Powered By Blogger

Monday, November 9, 2015

अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला



निषाद, सप्त सुरातला सातवा सूर. वरचा “ नि “. अर्थात आमच्या घरातला नवा स्वर. 
आमच्या घराचा श्वास, जो प्रत्येकाला स्पर्शून जातो , वाऱ्या बरोबर गंधाने प्रवास करावा तसं काहीसं आम्ही करत राहतो. दिशा, वेग याचं भान सोडून फक्त वाहत राहतो. हाच कोवळा जीव घरात येऊन आता वर्ष उलटून गेलंय पण तरीही पहिल्या दिवसापासून आता पर्यंतच्या आठवणी तितक्याच ताज्या आहेत. जणू काही परवा सगळं घडलं आहे इतक्या आणि तेच स्मरण करताना त्याच्या जन्माच्या पहाटे पासून आतापर्यंत च्या आठवणी कवितेच्या रूपाने व्यक्त झाल्या आणि इथे त्या सादर केल्या आहेत.  
निषाद आमच्या साठी प्राजक्ताचा सडा आहे. ज्याने आमचा अंगण भरून टाकलंय, पहाटे कोवळ्या फुलांनी पांढरी शुभ्र नक्षी काढावी तसं काहीसं. प्राजक्ताचं फुल आपणहून अंगणात झेप घेतं आणि एकामागून एक अशा सगळ्या फुलांचा सडा अंगण भरून टाकतो. असंच एक फुल आमच्या अंगणात नव्हे ओंजळीत आलंय निरागस, कोवळं आणि तितकंच लोभस.


होती पहाट वेडी आतुर शुक्र तारा ,
गंधाळूनया झुरे तो, पुन्हा उनाड वारा
वेड्या त्या जीवाची, झाली उगाच दैना
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

नव्हतास तू जगी या , होती चाहूल घराला ,
क्षण एक एक होता, आतुर त्या घडीला,
बहरे वसंत पुन्हा तुझियाच स्वागताला ,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

तुझिया त्या स्वरांनी, नांदी नव्या सुरांची
स्वप्ने नवीन पुन्हा, गुंफून पापण्यांची ,
स्पर्शून त्या जीवाला, आनंद भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छेडीले नाद जेव्हा कोवळ्या पावलांनी,
हाकेस साद तुझिया अनामिक शब्दांनी,
स्मृतीतुनी तरंगे राग ऐकलेला,
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

छोटया मुठीत तुझिया स्वप्ने गुंफलेली
कोवळ्या नजरेतुनी तू व्याकूळ शोध घेई,
खट्याळ त्या खळीचा संकेत ना कळाला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

हास्यात तुझिया मिळे अर्थ जीवनाचा
येता कुशीत माझ्या, कल्लोळ भावनांचा
बरसुनी अतृप्त तरीही मेघ भारलेला
अंगणात माझिया तव प्राजक्त उमललेला....!

आनंद

30 नोव्हेंबर २०१५


Sunday, September 20, 2015

तोच पाउस..

पाउस नेहमी वेगळा असतो. पावसाळा सुरु झाला तेव्हा त्याच रूपड़ खुप हवाहवास आणि एखाद्या खेळकर मुलासारख होत. या वेळेस जसजसा पावसाळा पुढे सरकत होता तसतसा तो मनाची धास्ती वाढवत होता. दुष्काळ समोर फेर धरून नाचू लागला आणि तोच पाउस दुष्ट वाटू लागला. त्याने दिलेली हुलकावणि ही एक अतिशय क्रूर चेष्टा झाली. शेतकरी हवालदिल झाला. झाडाला नव्या पालवी च्या ठिकाणी प्रेत दिसू लागली. शहरे एकीकडे सण साजरे करत  असताना दूसरीकडे मात्र माणस जीव गमावू लागली. यातच तो पुन्हा बरसला तोच पाउस...
नदयाना पुर आले, डोंगर हिरवे झाले आणि शेत डोलू लागली पण त्याच्या त्या शिडकाव्याने गेलेली माणस परत आली नाहीत आणि येणार ही नाहीत. पण तरीही पाउस अजुनही तोच आहे आणि तोच राहिल..


