासाचे ...!
नव्या आकाशाच्या, नव्या
मुक्कामाचे.....!
आनंद
३० सप्टेंबर २०१४
Subscribe to:
Posts (Atom)