Monday, August 31, 2015

एकांत

एकांत

दाटलेल्या ढगांना
आतुर अशी किनार
आठवांच्या थेंबांना
मातीचा हुंकार

मनातून उमटलेला
कोवळा स्वर
निळ्या पाण्याचा
गहिरा तळ

धूसर पहाटेला
फांदीवर चा पक्षी
अदृश्य आकाशाला
सोनेरी नक्षी

केसरी कातरवेळेला
दिव्यांची आरास
अंधाराच्या साथीला
स्वप्नांचा प्रकाश

स्वप्न की सत्य
याचीच भ्रांत
अनमोल क्षणांचा
दुर्मिळ एकांत
 
                             आनंद

Friday, July 31, 2015

लघुकथा : सांज सर


दुपारची उन्हं आता उतरू लागली होती. पावसाळा सुरु होऊन बरेच दिवस झाले असले तरी म्हणावा तसा पाऊस सुद्धा झाला नव्हता. वारा सुद्धा एकटा पडून कंटाळला असावा म्हणून त्याचाही आवाज हल्ली कमी होता. पण आज मात्र हवा वेगळी होती. पावसाची चाहूल देणाऱ्या त्या हवेला वेगळाच गंध येत होता. पक्षी किलबिल करत असतानाच रस्त्यावरून मातीची धूळ उडवत एखादी गाडी इकडून तिकडे गेली आणि रमा चमकली. अजून तर बाहेर पडायला बराच अवकाश होता पण तिला उगाच उशीर झाल्या सारखं वाटलं. हातातलं काम पुन्हा सुरु करून ती खिडकीतून बाहेर बघत राहिली. तिकडे मंदिरात आरतीची तयारी सुरु होती. वारा पुन्हा पुन्हा कुठून तरी तो पावसाचा गंध घेऊन येत होता. तिन्ही सांजेचे दिवे लवकरच लागणार होते. शेतातली गुरं परतीला लागली होती आणि घुंगराचा आवाज करत आपापल्या गोठ्यात परतत होती. कुठे कट्ट्यावर गप्पांचा फड रंगला होता तर कुठे हापश्यावर बायका बडबड करत होत्या. पोरं लंगडी, गोट्या तर कुठे लपाछपी खेळण्यात मग्न होती.  रमासाठी जसा हा खूप मोठा दिवस तसच रमेश साठीही होता. रमाचं काम संपल आणि तिला संध्याकाळचे वेध लागले. इकडे रमेशचं कपड्याच्या दुकानातलं काम आवरण्याच्या नादात त्याचं लक्ष किती वाजले या कडे नह्व्ताच पण तरीही तो मध्ये मध्ये घड्याळाकडे पाहून सुटकेचे निश्वास टाकत होता.


आता अंधारून यायला लागलं होतं. संधिप्रकाश नाहीसा होऊ लागला होता. काळे ढग जणू काही वरून खाली चाललेली गलबल वरून पाहत होते. पाउस कोसळणार हे तर पक्का झालं होतं. येणाऱ्या पावसाचं स्वागत किलबिल करणारी घरं करत होती. कुठे वाळलेले कपडे काढण्याची, कुठे गोठ्याला पत्रे लावायची, कुठे छप्पर झाकायची तर कुठे गुरांचा चार झाकून ठेवायची गडबड चालू होती.
रमा संधी साधून बाहेर पडली. कुणी पाहत नाही याची खात्री करून तिने मागच्या गल्लीतून सुटका करून घेतली. भरभर पाऊले उचलत ती रानाच्या दिशेने चालली. आजूबाजूचं जग वेगळ्या सप्तकात आणि रमा वेगळ्या वेगळ्याच सुरांवर स्वार होऊन निघाली होती. मनात धडधड असली तरी ती तितकीच खंबीर होती. आपण करतो आहोत ते बरोबरच आहे याची पक्की जाणीव तिला होती.
 तिकडे रमेश कामावरून सुटला होता. घरी जाऊन तो हि काही निमित्त काढून बाहेर पडला. गावाच्या वेशीकडून रानाकडे निघाला. आता आकाश गडगडू लागलं होतं कुठल्याही क्षणी जोराची सर कोसळेल असं वाटत होतं. पडलेल्या मंदिरापाशी रमेश पोहोचला. इकडेतिकडे पाहिलं तर मागेच रमा पाठमोरी उभी असलेली त्याला दिसली. तो त्या दिशेने वळताच तिला त्याची चाहूल लागली. दोघांनी एकमेकांकडे बघून स्मित केलं. पुढच्याच क्षणी दोघे समोरच्या डोंगराकडे चालू लागली होती. झपझप चालणारी पाऊले आणि दारावर येऊन थांबलेला पाउस यांच्यात जणू काही करार झाला होता. अजूनही एकही टिपूस कोसळला नव्हता पण आकाश मात्र गच्च भरलं होतं. हळूहळू डोंगराची चढण आली. आता पूर्ण अंधारून यायला काही क्षण उरले होते. रमेश ने एका झाडाखाली थांबून कंदील पेटवला. आणि दोघे पुन्हा चालू लागली. रमाच्या हातावर हलकेच पाण्याचा एक थेंब कोसळला. ती शहारली पण पुन्हा चालू लागली. आता डोंगर बराच सर झाला होता. थोडं पुढे जाताच गाव नाहीसं होणार होतं आणि पुढची उतरण लागणार होती. तोच वीज कडाडली आणि मेघ गर्जना होऊन ढगाचा बांध फुटला. जोराची सर कोसळली. पश्चिमेला सूर्य मावळलेल्या जागेवर नुसताच पुसटसा प्रकाश दिसत होता. पाण्याने विझवलेल्या दिव्याच्या वाती सारखा  तो हि हळूहळू नाहीसा होणार होता. सांजवेळ असली तरी या सरीने त्या क्षणाला वेगळंच परिमाण दिला होतं. रमा आणि रमेश भिजू लागले. काही पावलांवर डोंगराची चढण संपत होती. दोघांनी एकमेकांकडे पहिला. एव्हाना पानांवरून थेंब जमिनीवर उड्या घेऊ लागले होते. टपटप पडणाऱ्या थेंबानी पणे नाचत होती.


रमा आणि रमेश दोघे आता मुक्त होती. सरीने वातावरण बदलवून टाकलं होतं. एकदाच दाटून आलेला कंठ रमाने गिळून टाकला. घर सोडून आपण रमेश बरोबर पळून आलोय अशी जाणीवच मुळात तिला होत न्हवती. आणि तिकडे रमेश सुद्धा याच विचाराने आनंदी होत होता. सांज वेळेला आलेल्या सरीने संध्याकाळच्या सुस्तीला पार उडवून लावला होतं. अंधार त्या हवेतल्या गार हवेला बिलगला होता. आता सकाळ पर्यंत त्याला साथ मिळाली होती. पाउलवाट ओली झाली होती आणि त्यावरची पाउले कधीच पुसून गेली होती. उद्या नव्या दिवसाची सुरुवात  होणार होती. दोघे आता उतरणीला लागली होती. हातातल्या कंदिलाने वाट दिसत होती. थोड्याच वेळात रस्ता लागला आणि शेवटची सुटणारी बस समोर उभी असलेली दिसली. दोघे आनंदली. खिडकीतून बाहेर बघताना रमा पावसाचे आभार मानत होती. सांज सरीने तिचे अश्रू पुसले होते आणि जगण्याची नवी दिशा दाखवली होती. रमेश ने तिचा हात हातात घेतला तिला हायसं वाटलं.  आता सरलेल्या भूतकाळा पेक्षा येणारा प्रत्येक क्षण तिला नवा विश्वास देत होता.
पाऊस नवे क्षण रुजवतो हेच खरं मग ते काळ्या जमिनीत किवा कोवळ्या मनात , भविष्याची नांदी होते हे मात्र खरं.

आनंद
३१ जुलै २०१५




  

Sunday, May 31, 2015

शब्दविन संवादू

नुकताच परक्या देशातून परत भारतात आल्या मुळे एका नव्या संस्कृतीची ओळख थोडीफार का होइना झाली होती. या वेळी परका देश चीन असल्यामुळे भाषा हा मोठा अडसर ठरणार होता. जाण्या आधी हीच धास्ती होती. संवादामुळे विचाराचि देवाण घेवाण होते पण इथे तोच दुवा कमकुवत होता.  तिथे पोहोचल्या नंतर सुद्धा हा समज अजुन दृढ़ झाला. कारण इंग्लिश येणारे 1-2 जण सोडले तर बाकि सगळा दुष्काळच होता.  हळुहळू दिवस जाऊ लागले आणि शब्दाविना संवादू असा काहीसा प्रकार जमू लागला. 

मग ते ऑफिस मधले सहकारी असोत किंवा सुपर मार्केट मधला स्टाफ किंवा रस्त्यावरच्या फ़ास्ट फ़ूड च्या गाड़ी वरचं चायनिज जोडपे किंवा मी रहायचो तिथल्या होटल मधले कर्मचारी किंवा आइसक्रीम च्या दुकानातला पोरगा किंवा फ़ॉरेस्ट मधे चित्रकला काढणारया मुली किंवा yello mountain ला ट्रेकिंग ला आलेली फॅमिली किंवा ऑफिस मधल्या सहकारी मित्राचा मित्रांचा ग्रुप असो किंवा टैक्सी ड्राईवर असो कुठेही  शब्द अडसर ठरत नव्हते.
ऑफिस मधल्या सहकार्यां बरोबर तर एक प्रकारचा बॉन्डिंग तयार झाला आणि पुढे तर ते मैत्रीत बदलला.  बोलताना नेमके शब्द सापडले नाहीत तरी केवळ काही गोष्टी गृहीत धरून एकमेकांना  समजुन घेउन संवाद पुढे चालू राहु राहात होता.

या सगळ्यात हे मात्र खरं होतं की शेवटी व्यक्त व्ह्यायला भाषा हा माणसाने बनवलेल एक साधन 
आहे. . मनातले विचार शब्द बद्ध करून ते मांडणे आणि समोरच्याचे शब्द ऐकून त्याचा अर्थ लावणे ही क्रिया आपल्याला येणारया मात्रूभाषेत बोलताना इतकी सहज होते ती कळुनही  येत नाही.
आणि नेमका याच्या उलटी गोष्ट परक्या भाषेला सामोरा जाताना होते.
त्या मुळेच मला वाटणारा भाषेचा अडसर मोठा वाटत होता, पण प्रत्यक्षात ही खरतर संधी होती एका नव्या अनुभवाला सामोरा जाउन तो आत्मसात करण्याची. हे मला ज्या क्षणी जाणवल तेव्हा पटल की माणस जोडायला शब्द धावून येत नाहीत तर तिथे मुळात संवादाची तीव्र इच्छा कामी पडते. 

भाषा ,धर्म ,संस्कृति हे सगळच खरतर तस मेनमेड आहे , खरं आणि शाश्वत आहे ते न दिसणार पण सतत साथ देणारा भावनांच अदृश्य आवरण जे माणसाला जागं ठेवून आहे.
नाती किंवा संबंध जोडले जातात ते प्रथम आतून जेव्हा माणसाला शब्दांची  ओळख सुध्हा नसते. म्हणुनच लहान बाळ आपल्या सभोवतालच्या माणसांशी बंध जोडू शकतं. भाषा शब्द काहिहि नसले तरीही तो धागा मात्र हळुहळु घट्ट होत असतो. 



माणसाला माणसाची ओळख पटली की शब्द फ़क्त मनातल्या भावनांचे वाहक ठरतात. 
आईच्या मनातलं ओळखुन मुलाने केलेली कृति , नवरा बायकोने  मनातलं ओळखुन एकमेकांची जपलेली मने, न बोलता मंदिरात जोडलेले हात ,मित्रां सोबत डोळे भरुन पाहिलेला सूर्यास्त , पहिल्या पावसाला पाहून अंगावर आलेला शहारा तर कधी निरागस हास्य पाहून मनात उमटलेल्या लहरी,  एखादं बक्षिस मिळाल्यावर वडिलांनी न बोलता पाठीवर दिलेली दाद ,म्हातारया आज्जिचा हात हातात घेउन घालावलेली संध्याकाळ , असे आणि अजुन खुप सारया  संवेदना ,भावना शब्दविन संवादू याच प्रकारात मोडतात आणि आपल्याही न कळत आपण ते अनुभवत असतो.
जगण्याचा समतोल खरं तर कदाचित अशा गोष्टीनेच टिकून राहत असावा कारण न बोलता केलेल्या कृतीच चिरकाल स्मरणात राहतात.
शब्द कधी सुख देतात , कधी सांत्वन करतात , कधी वार करतात पण जेव्हा निरुपयोगी ठरतात तेव्हा सगळ्यात जास्त संवाद साधत असतात हे कळलं की शब्दविन संवादू याचा खरा अर्थ उमगतो.

                                                                    आनंद 
                                                                    ३१ मे २०१५ 

Thursday, April 30, 2015

लग जा गले

लग जा गले  हे मदन मोहन आणि लताचं गाणं माझं सगळ्यात आवडतं गाणं. अगदी हजारो वेळा ऐकून सुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं असं हे गाणं. फावल्या वेळात ते आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचा मोह मला आवरला नाही आणि त्यातून घडला विडीओ. खूप दिग्गज लोकांची हि कलाकृती गाणं हि खूप मोठी गोष्ट आहे, मला ते फारसं जमलंय असं अजिबात नाहीये पण तरीही एक चाहता म्हणून माझ्याकडून हा प्रयत्न.

समुद्राच्या लाटांचा आवाज यावा आणि रात्रीच्या चांदण पसरलेलं असावं आणि त्याच समुद्राने आर्त हाक मारून लाजऱ्या रात्रीला बोलवाव आणि म्हणावं “लग जा गले” . कारण दुसऱ्या दिवशी दिवस होताच तीच अस्तित्व नाहीसं होणार आहे . असं काहीसं चित्र हे गाणं ऐकलं कि माझ्या नजरे समोर उभं राहत. आर्त हाकेचा जणूकाही परिपाठ असल्या सारखे ,असे एक एक शब्द या गाण्यात लिहिले आहेत. 

                                                               
                                                               आनंद
                                                               ३० एप्रिल २०१५ 

Tuesday, March 31, 2015

दूर देशी चाललेला बाप


घरात ४ महिन्याचा निषाद ,त्याच्यात अडकेला माझा जीव आणि मला कामासाठी बाहेरच्या देशातल्या कंपनी मध्ये कामासाठी आलेलं बोलावणं या कात्रीत मी सापडलो आणि मनाची नुसती घालमेल सुरु झाली. तब्बल ४५ दिवस कसा राहणार होतो मी या कल्पनेनेच डोळ्यात पाणी तरळत होतं. सुरुवातीच्या या महिन्यांमध्ये प्रत्येक दिवशी काही नवीन शिकणाऱ्या आणि आम्हालाही नवीन काहीतरी शिकवणाऱ्या त्या छोट्या जीवाला पाहताना श्रावणातल्या सरी सारखं आनंदाने खळाळणारं माझं मन दूर जावं लागणार या जाणीवेने एकदम वादळाच्या तडाख्याने हिरमुसलेल्या रानासारखं कावरं बावरं झालं. जाण्याची तारीख जशी कळली तसं प्रत्येक क्षण त्या चिमुकल्या जीवाबरोबर घालवावा असाच वाटत होतं पण कामाच्या लोड मुळे तेही शक्य होत नव्हतं. एकंदर काय मी आणि माझं मन शिडाच्या होडी सारखं हेलकावे खात होतो. 

या सगळ्यात सगळ्यात मोठी खंबीर साथ होती ती माझ्या बायकोची म्हणजेच स्वातीची आणि माझ्या आई ची. घर घरातल्या बायकांमुळे उभं राहता आणि बाहेरच्या अथांग आकाशाशी नातं जोडायला आपल्याला बाहेर पडता येतं हे त्रिवार सत्य आहे. हाच जोडणारा दुवा मला दोघींच्या रूपाने मिळाला होता. सुरुवातीला मला जावं लागणार हि बातमी समजल्यावर  कदाचित (...नव्हे पक्कच..! ) त्यांनाही वाईट वाटलंच असणार, त्यांच्याही मनाची घालमेल झालीच असणार पण त्याची थोडीही जाणीव न होऊ देता त्या दोघी फक्त मला सांभाळू पाहत होत्या. स्वतःला प्रचंड भाग्यवान समजण्यासाठी एवढं कारण सुद्धा पुरेसा व्हावं आणि स्वतःचाच हेवा वाटावा इतकी हि गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. हे असं सगळं आजूबाजूला घडत होतं आणि मी माझ्या मनाची तयारी करू पाहत होतो. 

जाण्याआधी अजून एक असाच अनुभव आला तो चक्क न्हाव्याकडे. एका रविवारी असाच कटिंगला गेलो आणि केस कापणाऱ्या पोराशी बोलत असताना कळला कि तो फार खुश आहे कारण तो बरोबर एका महिन्याने घरी जाणार आहे. माझी उत्सुकता वाढली म्हणून घरची चौकशी केली तेव्हा तो म्हणाला साहेब घरी बायको आहे आणि एक वर्षाचा मुलगा. वर्षातून २ वेळा घरी जातो. वडील घरी जाऊ देत नाहीत कारण इथे धंदा बुडतो. अजून एक महिन्याने मुलाला भेटेन म्हणून खूप आनंद झाला आहे. मी फक्त ऐकत होतो. पुढे तो बोलत राहिला पण मी अलीकडेच  अडकून पडलो आणि मला पुढचं काहीच ऐकू आला नाही. तो आणि मी एकाच समुद्राच्या लाटांवर स्वार होतो , फरक एवढाच होता त्याची लाट त्याला किनाऱ्याला घेऊन जाणार होती आणि माझी मात्र किनाऱ्यावरून परतून दूर चालली होती. घरी जायला मिळणार म्हणून त्याला खूप आनंद झाला होता आणि मला दूर जावं लागणार म्हणून दु:ख. आयुष्यात प्रत्येक वळणावर नवा अनुभव उभा असतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला, तो मी माझ्या शिदोरी मध्ये टाकला.
काही लोकांच्या ठाई  कदाचित माझ्या दु:खाला काही किंमत नव्हतीही  किवा पुरुष आहे म्हटल्यावर घरासाठी कष्ट घ्यावेच लागतात किंवा कष्टाशिवाय फळ मिळत नाही नाही , वगैरे उपदेशात्मक वाक्येही कुणी ऐकवली पण मला त्याने फरक पडला नाहीच आणि पडणारही नव्हताच. पुरुष असूनहि आपल्या मनातल्या भावना मोकळे पणाने घरातल्या लोकां समोर व्यक्त करता येत होत्या याचं जास्त समाधान होतं. मुळात भावना व्यक्त करायलाही स्त्री आणि पुरुष असं भेदभाव म्हणजे करणं म्हणजे मला हवेतला ऑक्सिजन घेताना स्त्रीलिंगी ऑक्सिजन आणि पुल्लिंगी ऑक्सिजन असा भेदभाव केल्या सारखं वाटतं. 
अश्रू खरतरं सामर्थ्याचं प्रतिक असू शकतात कारण ते बाहेर पडण्यासाठी आत हिम्मत असलेलं मन असावं लागतं.  अर्थात मी इथे लिहून उद्या पासून तो समज पुसून टाकला जाणार आहे असं मुळीच नाहीये त्यामुळे हा विषय इथेच सोडलेला बरा , असो...!

जाण्याचा दिवस उजाडला तेव्हा खरतरं काही समजेनासं झालं होतं पण शेवटी मनाचा निर्धार केला मन घट्ट केलं. बाहेर पडण्याआधी झोपी गेलेल्या माझ्या चिमुकल्या निषादला डोळे भरून पाहून घेतलं. झोपेतून उठल्यावर रोज समोर येणारा चष्मा घातलेला बाबा समोर येणार नाही आणि कडेवर घेऊन फिरवणार पण नाही याची किंचितही जाणीव नसलेल्या त्या निरागस जीवाला पाहून मन गलबलून गेलं. तशाच अवस्थेत घर सोडलं आणि निषाद चा हा बाबा दूर देशी निघून आला.

आई बापाला मुलं म्हणजे सर्वस्व असतात हे जरी सत्य असलं इवलाश्या कोवळ्या  जीवाने लावलेली ओढ , संपूर्ण घराला दिलेला नवा आकार, नात्यांमध्ये भरलेलं नवा रंग या सगळ्याच मला खूप अप्रूप वाटतं आणि हे सारं कुठल्यातरी अनामिक शक्तीने भारलेलं आहे असं वाटत राहत. हे असे लहान कोवळे जीव मला सकाळच्या कोवळ्या किरणांसारखे भासतात. निरागस आणि पारदर्शी. पहाटेची किरणं खूप हळुवार येतात पण सारी श्रुष्टी त्याने जागी होते ,पक्षी किलबिलाट करतात, पाती वाऱ्याने डुलतात, पाणी कोवळ्या उन्हाने चकाकतं आणि हे सारं आपसूक घडतं.  
लवकरच हे विरहाचे दिवस संपतील आणि आयुष्याच्या अजून एका वळणावर सुखाची लकेर उमटेल हा विश्वास आहेच फक्त गरज आहे काळाचे काही अजून थोडे क्षण उलटण्याची.  

        "निषाद" चा बाबा 

         ३१ मार्च २०१५ 

Saturday, February 28, 2015

Let it go..!


हिवाळा संपून आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कुणीही न सांगता निसर्गाने नेहमी प्रमाणे आपल्यात बदल घडवून आणला आहे. मला नेहमी खूप अप्रूप आणि आश्चर्य वाटतं जेव्हा निसर्गात असे बदल आपोआप घडून येतात. तिथे न कुणाचं वाट पाहणं असत न कुणाच्या सल्ल्याने केलेली कृती. ते इतकं सहज असत कि बदल घडतोय हे कळायलाही तो नेमका क्षण सापडत नाही. काही दिवसांपूर्वीच जिना उतरताना घराच्या जवळच्या बागेत डोकावलं तर दिसलं कि काही दिवसांपूर्वी बहरलेला गुलमोहोर पर्णरहित झाला आहे. त्याचं ते भकास रूप पाहून क्षणभर वाईट वाटलं पण नंतर पहिला त्याच्या आसपासच्या छोट्या झाडांनीही  त्याचंच अनुकरण केला आहे. सगळ्या जुन्या पानांचा पालापाचोळा जमिनीवर पडलेला होता. मग जाणवलं कि जुन्या पानांनी स्वतःच फांदीला सोडून नव्या पालवी साठी जागा करून दिली आहे. आता काही दिवसांसाठी तो असाच भकास दिसत राहील खरा पण लवकरच तो पुन्हा नव्या पालवीने भरून जाईल आणि त्याच्या केशरी तांबड्या फुलांनी उन्हाला समोर जाईल. जे मुळात निसर्गाचं देणं आहे ते धरून ठेवून चालत नाही हे या झाडांना कोण सांगत असेल. एखाद्या वर्षी एका झाडाची पाना गळतच नाहीत असं कधीच कसं होत नाही ? बदल घडवून आणत असताना इतकं त्रयस्थ पणे झाड कसं वागू शकतं ? मग कळलं कि जुन्याला सोडून नव्याला सामोरं जाण हा सहज भाव निसर्गात मुळातच आहे. तिथे प्रत्येक झाड स्वतःचा विचार करत नाही तर नियमाला धरून ते निसर्गाचा भाग म्हणून जगत राहत. त्यामुळेच निसर्गात समानता जपली जाते आणि त्याचा समतोल ढासळत नाही. जुन्याचा अट्टाहास ठेवला नाही तरच नवीन क्षण जन्म घेतात. निसर्गात याची इतकी उदाहरणे सापडतात कि खरोखर विस्मयचकित व्हायला होतं.


माणूस म्हणून आपण जेव्हा या निसर्गाचाच भाग आहोत तेव्हा मात्र ते तितकं सोपं राहत नाही. माणसाला मुळात भावना असल्यामुळे खरतरं प्रश्न सोपे व्हायला हवेत पण खरं चित्र काहीसं वेगळच दिसतं. आयुष्यातल्या भौतिक गोष्टीं पासून माणसांपर्यंत प्रत्येकाला एकच नियम लावला जातो. घडून गेलेल्या गोष्टींचं भांडवल करून त्या धरून ठेवल्या जातात, ओठातून बाहेर पडलेल्या शब्दांना जास्त किंमत देऊन माणसं दुरावतात.  भूतकाळ आणि भविष्य याचा नेहमीच संबंध असतो पण माणसांच्या जगात तो नुसताच संबंध उरत नाही तर तिथे वर्तमान आणि भविष्यावर भूतकाळातले अनुभव लादले जातात. या सगळ्यात होतं इतकंच कि नव्याचं नवंपण जपलं जात नाही कारण जुन्याला हातातून सोडलंच जात नाही. मुळात आयुष्यात गोष्टी ठरवून घडत नसतात पण त्या जशा घडतील तशाच प्रकारे त्याला सामोरा गेलं आणि कुठलाही आवश्यक नसलेला संदर्भ जोडला नाही तरच आयुष्यातल्या नाविन्यपूर्ण गोष्टींचा आनंद घेता येऊ शकतो. पण “सोडून देणं “ हे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना जमत नाही आणि त्याचं ओझं वर्षानुवर्ष वाढत जातं. ऐन उमेदीच्या काळात थकलेली तरुण पिढी हेच ओझं वाहत असते.  आयुष्यात वाटचाल करताना चांगल्या वाईट अनुभवांना सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं. त्यातल्या वाईट अनुभवांना तिथल्या तिथे सोडणं गरजेचं असत आणि चांगल्या अनुभवांना अनुभवून ते स्वतःत आत्मसात करून इतरांना ते अनुभव दिले तरच खरतर त्याचं सार्थक होतं. अनुभवातून शिकणे यालाच म्हणतात पण तो अनुभव नुसताच आत दडवून ठेवल्याने काही काळ छान वाटेल पण नंतर अपेक्षाभंग झाला तर मात्र दुःखच होईल. त्यासाठी तिथल्या तिथे गोष्टी सोडून देणे आणि पुढे वाटचाल करण गरजेचं आहे.
गोष्टी “धरून” ठेवून काहीही मिळत नाही उलट अनावश्यक अपेक्षांचं ओझं आपण स्वतःवरच लादून घेतो. झाकलेल्या सव्वा लाखाच्या मुठी पेक्षा कष्टा साठी नेहमी पुढे असलेला हात आपल्याला जास्त पुढे नेतो.
“आनेवाला पल जाने वाला है” असं जेव्हा गुलझार म्हणतो तेव्हा त्याला हेच सांगायचं आहे. क्षण धरून ठेवताच येत नाहीत. सूर्यास्त रोज होत असला तरी एखाद्या सूर्यास्ताला समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर घेत डोळे भरून पाहतानाचा “क्षण” मुठीत दडवून ठेवता येत नाही तो फक्त तेवढ्या पुरता अनुभवायचा असतो आणि त्याची आठवण मनात साठवायची असते. शहरातल्या गजबजलेल्या रोड वरून तोच सूर्य दुसऱ्या दिवशी दिसला तर तो काल सारखा दिसत नाही म्हणून त्याला नावे ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. गेलेल्या क्षणांचं परिमाण येणाऱ्या नव्या क्षणांना लावयचं नसतं. इतकं साधं गणित सोडवलं म्हणजे आयुष्यात घडणारा प्रत्येक बदल सुखावह वाटू लागेल आणि त्याच्या स्वागताला आपण नव्या जोमाने पुढे जाऊ शकू. साचलेलं पाणी शेवटी गढुळ होतं पण वाहत्या पाण्यालाच जिवंतपणा असतो. किनाऱ्याला असलेल्या झाडांच्या मुळाना स्पर्श करत ते पुढे जात राहत.
सोडून देणं अवघड असलं तरी शेवटी “Let it go” म्हटलं कि बरेच प्रश्न सुटतात हेच खरं, कारण आयुष्याची गती राखण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे.

My Version of Aanewala pal janewala hai : 

                                                            आनंद

२८ फेब्रुवारी २०१५ 

Saturday, January 31, 2015

लघुकथा : आज्जीची फुलं



हिवाळ्यातली सकाळ. साधारण साडेनऊ दहाची वेळ. धावणारे रस्ते , पळणारी माणस, ओसंडून वाहणारे बस थांबे , शाळेला निघालेली मुलं, कामावर चालेलेले चाकरमाने , बाजूला भाजीवाल्यांच्या हातगाड्या तिथेच भाव करणाऱ्या गृहिणी, चौकात झालेलं ट्रेफिक जाम , ओरडणारे हॉर्न , कुठे बागेत जमलेला आजोबांचा कट्टा तर कुठे छोट्या मुलांचा चाललेला गलका. कुठल्याही शहरात लागू पडेल असं हे चित्र. याच चित्रात जणूकाही कुठेच नसणाऱरी मोठी आज्जी. हो मोठी आज्जीच. हेच तीचं नाव. कुणी ठेवलं हे खरतर कुणालाच माहित नाही . सडपातळ शरीर यष्टी, सावळा रंग, शुभ्र पांढरे केस, खणखणीत आवाज, वयानुसार कमकुवत झालेली नजर, हाताला अडकवलेली छोटी पिशवी. मोठी आजी एकटीच राहायची, याच वर्षी ती या छोट्या शहरात राहायला आली होती. याआधी एका मानलेल्या मुलीने त्यांना सांभाळल होतं पण आता तीच लग्न झाल्यावर त्या स्वतःहूनच बाहेर पडल्या. आज्जीला आता कुणीही नव्हतं, हा आता दुरच कुणीतरी नातेवाईक असावं पण तेवढ्या पुरतंच. तर आज मोठी आज्जी बाहेर पडली होती कारण  फार पूर्वी ती काम करत होती तिथल्या सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांना भेटायला जायला. त्या डॉक्टर बाई याच शहरात आता स्वतःचा दवाखाना चालवतात असं आजीनं त्यांच्या मानलेल्या मुलीकडून कळलं होतं.


रस्त्याच्या कडेनी हळूहळू चालत आजूबाजूच्या कुठल्याच गोष्टी कडे लक्ष न देत ती चालत होती. खूप वर्षांनी डॉक्टर बाई भेटणार म्हणून तशी ती आनंदात होती आणि कारण पण तसच होतं आज डॉक्टर बाईंचा वाढदिवस होता. आजी नेहमी त्यांना वाढदिवसाला गुलाबाची फुलं भेट द्यायची . आजही कोपऱ्यावर एक एक लहान मुलगी फुले विकत बसली होती , आजीने तिच्याकडून दोन गुलाबाची फुलं विकत घेतली. डॉक्टर बाईना गुलाबाचं फुल फार आवडायचं . जुन्या आठवणीत हरवलेल्या आजी दवाखान्या समोर आल्या. गेट उघडून आल गेल्या.  दवाखान्यात फार गर्दी नव्हती. तिथल्या काऊटर वर बसलेल्या रिसेप्शनिस्ट ला त्यांनी आपली ओळख सांगितली. आणि डॉक्टर बाईना भेटायचा निरोप पाठवायची विनंती केली.  रिसेप्शनिस्ट उठून आत गेली आणि तिने निरोप दिला. मोठ्या आजीना तिने बसायला सांगितलं. डॉक्टर बाई बाहेर आल्या, मोठ्या आजीला पाहून त्या थोड्या चपापल्या. पण आजीना फार आनंद झाला होता. त्या लगबगीने उठून पुढे झाल्या आणि बाईना शुभेच्छा दिल्या आणि गुलाबाची दोन फुलं हातात दिली. बाईंनी ती घेतली आणि त्यांचे आभार मानले, त्यांची विचारपूस केली आणि त्यांना बसायला सांगून आत गेल्या.  आजीला तहान लागली होती म्हणून ती पलीकडे कोपररयातल्या नळावर पाणी प्यायला गेल्या. तिथेच बाईंच्या खोलीची खिडकी होती. बाई आत जाऊन आपल्या नवऱ्याला सांगत होत्या कि मोठी आजी म्हणून काम करणाऱ्या एक बाई बाहेर आल्या आहेत. मला वाटतं आता आपण त्यांना काहीतरी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असावी. उगाच का एवढ्या वर्षा नंतर त्या आज अचानक आल्या. त्यावर तो म्हणाला काही नको उगाच तू त्यांना आता देशील आणि सारखी सवय लागेल. दोन गुलाबाची फुलं उगाच खूप महागात पडतील आपल्याला. त्या पेक्षा त्यांना काहीतरी खायला दे आणि जाऊ देत.
पाणी पिताना आजींच्या कानावर हे शब्द आले. त्यांची तहान मेली. त्या पुन्हा बाकावर जाऊन बसल्या. डॉक्टर बाई बाहेर आल्या त्यांनी आजीना खायला आणलं होतं. आजी नको म्हणाल्या. त्या उठल्या आणि मगाशी दिलेली फुलं परत मागितली. डॉक्टर बाईना काही कळेना. त्या आत जाऊन फुलं घेऊन आल्या. आजीनी फुलं परत घेतली. आजी बोलू लागली,  “तुम्हाला जी फुलं महाग पडतील असं वाटत आहे ती फुलं न देणंच चांगलं म्हणून ती परत घेते आहे. मी आले ते केवळ जुन्या आठवणींना स्मरून पण मला वाटतं काळ खूप पुढे गेलाय, प्रत्येक गोष्टीत स्वार्थच असला पाहिजे आणि आपणही प्रत्येक गोष्टीत स्वार्थच बघितला पाहिजे अशा प्रकारे जगायची सवय लागलेल्या जगात माझ्या फुलांची किंमत शून्य आहे.“
एवढं बोलून आजी बाहेर पडली. तो पर्यंत टळटळीत दुपार झाली होती. हवेत आता सकाळचा गारवा उरला नव्हता. चटका बसावा असं उन होतं. आजी पुन्हा आल्या रस्त्याने परत चालू लागली. मगाशी फुलं विकत घेतलेल्या मुलीपाशी येऊन त्यांनी ती फुलं परत केली. छोटी मुलगी म्हणाली आजी आम्ही एकदा दिलेली फुलं परत घेत नाही. आजीचा उदास चेहरा पाहून छोटी मुलगी पुढे झाली आणि फुलाचे पैसे परत देऊ लागली. आजीने तिच्या कडे पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाली “असू देत तुला माझ्या कडून भेट आहेत असं समज.” एवढं बोलून आजी निघाली , आजूबाजूचं चित्र पुन्हा तेच होतं पण आजी मात्र त्यात दिसत नव्हती.



आनंद
३१ जानेवारी  २०१५